तीस फूट खोल मंदिर, शिखराऐवजी घुमट

सतीश घाटगे; कोल्हापूर :  तलावांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापूर शहरात साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाईचे प्राचीन मंदिर आहे. शहरात हिंदू, जैन धर्मियांची प्राचीन मंदिरे आहेत. मुस्लीमांचे दर्गेही आहेत. अशा कोल्हापूर शहरात जमिनीत खोल तीस फूट खंडोबाचे एकमेव दुर्मिळ मंदिर आहे. मंदिर हिंदू देवाचे असले तरी, मंदिरावर घुमट मात्र मुस्लीम शैलीतील आहे. हिंदू-मुस्लीम स्थापत्य शैलीचा प्रभाव खोल खंडोबावर पडला आहे.

स्थापत्य कलेचा अभ्यास पाहता हे मंदिर पंचगंगा नदीपासून दीड ते पावनेदोन किलोमीटर अंतरावर आहे. पंचगंगा नदीजवळ ब्रह्मपुरी टेकडीजवळ उत्खननात प्राचीन वस्ती आढळून आली आहे. खोल खंडोबा मंदिराजवळ एक तळे असण्याचा अदांज आहे. कारण मंदिराजवळ बांधण्यात आलेल्या खोल खंडोबा सांस्कृतिक हॉलच्या बांधकामाच्या पायासाठी बांधण्यात आलेल्या खोल खड्ड्यामध्ये खापराचे गोल तुकडे शेकड्यांनी मिळाले होते.

मंदिर मोठ-मोठ्या शिळांवर उभारले आहे. मंदिर जमिनीच्या आत असल्याने उतरण्यासाठी दगडी मोठ्या ओबड-धोबड पायऱ्या आहेत. चिंचोळ्या मार्गावरील पायऱ्यांवरून एकावेळी एक ते दोन व्यक्ती जाऊ शकतात. सतरा ते आठरा पायऱ्या उतरुन गेल्यावर मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग दृष्टीस पडते. हे शिवलिंग म्हणजेच खंडोबा देवता असे मानले जाते. मंदिरावर हिंदू मंदिराप्रमाणे शिखर नसून घुमट आहे. या घुमटावर पाकळ्या आहेत. घुमटामुळे मंदिरात आवाज घुमतो. घुमटाच्या पूर्व बाजूला हवा आणि प्रकाश येण्यासाठी छोटी खिडकी आहे. मंदिराच्या तीनही बाजूला छोट्या दिवळ्यात खंडोबा देवतेच्या सेवेकऱ्यांची मंदिर आहेत. मंदिरेच्या पश्चिमेला एका बाजूला कमळ्याच्या आकाराची नक्षी आहे. मंदिराचा गाभाऱ्यात शिवलिंगाबरोबर म्हाळसादेवीची मूर्ती आहे. मंदिराच्या मंडपाच्या भिंती मातीच्या असून त्यावर पत्र्याचे शेड बांधले आहे. मूळ मंदिर रचनेच्या फटकून मंडप दिसून येतो. कदाचित तो नंतर बांधला असावा.

हल्ल्यापासून बचावासाठी घुमट

प्रथमदर्शनी मंदिर बाहेरुन पाहिले असता दर्ग्याचा भास होतो. मुस्लीम शासकांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी मंदिरावर घुमट बांधला असावा असे म्हटले जाते. अदिलशहा आणि निजामशहा राजवटीतील काही शासक खंडोबाचे भक्त असल्याचेही बोलले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांपूर्वी महाराष्ट्रात अदिलशाही आणि निजामशाहीच्या ताब्यात महाराष्ट्राचा बराचसा भाग होता. खंडोबा देवाचे प्रमुख स्थान असलेली जेजरी, पाली, मंगसुळी हे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागात आहेत.

