सोलापुरात वाहतूक पोलिसांचा दणका!

सोलापूर; विशेष प्रतिनिधी : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना सोलापूर वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ या दहा महिन्यांत सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी एकूण १४००० वाहनांवर १ कोटी ३८ लाख रुपये दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईचा वाहन चालकांनी चांगलाच धसका घेतला आहे.

*मॉडिफाइड सायलेन्सर अन् फॅन्सी नंबरप्लेटची वाहने*
सोलापूर शहरात मॉडिफाइड सायलेन्सर अन् फॅन्सी नंबरप्लेटच्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रत्येक वाहनाला वाहतूक पोलिसांकडून प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.

जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ या दहा महिन्यांत सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी एक कोटी ३८ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.

सोलापूर शहर परिसरात मागील दोन वर्षांत शंभरहून अधिक जणांचा अपघाती मृत्यू झाल्याचे आरटीओकडील आकडेवारीतून स्पष्ट होते. वाहतूक पोलिसांकडून वारंवार बेशिस्त वाहनांवर कारवाई केली जाते, तरीदेखील अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करीत नाहीत. महामार्गांवरून ये-जा करताना दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती जरुरी आहे, पण शहरातील वाहनांना हेल्मेट सक्ती आहे की नाही यावर संभ्रम आहे.

अनेकदा वाहतूक पोलिस रस्त्यात आडवे जाऊन वाहनांना बाजूला घेतात. त्यावेळी इन्शुरन्स, पीयूसी, आरसीबूक, वाहन परवाना अशी सर्व कागदपत्रे असल्यानंतर हेल्मेटबाबत विचारणा केली जाते. त्यावेळी हेल्मेट नसल्याचा दंड केला जातो ही वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे अनेक वाहनचालक आपल्या वाहनांचे नंबरप्लेट व सायलेन्सरमध्ये बदल करून वाहने चालवितात. त्यांच्यावर आता पोलिसांनी फोकस केला आहे. निवडणुकीनंतर मात्र, शहरातील चौकाचौकात विशेष मोहीम राबवून बेशिस्त वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

आकडे बोलतात

  • कारवाईचा कालावधी : १० महिने
  • मॉडिफाइड सायलेन्सरची वाहने : १,५८९
  • फॅन्सी नंबरप्लेटची वाहने : १२,२१८
  • एकूण दंड : १.३८ कोटी

पोलिसांची विशेष मोहीम

प्रत्येक वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असून नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ या काळात मॉडिफाइड सायलेन्सर लावणारी वाहने व फॅन्सी नंबरप्लेटच्या सुमारे १२ हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय वाहनाचा इन्शुरन्स नाही, पीयूसी नाही, फिटनेस प्रमाणपत्र नाही, अशा वाहनांवरही कारवाई केली जात असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त सुधीर खिराडकर यांनी दिली

Related posts

मारकडवाडीचा संदेश

लोकशाही देशांमध्ये बॅलेट पेपरवर मतदान होते मग भारतात का नाही? : शरद पवार

निवडणूक आयोगाला मारकडवाडीची चपराक