पोटातले ओठावर!

२२ ऑक्टोबर १९६४ रोजी गुजराती
बनिया कुटुंबात जन्म झालेले,
भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष
आणि विद्यमान गृहमंत्री,
आरेसेसचे माजी स्टॉक ब्रोकर
लय पावरफुल अमित अनिलचंद्र शहा
यांचे चरणी
साष्-टांग नमस्कार वि. वि.

भारतीय राज्यघटनेच्या गौरवार्थ झालेल्या चर्चेत मंगळवारी १७ डिसेंबर २०२४ रोजी राज्यसभेत उत्तर देताना आपण जी बहुमोल सुभाषितमाला संपूर्ण देशाला ऐकवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पांग फेडलेत, त्याची तुलना कोणाशी करणे अशक्य होय. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणे – आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, म्हणत राहणे ही आता फॅशन झाली आहे. देवाचे एवढे नाव घेतले असते, तर सात जन्म स्वर्गात गेला असता,’ असे विधान करुन आपण ‘साठी बुद्धी नाठी’ या जुन्या म्हणीची आठवण करुन दिल्याबद्दल आपले मानावे तेवढे आभार थोडेच आहेत. आपल्या या दिव्य प्रतिपादनानंतर, आपल्या गौरवार्थ विरोधी पक्षांकडून जी चर्चा सुरु झाली तिने अजून विश्रांती घेतलेली नाही आणि ती यापुढेही सुरु राहील अशी चिन्हे आहेत. ‘पोटात एक आणि ओठात दुसरे’ असा काहीजणांचा स्वभाव असतो. तथापि आपण असे एक दुर्मिळ राजकरणी आहात की ज्यांच्या पोटात असते ते कधीकधी ओठांवर येतेच. त्यामुळे राज्यघटना आणि डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल आपल्या काय भावना आहेत, हे या निमित्ताने प्रकट झाले. सर्वसाधारणपणे ‘फॅशन’ ही वास्त्रप्रावरणांच्या बाबतीत केली जाते. जसे की राष्ट्रीय स्वयंसेवकांनी आपली खाकी अर्धी चड्डी घालणेची पद्धत सोडून खाकी फुलपॅन्ट घालण्याची नवीन पद्धत सुरु केली – ती फॅशन झाली. देशाचे पंतप्रधान जेव्हा देशात, परदेशात जिथे कुठे गाजावाजा करत सभा घेतात तेव्हा सभा सुरु होण्याआधी मोदी, मोदी, मोदी, मोदी अशा हृदयद्रावक हाका घालण्यासाठी काही लोकांची नेमणूक केली जाते, ती फॅशन नसून पॅशन आहे, हे वेगळे सांगावयास नको. देवाचे नाव घेत राहण्याने स्वर्ग मिळेलच याची हमी तुमचे सरकार देऊ शकत नाही, पण आंबेडकर, आंबेडकर म्हणत राहिल्याने स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्वाचा स्वर्ग लाभू शकतो, याची आठवण राज्यघटना करुन देते.

एखादी गोष्ट अंगलट आली की उलट कांगावा करणे, उलट आरोप करणे, प्रति आंदोलने सुरु करणे ही फॅशन राजकारणात अलिकडेच सुरु झाली. भारतीय जनता पक्षाची यातील मास्टरी खरोखरच वादातीत आहे. त्यामुळे केन्द्रीय मंत्री किरेन रीजिजू यांनी आपल्या संसदीय दालनात आपल्या पत्रकारांना चहा पाजत सांगितले की, भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आंबेडकरांच्या मूल्यांचा आदर आणि श्रद्धा ही नेहमीच कटिबद्धता राहिली आहे. पंतप्रधानांसारख्या सर्वशक्तिमान व्यक्तीला रीजिजूंसारख्या मंत्र्याकडून सर्टिफिकेट घ्यावे लागते हे म्हणजे राहुल नार्वेकर हे नि:पक्षपाती अध्यक्ष आहेत, असे बावनकुळे यांनी सांगण्यासारखे आहे. मोदी आणि भाजपा हे जर आंबेडकरांच्या मूल्यांचा आदर करणारे असतील तर मग गौतम अदानी हे एक स्वच्छ चारित्र्याचे चौकीदार आहेत, असे म्हणावे लागते. (पण आत्तापर्यंतच्या रेकॉर्डवरुन तसे म्हणता येत नाही, हे दुर्दैव आहे.)

