Convocation : पदवीधर हे नाविन्य आणि प्रगतीचे राजदूत

Convocation

Dr Ashish Lele

कोल्हापूर : प्रतिनिधी : आजच्या हवामान बदल किंवा जागतिक युद्धांसारख्या आव्हानांमुळे अनेकदा सामाजिक-आर्थिक विषमता निर्माण होतात. म्हणूनच, ही आव्हाने कमी करण्यासाठी पदवीधरांची भूमिका महत्त्वाची आहे. शिक्षण आणि कौशल्याने सुसज्ज होऊन नव्या जगात पाऊल ठेवत असताना आपण केवळ पदवीधर नाही; तर बदल, नाविन्य आणि प्रगतीचे राजदूत आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे, असे मत सी.एस.आय.आर.-एन.सी.एल.चे संचालक डॉ. आशीष लेले यांनी व्यक्त केले. (Convocation)

शिवाजी विद्यापीठाच्या ६१ व्या दीक्षान्त समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलपती तथा राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. ए. एन. जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.  राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते बंडू कोळी याला राष्ट्रपती सुवर्णपदक देऊन तर क्रिशा नोरोन्हा हिला कुलपतीपदक देऊन गौरवण्यात आले. (Convocation)

डॉ. लेले म्हणाले, पदवी घेतलेल्या तुमच्यापैकी अनेकांना सामाजिक गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी नेतृत्व करावे लागेल. आव्हाने पेलण्यासाठी मानव्यशास्त्र, सामाजिक विज्ञान आणि कायदा पदवीधरांना विज्ञान आणि अभियांत्रिकी पदवीधरांइतकीच महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे.

डॉ. लेले यांनी शिवाजी विद्यापीठाकडून विद्यार्थीकेंद्रीत नवीन अभ्यासक्रम, नामवंत विद्यापीठांना संस्थांसोबत केलेल्या करार आणि विविध उपक्रमांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी प्रवासाच्या पुढील अध्यायात प्रवेश करताना या प्रतिष्ठित संस्थेने  रुजवलेले ज्ञान, कौशल्ये आणि मूल्ये घेऊन जाणार आहात असे सांगून डॉ. लेले यांनी वर्गात आणि बाहेर शिकलेल्या आठवणी, मैत्री आणि अमूल्य धडे जपण्याचा सल्ला दिला. (Convocation)

कोल्हापुरात जागतिक दर्जाचे शूटिंग रेंज व्हावे : राज्यपाल

शिवाजी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज केले पाहिजे. शिवाजी विद्यापीठ गुणवत्तेचा वारसा कायम ठेवेल आणि समाजाच्या प्रगतीत योगदान देत राहील, असा विश्वास राज्यपाल तथा कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.

राधाकृष्णन म्हणाले, कोल्हापूर ही लोकराजा छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे.  शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी, विशेषतः सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समुदायांसाठी राबवलेल्या प्रगतशील धोरणांसाठी कोल्हापूर देशभर ओळखले जाते. त्यामुळे तुम्ही धैर्य, सामाजिक न्याय आणि जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्टतेच्या महान वारशाचे भाग्यवान वारसदार आहात. (Convocation)

कोल्हापुरात शेती, उद्योग, आरोग्यसेवा, शिक्षण आणि इतर क्षेत्रांमध्ये विकासाची प्रचंड क्षमता आहे. शाहू महाराजांनी क्रीडा क्षेत्राला विशेषतः कुस्तीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले. आता उत्कृष्ट क्रीडा केंद्र आणि जागतिक दर्जाचे शूटिंग रेंज येथे असावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शेक्षणिक धोरण टर्निंग पॉइंट ठरणार : चंद्रकांत पाटील

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे, तर शिवाजी विद्यापीठ या धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये राज्यात अग्रेसर असल्याचे सांगून विद्यापीठाचे कौतुक केले. भारताच्या प्रगतीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० एक महत्त्वपूर्ण टर्निंग पॉईंट ठरणार आहे, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला. (Convocation)

ते म्हणाले, आजच्या युगात तंत्रज्ञानाचा वापर आणि नवकल्पनांचे महत्त्व अधिकाधिक वाढले आहे. शिवाजी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्वप्नांची दिशा दिली आहे. विद्यार्थ्यांनी नेहमीच नवे विचार आणि नवीन तंत्रज्ञान स्वीकारून प्रगतीची शिखरे गाठावीत. समाजासाठी, राष्ट्रासाठी एक आदर्श नागरिक बनून आपण योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के यांनी वार्षिक अहवालात विद्यापीठाने राबवलेले नवीन उपक्रम, अभ्यासक्रम आणि प्रगतीचा आढावा घेतला.

हेही वाचा :
विवेकी योद्धा
मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरण साखळीची हानी

Related posts

Samiti meeting with pawar : उच्चाधिकार समितीची पुनर्रचना करा

weapons seized: कुपवाडात मोठा शस्त्रसाठा जप्त

Pope Buried : शोकाकुल वातावरणात पोप फ्रान्सिस यांचा दफनविधी