Clown : विदुषकाचा शोध

-निळू दामले

विदूषक हा पुस्तकाचा, संशोधनाचा विषय होऊ शकतो. सोळाव्या शतकात इंग्लंडमधे आठव्या हेन्रीनं दरबारात विल सोमर नावाचा ‘फूल’, fool, नेमला होता. पीटर अँडरसननी विल सोमरचं चरित्र प्रस्तुत पुस्तकात रेखाटलं आहे. (Clown)

सोमर आठव्या हेन्रीचा विश्वासू होता, त्याच्या जवळचा होता, कदाचित त्याचा सल्लागारही असावा.हेन्रीनंतरही तो पुढल्या राणीच्या दरबारात होता. हेन्रीला सहा राण्या होत्या.एक लग्न पोपनं धर्मबाह्य ठरवलं, नाकारलं. हेन्री संतापला. त्यानं पोपलाच बरखास्त करून टाकलं. स्वतः चर्च ऑफ इंग्लंडचा प्रमुख झाला. ख्रिस्ती धर्म संघटित होत होता त्या काळात पोपनं स्वतःकडं राजेपद घेतलं. हेन्री या राजानं धर्मप्रमुखपद स्वतःकडं घेतलं. हेन्रीनं चर्चेस, सेमिनऱ्या, मठ इत्यादी सारं लु़टलं, त्यातली संपत्ती लुटली. हेन्री गाजला. हेन्री इतिहात अजरामर झाला, त्याचा ‘विश्वासू फूल’ इतिहासातून लुप्त झाला.
हे ‘फूल’ काय प्रकरण आहे? फूल या शब्दाला मराठीत मूर्ख, बेवकूफ असे प्रतीशब्द वापरले जातात.पण ते बरोबर नाही.

इंग्लीश कायद्यात फूलचं वर्णन Purus Idiota, शुद्ध इडियट या लॅटिन नावानं मंजूर केलं जात असे. ईडियट या शब्दाला आपल्या शब्दकोषात मूर्ख, चाळे करणारा, बेवकूफ असे प्रतिशब्द दिलेत. पण राजदरबारातली ती व्यक्ती मूर्ख नसे. युरोपात मनोरंजन करणारा माणूस ठेवणं ही फार प्राचीन परंपरा आहे. विदूषक हुशार, बुद्धीमान, चलाख, इमानदार असे. ‘फूल’ला आपण विदुषक म्हणायला हरकत नाही. गमत्या असंही भाषांतर होऊ शकतं. (Clown)

विदूषकाचा अंगरखा, टोपी, हातातला राजदंड या वस्तू राजाच्या अंगरखा,टोपी,राजदंडाचं बिघडवलेलं रुप असे. एक बाह्यरूपांतरीत राजा म्हणजे विदूषक. तो टिंगल करे तेव्हां ती एका परीनं राजाची टिंगल असे. अप्रत्यक्षपणे तो राजाला शिकवलेला धडा असे. राज्यातला एक माणूस राजाबद्दल काय बोलतोय ते सांगणं असं त्याचं रूप असे. राणी, राजकुटुंबातल्या व्यक्ती, राजाचे निकटवर्तीय यांच्यावर विदूषक टीका करत असे, तशी टीका करण्याची इतर कोणाची शामत नसे. त्या टीकाथट्टेतून राजा योग्य तो धडा घेत असे.

विल सोमर हे पात्र आठव्या हेन्रीच्या काळातलं, ते शेक्सपियरच्या नाटकातही आलं, काही काळ गाजलं, काही काळानं लुप्त झालं. त्या काळात सोमर फार प्रसिद्ध होता, तो एक दंतकथाही झाला होता.

सोमर बुद्धीमान होता, चलाख होता, हजरजबाबी होता, त्याला राजाचं मन कळत असे. सोमर दरबारात प्रश्न टाकत असे. ‘एक अशी व्यक्ती रोरावत जगात येते आणि पटकन नाहिशी होते; जिला नाक नाही, डोळे नाहीत, कान नाहीत, जीवन नाही. तर सांगा ती गोष्टव्यक्ती कोण?’ दरबारी नाना तर्क लढवत. (Clown)

सोमर उत्तर देई ‘पाद’.

