Shivspandan : ‘संविधान एक है; सब के लिए सेफ है’

Shivspandan

Shivspandan


कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवाला रविवारी, २३ फेब्रुवारी रोजी शोभायात्रेने मोठ्या जल्लोषाच्या वातावरणात प्रारंभ झाला.
शोभायात्रेत ‘संविधान एक है; सब के लिए सेफ है’, ग्रामीण व कृषीसंस्कृतीचे दर्शन, बालमजुरी निर्मूलन, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आणि कर्करोग, योग-प्राणायामाचे महत्त्व, सामाजिक सलोखा, स्त्री भ्रूण हत्या निर्मूलन अशा अनेक विषयांवरील सादरीकरण करण्यात आले.महोत्सवात विद्यापीठाच्या विविध अधिविभागांतील सुमारे ५०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग दर्शविला आहे. (Shivspandan)
सकाळी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आला. विद्यार्थी विकास विभागाचे माजी संचालक डॉ. प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते शोभायात्रेचे उद्घाटन करण्यात आले. विविध अधिविभागांच्या संघांनी अतिशय कल्पकतेने प्रबोधनपर विषयांचे सादरीकरण शोभायात्रेद्वारे केले.
राजस्थानी, बंगाली, गुजराती, पंजाबी वेशभूषेतील विद्यार्थिनींनी त्या त्या राज्यांतील पारंपरिक नृत्यांची झलक सादर केली. जोतिबाची सासनकाठीही नाचवण्यात आली. विविध गायक कलाकारांच्या वेशभूषेतील कलाकारांनी त्यांच्या गायन कलेचेही दर्शन घडविले. या शोभायात्रेच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ साहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्यासह लता मंगेशकर, आशा भोसले, पंडित भीमसेन जोशी, तबलानवाज झाकीर हुसैन, बालगंधर्व, चित्रमहर्षी बाबूराव पेंटर, फाल्गुनी पाठक, राधाकृष्ण, वासुदेव, मीरा अशा व्यक्तीरेखाही पारंपरिक वेशभूषेद्वारे विद्यापीठात अवतरल्या. (Shivspandan)
शोभायात्रेनंतर प्राणीशास्त्र अधिविभाग सभागृहात शिवस्पंदन महोत्सवाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांच्या विकासाबरोबरच संवादकौशल्याच्या वृद्धीकडेही जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. जे विद्यार्थी कलागुणसंपन्न असतात, ते सादरीकरण करतातच; पण, अंगी कला असूनही सादरीकरणाबाबत संभ्रमित असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आत्मविश्वास देऊन सामावून घेणे, हे शिवस्पंदनचे खरे प्रयोजन आहे. (Shivspandan)
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, दर शंभर मैलांवर संस्कृती बदलते, पण मानवी जीवनमूल्ये मात्र कायम राहतात. ही मूल्ये टिकवून ठेवण्याची जबाबदारी नव्या पिढीवर आहे. विज्ञान आणि संस्कृती यांच्या मिलाफातून ही जीवनमूल्ये वृद्धिंगत करण्याविषयी कुतूहल असणे गरजेचे आहे. त्यातूनच नवनिर्मितीची शक्यता असते. भारताचे विविधतेतून एकतेचे मूल्य शिवस्पंदनसारख्या उपक्रमांतून अधोरेखित केले जाते. (Shivspandan)
महोत्सवाचे समन्वयक डॉ. नितीन कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. मीना पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी आभार मानले. यावेळी क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, शाहीरविशारद आझाद नायकवडी, मनिषा नायकवडी, डॉ. मदनलाल शर्मा, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. सुनील गायकवाड, डॉ. एस.आर. यन्कंची, डॉ. के.डी. कुचे, डॉ. विनोद ठाकूरदेसाई, डॉ. एस.एम. भोसले, डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. कविता वड्राळे, डॉ. सुखदेव उंदरे, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. एस.टी. कोंबडे, डॉ. सुमेधा साळुंखे, संग्राम भालकर, दीपक बीडकर, विजय टिपुगडे, बबन माने, सुरेखा अडके आदींसह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Shivspandan)
उद्घाटन समारंभानंतर दिवसभर सुगम गायन, एकल लोकवाद्य वादन आणि समूहगीत स्पर्धा पार पडल्या. त्याचप्रमाणे रांगोळी आणि स्थळचित्रण स्पर्धा संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात पार पडल्या. या सर्वच स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. (Shivspandan)
हेही वाचा :

विजय सेतुपतीकडून सिनेकामगारांसाठी सव्वा कोटी

‘छावा’ पाचशे कोटीच्या दिशेने!

Related posts

Mahavir

Mahavir : लोकवर्गणीतून महावीर अध्यासनासाठी एक कोटी ११ लाखांचा निधी जमा

Sapkal attacks on BJP

Sapkal attacks on BJP: हिंदी, हिंदूराष्ट्र लादण्याचा भाजपचा अजेंडा

Opposition attacks on Mahayuti

Opposition attacks Mahayuti: महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री आहे का?