ताव ‘डे’१९/११

 फक्त १२ वी पास असूनही

 महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री,

 मराठी भाषा मंत्री राहिलेले,

 २०१९ नंतर अडगळीत टाकून दिलेले

 पण नंतर पुनर्वसन केलेले,

 भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस

 श्री. विनोद श्रीधर तावडे (६१ व) यांस,

 साष्-टांग नमस्कार वि.वि.

आतापर्यंत केवळ रोझ-डे, चिल्ड्रेन डे, फादर्स डे, सारी डे, चॉकलेट डे वगैरे वगैरे डेज लोकांना माहीत होते. तथापि १९ नोव्हेंबर २०२४ हा दिवस केवळ आपल्या कार्यकर्तृत्वाने ताव डे म्हणून प्रसिद्ध करणे, हे तसे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे. पण आपल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बरे-वाईट का असेनात पण संस्कार असल्याने आणि अभाविप नावाच्या उपद्व्यापी संघटनेत आपण बरीच वर्षे चमकेश या पदावर काम केल्याने विरार येथून हा एतिहासिक ताव-डे सुरू करण्यात यशस्वी झाल्याबद्दल आपले अभिनंदन करणे भाग आहे.

तारीख १९ नोव्हेंबर २०२४ रोजी मंगळवारी, विरारच्या विवांता हॉटेलमध्ये आपण निवांतपणे पैसे वाटप करत असल्याचा आरोप ठेवत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, तेव्हा अनेकांप्रमाणे आम्हांसही आश्चर्य वाटले. वास्तविक आपल्यासारख्या बहुजन समाजातील एका कष्टाळू तरुणाने तळकोकणातून मुंबईत येऊन आतापर्यंत जो स्वतःचा आणि आपल्या नातेवाकांचा विकास केला, त्याबद्दल बविआने आपला सत्कार समारंभ आयोजित करावयास हवा होता. तसे न करता, विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी या हॉटेलमध्ये आपण राहत होता त्या रूममध्ये काही डायऱ्या व रोख रक्कम सापडली म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी राडा केला आणि या प्रकरणी तुळींज पोलिस ठाण्यात आपल्यावर तीन एफआय़आर दाखल झाले, याचा धक्का बसलेला आहे.

बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की विनोद तावडे हे सोमवारी रात्रीच विवांता हॉटेलमध्ये ५ कोटी रुपये वाटपासाठी आल्याची माहिती भाजपमधील हिंतचिंतकांनी दिली. प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यानंतर सखोल चौकशीची मागणी मी केली. हे प्रकरण मिटविण्यासाठी तावडे यांनी मला २५ वेळा फोन कॉल केले. आता हे हितचिंतक त्यांचे की तुमचे? हे काही ठाकुरांनी स्पष्ट केलेले नाही. ते त्यांचेच असणार. कारण, तुमचे जवळचे हितचिंतक आणि गरिबांचे चाणक्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तर ठाकूरांवर पलटवार करताना म्हटले आहे, की “वसई-विरार येथे विनोद तावडे हे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यासाठी गेले होते. त्यांच्याकडे कुठलेही पैसे सापडले नाहीत. निवडणुकीत पराभव दिसू लागला की काही प्रकार होत असतात. त्यातीलच हा प्रकार आहे. आता ‘त्यातीलच हा प्रकार’ म्हणजे नेमका कुठला प्रकार? पैसे वाटपाचा? की आरोप करण्याचा? हे देवाभाऊंनीही स्पष्ट केलेले नाही. विनोदज तावडेजी, तुमची एवढी काळजी फडणवीस घेत असताना अलीकडे ‘निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी ज्यांची नावे चर्चेत आहेत, त्यापैकी कोणीही मुख्यमंत्री न होता, दुसरीच नावे पुढे येऊ शकतात,’ अशा आशयाचे विधान आपण करणे कितपत संयुक्तिक होते? अहो, एक वेळ अदानी किंवा अंबानींना नाराज केलं तरी चालेल, पण फडणवीसांना नाराज करणं किती महाग पडतं, हे त्या खडसेंना, पंकजाताईंना विचारा. तुम्हीही या नाराजीचा एकदा अनुभव घेतला. मग नड्डांनी तुमचं पुनर्वसन केलं, पण आता या विरार प्रकरणात जर तुम्ही पुन्हा विस्थापित झालात तर पुनर्वसन कोण करणार तुमचं तावडेसाहेब?

