Tennis doubles : साकेत-रामकुमार उपविजेते

Tennis doubles

चेन्नई : साकेत मायनेनी आणि रामकुमार रामनाथन या भारताच्या जोडीला चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. जपानच्या शिंतारो मोचिझुकी-काइतो उएसुगी या जोडीने गतविजेत्या साकेत-रामकुमार जोडीवर ६-४, ६-४ अशी सरळ सेटमध्ये मात केली. (Tennis doubles)

साकेत-रामकुमार या जोडीला या स्पर्धेसाठी पुरुष दुहेरीच्या गटात तृतीय मानांकन होते, तर जपानची जोडी बिगरमानांकित होती. त्याचबरोबर गतविजेते असल्याने साहजिकच साकेत-रामकुमार यांचे पारडे अंतिम फेरीत जड मानले जात होते. तथापि, अंतिम सामन्यामध्ये त्यांना लौकिकास साजेसा खेळ करता आला नाही. पहिला सेट शिंतारो-काइतो जोडीने ६-४ असा जिंकून सामन्यात आघाडी घेतल्यानंतर साकेत-रामकुमार दुसऱ्या सेटमध्ये जोरदार पुनरागमन करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, दुसऱ्या सेटमध्येही जपानच्या जोडीने त्यांना वरचढ होण्याची संधी दिली नाही. हा सेटसुद्धा ६-४ असा जिंकत शिंतारो-काइतो जोडीने १ तास ७ मिनिटांमध्ये विजयावर शिक्कामोर्तब केले. (Tennis doubles)

दरम्यान, या स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये स्वीडनचा एलियस वायमर आणि फ्रान्सचा कायरियन जॅकेट यांच्यामध्ये रविवारी विजेतेपदासाठी लढत होईल. उपांत्य फेरीमध्ये वायमरने ब्रिटनचा अग्रमानांकित बिली हॅरिसला ७-६(७-५), ७-६(७-२) असा पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात जॅकेटने चेक प्रजासत्ताकच्या डॅलिबोर स्विर्सिनाला ६-४, ६-१ असे नमवले. (Tennis doubles)

हेही वाचा :

श्रीलंकेवर पराभवाचे सावट

‘जीतो बाजी खेल के…’

ऑस्ट्रेलियाच्या स्मिथ, कॅरीची शतके

Related posts

आयपीएलमध्ये विदर्भाच्या प्रफुल्ल हिंगेचा नवा विक्रम  

सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत ‘दिलबहार’उपांत्य फेरीत  

श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा सनराईज हैद्राबादवर विजय