माननीय केंद्रीय गृहमंत्री महोदयजी, राज्यसभेचे सभापती अतिमाननीय धनकड शेठ यांनी तर म्हणे आपल्या संबंधित भाषणाचा व्हिडीओ दोनदा पाहिला आणि त्यात त्यांना आपण बाबासाहेबांबद्दल आदराशिवाय दुसरे काहीही व्यक्त केल्याचे आढळले नाही. धनकड यांनी हा व्हिडीओ फक्त दोनदाच पाहून आपल्या निर्दोषत्वाबद्दल निर्वाळा दिलेला असल्याने न्यूज चॅनेलनी तो व्हिडीओ अनेक वेळा दाखवणे चूक होते. त्यामुळे झाले काय की, आपण राज्यघटनेबद्दल आणि तिचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बद्दल तुच्छतेने बोलत आहात, असा लाखो देशवासियांचा समज झाला. रिजीजू आणि धनकड वगैरेंची सर्टिफिकेट कामाला येत नाहीत आणि आपल्या लाडक्या गृहमंत्र्यांबद्दल सर्वसामान्य आंबेडकरी जनताही मोर्चे काढायला लागलीय. हे पाहून दस्तुरखद्द मोदी साहेबांना पुढे यावे लागले आणि ‘एक्स’वर हा विषय वायझेड करण्यासाठी बोलावे लागले की ‘एका कुटुंबाच्या अधिपत्याखालील या पक्षाने (म्हणजे काँग्रेसने) डॉ. आंबेडकरांचा वारसा पुसून टाकण्यासाठी आणि मागासवर्गीय समुदायांना अपमानित करण्यासाठी काय केले, हे भारतातील नागरिकांनी वारंवार पाहिले आहे.’

महोदय, डॉ. आंबेडकरांचा वारसा पुसून टाकण्यासाठी केंद्रिय मंत्रिमंडळातील नीतीशकुमार, चंद्राबाबू नायडू आणि आपण स्वत: व प्रधानसेवक स्वत: समर्थ असताना त्या (वारसा पुसण्याच्या) कामासाठी पुन्हा काँग्रेसला कष्ट घेण्याची खरे तर गरज नाही.

रामदासजी आठवले तर डॉ. आंबेडकरांच्या वारसा पुसणाऱ्यांचा वारसा पुढे चालवत आहेत. ते राज्यघटना विसरले नसले तर त्यांना डॉ. आंबेडकर आठवायला हरकत नाही.

आपल्या एका साध्या विधानावरुन देशभर गदारोळ व्हावा, हे खरेतर आश्चर्यच म्हणायला हवे. काँग्रेसवाले सतत आंबेडकर, आंबेडकर करत असतात आणि दलित व मागासलेल्या समूहांच्या बाजून बोलत असतात. त्याऐवजी त्यांनी देव देव केले, दिवसातून तीनदा संध्या करुन चार वेळा शेंडीवरुन हात फिरवत जय श्रीराम, जय श्रीराम म्हटले तर त्यांना स्वर्गप्राप्ती होईल, हेच तर आपण सांगितले. ह्यात काय चुकले? पण काँग्रेसवाल्यांना एवढ्यात स्वर्गात जावे, असे वाटत नाही, त्याला कोण काय करणार! ते राहुल गांधी तर आता सारखे जातगणना करा, जात गणना करा, असे म्हणू लागले आहेत. आणि ते खर्गे! त्यांना तरी नको का कळायला की आपण आंबेडकर, आंबेडकर करत बसता कामा नये म्हणून! अरे असाल तुम्ही दलित समाजातून पुढे आलेले. म्हणून काय सारखे आंबेडकरांचा नामजप करत मनुस्मृतीला धिक्कारत राहाल?

माननीय अमितभाईजी; बिहार, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात आपल्या विरोधात जो आगडोंब उसळलाय, तो विनम्र बालकाला पसंत नाही. आंबेडकर आंबेडकर असा सारखा नामजप करणारे लोक आता सारखी अमित शहा, अमित शहा अशी जपमाळ ओढू लागलेत. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्वाची फॅशन मागे पडून आता घटना तुच्छतावादाची नवीच फॅशन सुरु होतेय की काय अशी भीती वाटू लागलीय. भारतीय राज्यघटनेच्या गौरवार्थ, देशभर केंद्रीय गृहमंत्र्यांविरोधात निदर्शने सुरु होणे हे निश्चितच चांगले लक्षण नव्हे. त्यांना उत्तेजन मिळाले तर आज गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणारे हे नतद्रष्ट उद्या पंतप्रधानांचा राजीनामा मागतील.

आणि पंतप्रधानांनीच भावनेच्या भरात उद्या-परवा कधीतरी राजीनामा दिला तर नेहरुंना काय वाटेल? त्यांची आठवण कोण काढेल मग? आणि डॉ. आंबेडकरांनाही वाईट वाटेल नाही का?

ह्या सगळ्या गदारोळात
उद्या तुमच्यापैकी कोणी,
‘भारतीय राज्यघटनेचे रक्षण
हॉ. हेगडेवार यांनी केले’,
असे विधान करु नये
अशी अपेक्षा बाळगणारा

आपलाच,

विनम्र बालक

हेही वाचा :

Dr. B R Ambedkar : आंबेडकरांना काँग्रेसने पराभूत केले? : वास्तव आणि विपर्यास
धनंजय मुंडे, वाल्मिकींना वाचवण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न
हिंदुदुर्ग!
साष्-टांग नमस्कार : पाव-भाजी रेवडीवाले

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

Dr. B R Ambedkar : आंबेडकरांना काँग्रेसने पराभूत केले? : वास्तव आणि विपर्यास