सरचिटणीस महोदय, तुमच्याकडे जी डायरी सापडली तीमध्ये अमुक बाई ३००, तमुक बाई-३५० अशा नोंदी सापडलेल्या आमदार क्षितीज ठाकूर यांनी कॅमेऱ्यासमोर दाखवले. तसेच त्यांचे पिताश्री हितेंद्र ठाकूर यांनी ‘हे फोन नंबर असू शकत नाहीत किंवा तीन-चारशे रुपये एवढी कमी रक्कमही असणार नाही तर हे ३०० म्हणजे ३ लाख किंवा ३५० म्हणजे साडेतीन लाख रुपये रक्कम वाटप करण्यात आलेली आहे’ असे म्हटले आहे. या आकड्यांची चौकशी करून कोणाकोणाला पैसे वाटप झाले आहे, हे निवडणूक आयोगाने शोधून काढावे अशी मागणी ‘राष्ट्रवादी काँग्रेस शप’चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. या जयंतरावांना ‘मटका’ जुगाराबद्दल काहीच माहिती नसल्याचे दिसते. पूर्वी रतन खत्री नावाचे ‘मटकाकिंग’ होऊन गेले. ते मुंबई बाजार आणि कल्याण अशा टायटलखाली ओपन ४७४, क्लोज ३५१ वगैरे आकडे पेपरमधून छापून आणायचे. त्याद्वारे डेली जुगार खेळणाऱ्या लाखो जुगाऱ्यांना आणि गावोगावच्या मटका एजंटना कुठला आकडा फुटला याची सक्काळी सक्काळी माहिती मिळायची आणि ते खूश व्हायचे किंवा खड्ड्यात पडायचे. कदाचित आपल्या कोणा मठ्ठ कार्यकर्त्याने संबंधित महिला / पुरुषांनी कोणत्या आकड्यावर पैसे लावावेत हे चिठ्ठ्या न देता, डायरीवर नोंद करून ठेवले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पण त्यामुळे आपण स्वतः पैसे वाटप केले हे सिद्ध होऊ शकत नाही.

तावडेजी, आपल्याला आठवत असेल, की सध्या जे आपल्या पक्षात येऊन महत्त्वाचे नेते झालेत त्या काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपली डिग्री बोगस आहे म्हणून आपल्याला अटक करण्याची मागणी काँग्रेसमध्ये असताना केली होती, पण कालांतराने तेच भाजपामध्ये आले आणि आपल्याच मागणीला त्यांनी थर्ड डिग्री लावली. आता काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी तुम्हाला तत्काळ अटक करण्याची मागणी लावून धरली आहे. बिचारे चेन्निथला! त्यांना कोणी तरी सांगावयास हवे, की मोदीजींच्या राज्यात तत्काळ अटक फक्त विरोधी पक्षीय नेत्यांना होऊ शकतात आणि खेरीज करून आणखी काही ‘तत्काळ’ हवे असेल तर ते रेल्वे तिकीट मिळू शकते. तेव्हा आपल्याला अटक-बिटक काही होणार नाही आणि तुळींज पोलिस स्टेशनमध्ये नोंदवलेले ते तीन एफआयआरसुद्धा कालांतराने गायब होतील, याविषयी निश्चिंत असावे. जेवढा चिखल जास्त, तेवढी कमळे जास्त हे आपल्या पक्षाचे ब्रीदवाक्यच आहे.

 नवीन सरकारात क्षितीज ठाकूर यांना मंत्रिपद मिळो, अशी सदिच्छा बाळगणारा

आपला,

विनम्र बालक

Related posts

पोटातले ओठावर!

हिंदुदुर्ग!

Lok Sabha : खेळपट्टी खराब करण्याचा संसदीय खेळ