दहा नवजात बालकांचा आगीत बळी

झाशी; वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशातील झाशी येथील महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागाला आग लागली. या भीषण आगीमध्ये नवजात १० मुलांचा होरपळून मृत्यू झाला, तर १६ बालके गंभीर जखमी झाली आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. (jhansi)

प्राथमिक माहितीनुसार नवजात अतिदक्षता विभागामध्ये असणाऱ्या ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या मशीनमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधीक्षक सचिन माहोर यांनी दिली आहे. या रुग्णालयामध्ये ५४ बालके उपचारासाठी दाखल करण्यात आली होती. हा अपघात झाल्याचे समजताच आगीमुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. कुटुंबीय आणि रुग्ण जीव वाचवण्यासाठी धावू लागले. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून ३७ मुलांना सुखरूप बाहेर काढले, असे झाशीचे जिल्हा दंडाधिकारी अविनाश कुमार यांनी सांगितले आहे तसेच या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेचे वर्णन “हृदय पिळवटून टाकणारे” असे केले आहे. तसेच जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त आणि पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी) यांच्याकडून १२ तासांत सविस्तर अहवाल मागवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक आणि आरोग्य सचिव पार्थ सारथी सेन यांनी झाशीला जाऊन पाहणी केली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी (दि.१६) झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये आगीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना मदत जाहीर केली. यामध्ये मृत नवजात बालकांच्या पालकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उत्तर प्रदेश सरकारनेही मुख्यमंत्री मदत निधीतून जखमींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील झाशी मेडिकल कॉलेजमध्ये लागलेल्या आग दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या नातेवाइकांना रिलिफ फंडातून २ लाख रुपयांची मदत जाहीर केली. जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

उत्तर प्रदेशमधील झाशीची राणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलजेच्या नवजात अतिदक्षता विभागाला आग लागली. या कॉलेजचे फेब्रुवारीमध्ये फायर सेफ्टी ऑडिट करण्यात आले असल्याचे पाठक यांनी सांगितले. याच बरोबर जूनमध्ये एक मॉक ड्रिलही करण्यात आले होते. ही घटना कशी घडली आणि का घडली, आम्ही चौकशी अहवाल आल्यानंतरच याबद्दल काही सांगू शकतो, असे ते म्हणाले. (jhansi)

एनआयसीयूमध्ये दाखल असलेल्या मुलांची प्रकृती तपासली जात आहे. मेडिकल कॉलेजच्या वतीने सांगण्यात आले, की अपघाताच्या वेळी ५२ ते ५४ मुलांना ‘एनआयसीयू’मध्ये दाखल करण्यात आले होते, त्यापैकी १० जणांचा मृत्यू झाला आणि १६ जणांवर उपचार सुरू आहेत. १९६८ मध्ये सुरू झालेले हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुंदेलखंड प्रदेशातील सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक आहे. या घटनेनंतर ‘एनआयसीयू’मधील बचावकार्य रात्री एक वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आले. या घटनेशी संबंधित सर्व तथ्ये तपासल्यानंतर अहवाल सार्वजनिक केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

१२ तासांत अहवालाचे आदेश

या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक परिस्थितीत घटनेचे कारण शोधले जाईल. निष्काळजीपणा आढळल्यास कारवाई केली जाईल. योगी यांनी आयुक्त बिमल कुमार दुबे आणि उपमहानिरीक्षक (झाशी पोलिस रेंज) कलानिधी नैथानी यांना या प्रकरणाचा १२ तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Related posts

pooja khedkar: पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Sheikh Hasina : शेख हसीनांना आमच्याकडे सोपवा

Rahul gandhi : सोमनाथची पोलिसांकडूनच हत्या