महापुरात खंडोबाचा गाभारा भरुन जातो

पंचगंगा नदीला महापूर येतो तेव्हा खंडोबा मंदिराचा गाभारा भरुन जातो. महापुराची पातळी वाढते त्याप्रमाणे गाभाऱ्यातही पाणी वाढते. मंदिरातील खालील भागातील पायऱ्याही बुडून जातात. खंडोबा मंदिर आणि पंचगंगा नदीचा पूर यांचे काय नाते आहे. याचा शोध घेण्याची गरज आहे. कदाचित मंदिरात रोज नित्यनियमातील पूजेचे पाणी थेट पंचगंगेत जात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हल्ली भूगर्भाची रचना बदलली असल्याने खंडोबा मंदिरातील गाभाऱ्यात नियमित पाणी येते. हे पाणी अतिशय शुध्द असल्याचा अहवाल पाणी तपासणाऱ्या यंत्रणांनी दिला आहे.

चंपाषष्ठी उत्सव

मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून चंपाषष्ठी हा उत्सव होतो. कोल्हापूरात मार्गशीर्ष प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर शनिवार पेठ येथील पुरातन खोल खंडोबा मंदिरामध्ये आज (दि.२) चंपाषष्ठी उत्सवात धार्मिक आणि उत्साही वातावरणात प्रारंभ झाला.

गुरुवारी सहा डिसेंबर रोजी खंडोबा देवाचा जागर होणार असून मुख्य चंपाषष्ठी उत्सव शनिवारी रोजी होणार आहे. खोल खंडोबा मंदिरासह शिवाजी पेठेतील खंडोबा मंदिर, रामानंद नगरातील खंडोबा मंदिर आणि अंबाबाई मंदिरातील खंडोबा मंदिरामध्ये चंपाषष्ठी उत्सवात सुरुवात झाली आहे.

खोल खंडोबा मंदिरात सकाळी अभिषेक झाल्यानंतर खंडोबा देवाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी खोल खंडोबा मंदिरातील मुख्य पुजारी खंडेराव जगताप, घनश्याम जगताप, मेघश्याम जगताप, भास्कर कदम यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘सदानंदाचा येळकोट’ या जयघोषात खंडोबाची तळी उचलण्याचा कार्यक्रम झाला. सकाळी अभिषेकानंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. उत्सव कालात रोज वाघ्या मुरळी आणि महिला भजनी मंडळाचे कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवारी खंडोबाचा जागर होणार आहे. शनिवारी मुख्य चंपाषष्ठीचा उत्सव असून त्या दिवशी रात्री आठ वाजता पारंपारिक वाद्यांच्या गजरामध्ये पालखी सोहळा होणार आहे.

खंडोबा देवाची माहिती

श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत खंडोबाचे भक्त असून अनेक कुटुंबांचे ते कुलदैवत आहे. चंपाषष्टीत नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात. सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात. देवाला बेल, दवणा व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती वाहतात. खंडोबाच्या धार्मिक विधीत भंडाऱ्याला स्थान आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी ठोम्बरा (जोंधळे शिजवून त्यांत दही व मीठ घालतात.), कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यांत असतात. देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधि असतो.  एका ताम्हनात विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हन “सदानंदाचा येळकोट” किंवा “एळकोट एळकोट जय मल्हार” असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात यालाच तळी भरणे म्हणतात.

महाराष्ट्र आणि कर्नाटकांतील खंडोबाची बारा प्रसिद्ध स्थाने

महाराष्ट्र:

१) कडे-कऱ्हे पठार, जेजुरी पुणे
२) निमगाव
३) पाली-पेंबर सातारा
४) नळदुर्ग (धाराशीव-उस्मानाबाद)
५) शेंगुड (अहमदनगर)
६) सातारे (औरंगाबाद)
७) माळेगाव

कर्नाटक:

१) मैलारपूर-पेंबर (बिदर)
२) मंगसुळी (बेळगाव)
३) मैलारलिंग (धारवाड)
४) देवरगुडू (धारवाड)
५) मण्मैलार (बल्ळारी).

कदाचित मुस्लीम गवंडी

खोल खंडोबा मंदिराचे शिखर उभारणीचे काम मुस्लीम गवंड्यांनी केले असावे. त्यामुळे मंदिरावर घुमटाचा आकार झाला असावा. घुमटावर कमळ्याच्या पाकळ्या आहेत. मुस्लीम शैलीत घुमटावर पाकळ्यांचा आकार केला जात नाही. खोल खंडोबा मंदिर हे प्राचीन असून दगडी भिंतीवर नंतरच्या काळात शिखर बांधले असावे.

– मोहन वायचळ,अर्किटेक्ट

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी