shripal sabnis: नवआंबेडकरवादाच्या विकासाची गरज

shripal sabnis

सांगली : जागतिक पटलावर हिंसक कारवाया वाढत आहेत. महासत्तांमध्ये सत्तासंघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भगवान बुद्धाचे अहिंसा आणि सहजीवनाचे तत्त्व जगाला तारणार आहे. ते मानवकेंद्री आहे. याच भूमिकेतून सर्व समाजाला एकत्र बांधणारे आणि एकत्र नेणाऱ्या नवआंबेडकरवादी विचाराच्या विकासाची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. (shripal sabnis)

दीपस्तंभ सांस्कृतिक संघाच्यावतीने येथे आयोजित दुसऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. कोल्हापूर रस्त्यावरील दीपस्तंभ सांस्कृतिक केंद्राच्या ‘क्रांतिसूर्य जोतीराव फुले साहित्य नगरी’त संमेलन पार पडले. ज्येष्ठ लेखक आणि साहित्यिक सचित तासगावकर उद्घाटक होते. उद्घाटनसत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. जगन कराडे होते. साहित्यिक संजय भंडारे स्वागताध्यक्ष होते. जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष दीपककुमार खोब्रागडे प्रमुख उपस्थित होते.(shripal sabnis)

विद्यमान राजकीय आणि सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक संवादाचा धागा बळकट करण्याची गरज व्यक्त करून डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा गांधी, राजर्षी शाहू महाराज यांच्याशी संवादी भूमिका ठेवली. त्यांनी गुरु म्हणून महात्मा फुले, कबीर आणि बुद्ध यांच्याशी नाते ठेवले. मार्क्सच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. या सर्वांशी वैचारिक संवाद साधताना त्यांनी अखेरच्या टप्प्यात मात्र बुद्धाच्या धम्माचा स्वीकार केला. राज्यघटनेच्या माध्यमातून काही अंशी का असेना हे तत्त्वज्ञान अखिल भारतीय पातळीवर नेले. सहजीवन आणि धर्मनिरपेक्षतेचे तत्त्वज्ञान आपल्या राज्यघटनेत समाविष्ट केले. आता आपल्याला यापुढच्या टप्प्यावर आपल्याला जायचे आहे. बुद्ध आणि आंबेडकरी विचाराचा तो नवा टप्पा असेल. तो व्यापक मानवकेंद्री आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा असेल, म्हणून हा विचार अधिक व्यापक करण्याची गरज आहे.(shripal sabnis)

मार्क्स, गांधींइतकेच बाबासाहेबही जागतिक

डॉ. सबनीस म्हणाले, मार्क्स आणि गांधींइतकेच बाबासाहेबही जागतिक आहेत. मार्टिन ल्यूथर किंगच्या तोलाचे काम बाबासाहेबांनी केले आहे. मार्क्सने श्रमिकांचा विचार केला, गांधी अहिंसा आणि शांततेचे पुरस्कर्ते आहेत. बाबासाहेबही श्रमिक, अहिंसा आणि शांततेचा पुरस्कार करतात, आग्रह धरतात. तथापि, श्रमिकांचा विचार करताना त्यांनी हिंसेला थारा दिलेला नाही. त्यांची मानवमुक्तीची संपूर्ण क्रांती ही अहिंसेच्या पायावर म्हणजे बुद्धाच्या धम्माच्या पायावर उभी आहे.

साहित्यिक सचित तासगावकर यांनी आंबेडकरी साहित्य हे विद्रोहाचे साहित्य आहे. ते नवजागृतीचे तत्त्वज्ञान आहे. आंबेडकरी साहित्यिकांनी याचे भान ठेवले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

दीपस्तंभ सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. जगन कराडे यांनी स्वागत करून संघाच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. रोजगार आणि व्यवसायवृद्धी त्याचबरोबर वैद्यकीय शिबिरांच्या माध्यमातून आंबेडकरी समाज सर्वंकष पातळीवर खंबीरपणे उभा राहण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.

Related posts

Karun Nair : करुण नायरचा विश्वविक्रम

woman jumps:आणि तिने रिक्षातून उडी मारली

human barbie: तारुण्य टिकवण्यासाठी तिने मुलाचे…