वॉशिंग्टन : तब्बल दोनशेहून अधिकवेळा सापाचे विष शरीरात पसरूनही सहीसलामत राहिलेल्या अमेरिकेतील एका व्यक्तीपासून शास्त्रज्ञांनी ‘अँटिव्हेनम’ तयार केले आहे. टीम फ्रेडी असे या व्यक्तीचे नाव असून इतक्यावेळा विषाशी संपर्क आल्याने त्यांच्या रक्तात विषावरील उतारा असणारे प्रतिपिंड तयार झाले आहेत. (Snake Antivenom)
फ्रेडी हे सुमारे दोन दशकांपासून आपल्या शरीरावर हे जीवघेणे प्रयोग करत आले आहेत. आतापर्यंत त्यांना २०० हून अधिकवेळा सर्पदंश झाला असून त्याबरोबरच अतिशय विषारी सापांच्या विषाची ७०० हून इंजेक्शन्सही त्यांनी टोचून घेतली आहेत. यामध्ये, मँम्बा, कोब्रा, तैपान आणि क्राइट यांसारख्या विषारी सापांच्या विषांचा समावेश आहे. साप हाताळताना प्रतिकारशक्ती निर्माण व्हावी, म्हणून त्यांनी या प्रयोगांना सुरुवात केली होती. परंतु, प्रयोगाच्या सुरुवातीसच सलग दोन क्रोबांच्या सर्पदंशामुळे पूर्वीश्रमीचे ट्रकचालक असणारे फ्रेडी कोमामध्ये गेले होते.
“मला मरायचे नव्हते. मला स्वत:चे बोटही कापून घ्यायचे नव्हते. मला कामात खंड पडू द्यायचा नव्हता,” असे फ्रेडी सांगतात. आपल्या या प्रयोगांमधून आपण सर्पदंशासाठी अधिक चांगल्या उपचारपद्धती विकसित करू शकतो, या जाणिवेतून त्यांना पुन:पुन्हा प्रयोग करण्याची प्रेरणा मिळाली. “ती माझी जीवनशैलीच बनली आणि मी स्वत:ला अधिकाधिक कठीण विषासाठी तयार करू लागलो,” असे ते म्हणाले. (Snake Antivenom)
सद्यस्थितीत अँटिव्हेनम (विषाचा उतारा) तयार करण्यासाठी घोड्यासारख्या प्राण्यांच्या शरीरात विष टोचले जाते. त्यानंतर, त्यांच्या शरीरात विषाशी लढण्यासाठी तयार होणारी प्रतिपिंडे (अँटिबॉडी) काढून ती उपचारपद्धती म्हणून वापरण्यात येतात. परंतु, प्राण्यांच्या प्रजातींनुसार विषामुळे शरीरात तयार होणारी द्रव्य भिन्न असल्यामुळे विष आणि विषाचा उतारा हे परस्परांशी तंतोतंत जुळावे लागतात. त्याचप्रमाणे, प्रदेशांनुसारही त्यामध्ये फरक पडतो. उदाहरणार्थ, भारतातील सापांपासून तयार केलेले अँटिव्हेनम हे श्रीलंकेतील सापांच्या तुलनेत कमी परिणामकारक असते. त्यामुळेच, मानवी शरीरात तयार झालेल्या अँटिबॉडीज खूपच उपकारक आणि सार्वत्रिक ठरणार आहेत. (Snake Antivenom)
सेंटिव्हॅक्स या बायोटेक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जेकब ग्लॅनव्हिल यांना फ्रेडी यांच्याविषयी समजले. त्यांनी अँटिव्हेनम विकसित करण्यासाठी फ्रेडी यांच्या रक्ताचा वापर करण्याची परवानगी मागितली. फ्रेडी यांच्या सहमतीनंतर त्यांच्या रक्तातील अँटिबॉडीजपासून विषाचा उतारा तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. आतापर्यंत या उताऱ्याचा वापर उंदरांवर करण्यात आला असून या उंदरांनी १९ पैकी १३ विषारी सापांच्या विषाचा यशस्वीपणे सामना केला आहे. उर्वरित सहा सापांच्या विषापासून त्यांना अंशत: संरक्षण लाभले. जगभरात आजघडीला दरवर्षी एक लाख ४० हजार लोकांचा सर्पदंशाने मृत्यू होता. त्याचबरोबर, सर्पदंशामुळे अवयव निकामी होण्याची किंवा कायमस्वरूपी अपंगत्व येणाऱ्यांची संख्या मृतांच्या संख्येच्या तिप्पट आहे. फ्रेडी यांच्या अँटिबॉडीजपासून तयार होणारे अँटिव्हेनम मानवांनी वापरण्यासाठी सिद्ध झाल्यानंतर ही संख्या मोठ्या प्रमाणावर घटण्याची आशा आहे.
हेही वाचा :
गोव्यात चेंगराचेंगरी; सहाजणांचा मृत्यू
पाकिस्तानवर आयात बंदी