कोल्हापूर; प्रतिनिधी : कसबा बावडा येथील भगवा चौक येथे बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या बहुशस्त्रधारी पुतळ्याचे अनावरण काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या हस्ते उद्या (दि. ४) होणार आहे. सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. राहुल गांधी यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. (Rahul Gandhi )
असा आहे पुतळा
छत्रपती शिवरायांच्या १६ व्या शतकातील समकालीन तैलचित्रांचा अभ्यास करून हा पुतळा तयार करण्यात आला आहे. तो ब्राँझमध्ये साकारण्यात आला आहे. त्याचे वजन साधारण दोन टन आहे. कमरेला शेलापटका, कट्यार आणि पाठीवर ढाल, उजव्या हातात दांडपट्टा, डाव्या हातात धोप आणि पायामध्ये सुंदर नक्षीकाम असलेले चढाव अशा देखण्या पेहरावात हा पुतळा बनविला आहे.
गुरुवारी सकाळी मोठ्या क्रेनद्वारे हा पुतळा चबुतऱ्यावर बसवण्यात आला. काँग्रेसचे विधिमंडळातील नेते आमदार सतेज पाटील तसेच आमदार ऋतुराज पाटील यांनी भेट देवून कामाचा आढावा घेतला. राहुल गांधी यांच्या स्वागताचीही जंगी तयारी करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनानेही सुरक्षेचा आढावा घेतला. कसबा बावडा परिसरासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते, पदधिकाऱ्यांना त्यांच्या स्वागताची उत्सुकता लागली आहे.
दरम्यान, शुकवारी सकाळी छत्रपती शिवारायांच्या पुतळ्याच्या जागेची वास्तूशांती पूजा डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील तसेच श्रीराम सेवा संस्थेचे सभापती संतोष पाटील व उप सभापती अंनत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. संपूर्ण कसबा बावड्यातील घराघरांमध्ये पारंपरिक पेहरावात मुलींनी आमंत्रण पत्रिका वाटल्या असून मोठ्या सणासारखी लगबग या परिसरात सुरु आहे. छत्रपती शिवरायांच्या भव्य प्रतिमा आणि राहुल गांधी यांच्या स्वागताचे फलक ठिकठिकाणी उभाण्यात आले आहेत.
हेही वाचा :