फेंगल चक्रीवादळाचे तीन बळी

चेन्नईः फेंगल चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये जोरदार पाऊस झाला. यामुळे चेन्नई विमानतळ बंद करावे लागले. तर, शहरातील अनेक भाग जलमय झाले. जोरदार वारा आणि मुसळधार पावसामुळे चेन्नईतील विमान आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाली. चेन्‍नईत पावसावेळी वेगवेगळ्या वीज कोसळून तीन जण ठार झाले आहेत.

पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांनीही राज्याचा दौरा केला. ते म्हणाले की, “अनेक वर्षांनंतर पुद्दुचेरीमध्ये ५० सेंटीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. मी सध्या पूरग्रस्त भागांची पाहणी करत आहे. बचाव पथके लोकांना वाचवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत.” तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. राजधानी शहरात अनेक रुग्णालये आणि घरेही पाण्याखाली गेली आहेत. चक्रीवादळाच्या आधी शेकडो लोकांनी स्थलांतर केले आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला ‘फेंगल’ने श्रीलंकेच्या किनारपट्टीला धडक दिली होती. यात सहा मुलांसह १२ जणांचा मृत्यू झाला होता. चेन्नई सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक उड्डाणे रद्द झाली आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. पुद्दुचेरीच्या केंद्रशासित प्रदेशात सखल भागांमध्ये राहणाऱ्या लोकांना प्रशासनाने चक्रीवादळासाठी तयार राहण्याचा इशारा देणारे ‘एसएमएस अलर्ट’ पाठवले होते.

विमानतळ बंद झाल्यामुळे ५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशातील सखल भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेत खबरदारीच्या उपायांची अंमलबजावणी केली आहे. पुद्दुचेरी आणि तामिळनाडूमधील अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि खबरदारीचे उपाय लागू केले. पुद्दुचेरीचे जिल्हाधिकारी ए. कुलोथुंगन म्हणाले की, फेंगल चक्रीवादळाच्या तयारीसाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक पावले उचलली आहेत.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी तयारी आणि खबरदारीच्या उपायांचा आढावा घेतला. त्यांनी राज्यमंत्री के. एन. नेहरू आणि केकेएसएसआर रामचंद्रन यांच्यासह ‘चेन्नई स्टेट ऑपरेशन सेंटर’ला भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी चेन्नई, कांचीपूरम, तिरुवल्लूर, चेंगलपट्टू आणि इतर जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी संवाद साधला.

स्टॅलिन म्हणाले की, सरकार सतत देखरेख करत आहे. पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. चक्रीवादळ आज रात्री किनारपट्टी ओलांडणार असल्याची माहिती मिळाली आहे. चेन्नई कॉर्पोरेशन कमिशनर कांचीपूरम, तिरुवल्लूर, चेंगलपट्टू आणि इतर जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.

Related posts

Sheikh Hasina : शेख हसीनांना आमच्याकडे सोपवा

Rahul gandhi : सोमनाथची पोलिसांकडूनच हत्या

Python near Hostel: शंभर किलो अजगराचा गर्ल्स होस्टेलजवळ डेरा