असंबद्ध, विक्षिप्त, गावंढळ, बेमुर्वतपूर्ण कोण बोलू शकतो? बुद्धीची मंद वाढ झालेल्या माणसाकडून तसं घडू शकतं. अशी माणसं समाजात असत. ही विकलांगं माणसं देवाची लाडकी आहेत,देव त्यांची काळजी घेतो असं चर्च म्हणे, त्यांची सोय करा असं चर्च पोप आणि राजाला सांगे. अशा माणसांना पगार देऊन, जायला यायला घोडं देऊन त्यांची नेमणूक राजा करत असे.

विदूषक नैसर्गिक असत. पण काही माणसं विदुषक ही एक चांगली नोकरी आहे असं मानून विदुषकी चाळे करत, नोकरीत रुजू होत असत. विल सोमर बहुदा नैसर्गिक मंद माणूस नव्हता, तो अत्यंत बुद्धीमान होता. तो राज दरबारात कसा घुसला? माहित नाही. राजेशाही गेली, राज दरबार गेला, राजा नामधारी झाला. ‘फूल’ ली नोकरी देणारं कुणी उरलं नाही. (Clown)

विदुषक हे पात्र ग्रीक नाटकांत दिसतं. नंतर ते अचानक आठव्या हेन्रीच्या काळात उगवलं. नंतर ते अचानक नाटकातून गायब झालं. भास आणि कालिदासाच्या नाटकात विदूषक हे पात्र दिसतं. बिरबल हे नाटकातलं पात्रं नव्हतं तर तो खरोखरच बादशहाच्या दरबारात होता. माणसं होऊन जातात. घटना घडून जातात. त्यांच्या नोंदी होतात, पुरावे निर्माण होतात. काही वेळा नोंदी होत नाहीत. कालांतरानं ती माणसं, घटना, दंतकथा होतात. उदा. सोमर. माणूस होता की नाही? होता. पण त्याच्याबद्दल माहिती? इल्ला. अशा वेळी शक्य आहे पण विश्वास ठेवण्यालायक नाही असा इतिहास लिहिता येतो. म्हटलं तर तो इतिहास असतो, म्हटलं तर ते एक फिक्शन असतं.

प्रस्तुत पुस्तक, त्यातलं सोमरचं चरित्र, वरील वर्गातलं आहे.प्राध्यापक अँडरसन यांनी कित्येक वर्षं संशोधन करून सोमरबाबत माहिती मिळवली. ही माहिती विश्वासार्ह नाही. पण त्या माहितीतल्या गोष्टी शक्य आहेत हे अँडरसन यांनी तर्काच्या आधारे ठरवलं आणि त्यावर प्रस्तुत पुस्तक रचलं. पुस्तकात चरित्र खूप कमी आलंय. विल सोमर हे एक गूढ होतं, ते उलगडायचा प्रयत्न अँडरसननी केला पण ते गूढ उकललं नाहीच, ते बहुतांशी गूढच राहिलं.

हां, पण एक गोष्ट झाली. त्या निमित्तानं दरबारात, उमरावांच्या दालनांत मनोरंजन करणाऱ्या जोकर, जेस्टर, क्लाऊन, फूल अशा नाना छटांच्या कलाकारांचा इतिहास त्यामुळं समोर आला. (Clown)

पुस्तक अकॅडमिक आहे. सोमरचे उल्लेख कोणी कोणी कुठं कुठं केलेत याचा धांडोळा लेखकानं घेतलाय. ते उल्लेख कितपत खरेखोटे आहेत याचं विवेचन लेखकानं केलंय. अकॅडमिक तपशील पुस्तकात भरपूर भरलेले आहेत.सामान्य माणूस जांभया देत हे तपशील पटापट उलटत जाईल. खुप फोलपटं पाखडल्यानंतर हाताला लागतं ते मात्र आनंददायक असतं याचा अनुभव या पुस्तकातून येतो.

पुस्तक : Fool: In Search of Henry VIII’s Closest Man

लेखक : Peter K. Andersson.

हेही वाचा :

Related posts

सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार