जात अस्मितेच्या राजकारणाला बळकटी

-नामदेव अशोक पवार

भारताच्या राजकीय प्रक्रियेवर अनेक घटकांचा प्रभाव सातत्याने पडत असतो त्यामध्ये धर्म, भाषा, जात, पंथ आणि वर्ग इत्यादींचा समावेश होतो. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात व समाजकारणात जातींची भूमिका महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. जात व राजकारण समजून घेताना आतापर्यंत झालेले अभ्यास म्हणजे जातीचे राजकीयीकरण, जातीय संघटनांच्या राजकारणाचा अभ्यास, वेगवेगळ्या सुट्ट्या जातीच्या राजकारणाचा अभ्यास, जातीच्या राजकीय सौदेबाजीच्या क्षमतेचा अभ्यास, निवडणुकांच्या संदर्भात जातीचा अभ्यास.. अशा स्वरूपाचा अभ्यास झालेला आहे.  त्याचबरोबर दलितांच्या आग्रही आविष्काराच्या अभ्यासाला सुरुवात झालेली आहे. मराठा क्रांती मोर्चा हे देखील मराठा जातीच्या आग्रही आविष्काराचे स्वरूप ठरते.

समकालीन सामाजिक शास्त्रांच्या चर्चाविश्वामध्ये जात व राजकारण यांच्या अभ्यासासंदर्भात  जाती संघटना ( Caste Organization) आणि ‘जातीचा आग्रही आविष्कार’ (Caste Assertion) यांचे अभ्यास मध्यवर्ती आहेत. कोणतेही संशोधन हे नवीन ज्ञान निर्मितीसाठी केले जाते. समाजातील प्रश्नांचा गुंता सुटावा यासाठी सामाजिक प्रश्नांचे समाजशास्त्रीय पद्धतीने संशोधन करणे यासाठीच विद्यापीठांची निर्मिती झालेली आहे. समाजबांधणी व समाजउभारणी यामध्ये सामाजिक शास्त्राचे खूप मोठे योगदान आहे. हे काम अधिक चांगले करायचे असेल तर दर्जेदार संशोधन होणे गरजेचे आहे आणि या दर्जेदार संशोधनातील निष्कर्षाचा आणि शिफारशीचा विचार करून  शासनाने धोरणे राबवली पाहिजेत. परंतु वास्तवात विद्यापीठीय संशोधन शासनाच्या धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचत नाही. याबद्दल दोन्ही पातळीवर अनास्था पाहायला मिळते. यामुळे समाजातील संशोधनाच्या मार्गाने मूळ प्रश्न सोडवणे हा जो हेतू आहे तोच कुठेतरी दूर जात आहे का? अशी शंका घ्यायला पुरेपूर जागा आहे.

सामाजिक शास्त्रातील जातींच्या अभ्यासाचा पहिला टप्पा म्हणजे  जाती संघटना अभ्यास  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रातील वेगवेगळ्या विभागांतर्गत वेगवेगळ्या संशोधकांनी जाती संघटनेचा अभ्यास केलेला आहे. पवार प्रकाश (१९९६) अखिल भारतीय मराठा महासंघ, देशमुख आप्पासाहेब (२००६) सोलापूर जिल्ह्यातील लिंगायत समाजाच्या जात संघटना, घोळवे सोपान (१९९०) महाराष्ट्रातील वंजारी समाजाचे राजकारण, घोळवे सोमनाथ (२००८) महाराष्ट्रातील वंजारी समाजाच्या जात संघटनांचा अभ्यास, पवार नामदेव (२००९) मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेड : एक चिकित्सक अभ्यास विशेष संदर्भ मराठवाडा, घोळवे सोमनाथ (२०१३) महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील धनगर समाजाच्या राजकारणाचा तुलनात्मक अभ्यास, नाबदे विलास (२००८) अहमदनगर जिल्ह्यातील माळी समाजाच्या राजकारणाचा अभ्यास, घोटाळे विवेक (२०१७) मराठा वर्चस्वाचे बदलते
आकृतीबंध इ. अभ्यास वानगीदाखल देता येतील. राज्यशास्त्राबरोबरच समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र या वेगवेगळ्या सामाजिक शास्त्रामध्ये सुद्धा जातीचा अभ्यास झालेला आहे. या अभ्यासामध्ये संशोधकांनी जाती संघटनांचा उदय कसा होत गेला, जाती संघटनांची रचना, त्यांची विचारप्रणाली व त्यांनी उचललेले जात अस्मितेचे  मुद्दे यामुळे जातीची राजकीय, सांस्कृतिक, भौतिक आणि सामाजिक भूमिका व त्याचे स्वरूप कसे बदलत गेले इ.
प्रश्नाचा अभ्यास केलेला आहे.

जाती संघटनांचा उदय

१९९० नंतर मंडल-मस्जिद-मार्केट-मंदिर यांच्या एकत्रित पार्श्वभूमीवर, जातीचे १९९० पूर्वीचे स्वरूप बदलून संख्येने मोठे असणाऱ्या जातींमध्ये नवनवीन जात संघटना उदयास येऊ लागल्या. जात संघटना निर्मितीची प्रक्रिया छोट्या-छोट्या जातीमध्ये पण सुरू झाली. राजकीय जात जाणिवेच्या भूमिकेतून निवडणूक राजकारणात यश मिळवता येईल या  जाणिवेतून जातीचे आर्थिक व सामाजिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न जात संघटना करू लागल्या. त्यामुळे त्यांना जातीमध्ये विस्तारास वाव मिळाला.

जातींची नवीन भूमिका

जाती या जातीची सामूहिक ओळख, जातींच्या लहान गटांच्या संघटना, जातींच्या प्रतीकांचे राजकारण आणि आरक्षण मागणी इत्यादी मुद्द्यांच्या आधारे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक हक्कासंदर्भात आग्रही भूमिका मांडत आहेत. ही जातीची नवीन भूमिका आहे. या मुद्द्यांच्या आधारे जाती सत्तास्थानात सहभाग मिळवत आहेत.

भारतीय लोकशाही तळागाळातील समूहापर्यंत पोहोचली. त्यातून जे समूह राजकीयदृष्ट्या सक्रिय नव्हते, त्यांच्यामध्ये  नवे राजकीय आत्मभान व सत्तेत वाटा मागण्याची इच्छा निर्माण झाली. भारतीय समाजाची विभागणी जातीच्या  आधारावर होत असल्याने जातीय अस्मिता तीव्र बनून विविध जातीमध्ये जातभान या काळात निर्माण झाले. त्यातून भारतीय राजकारणात जाती अस्मितेच्या राजकारणाला महत्त्व मिळाले. जातींच्या संघटना उभारणे, जातीतील पराक्रमी पुरुषांचा आणि स्त्रियांचा राजकीय हेतूने वापर करणे, पुतळे उभारणे, जातीचे झेंडे तयार करणे, जातीचे प्रतीके निर्माण करणे, जातीची अधिवेशने, मेळावे, परिषदा आयोजित करणे इ. माध्यमातून या जातीय अस्मिता तीव्र बनत गेल्या व अस्मितेच्या राजकारणाला बळ मिळत गेले.

जातीच्या सौदेबाजी क्षमतेचा आविष्कार

१९९० नंतर एका बाजूला जात संघटनांचा उदय होत असतानाच, दुसऱ्या बाजूला बहुध्रुवीय स्पर्धात्मक निवडणुकांचा उदय व स्पर्धात्मक पक्षपद्धती अस्तित्वात आली. त्यामुळे अनेक सीमांतिकृत व स्थानिक जाती या राजकारणाचा सक्रिय भाग होण्याची शक्यता निर्माण झाली. यातूनच जातींच्या सौदेबाजी शक्तींचा आविष्कार होऊ लागला. परिणामी जातीची राजकीय, सांस्कृतिक, भौतिक आणि सामाजिक भूमिका व त्याचे स्वरूप बदलत आहे.
समकालीन जातीचे गुंतागुंतीचे बदलते स्वरूप वासाहतिक काळातील जातिव्यवस्थेच्या पारंपरिक संघटनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल झालेले आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या काळात उदार लोकशाही, भांडवलशाही विकासाचे मॉडेल, राजकीय अर्थव्यवस्था इत्यादींच्या स्वीकारामुळे या बदलात गुंतागुंत होताना दिसते. तसेच औद्योगीकरण, शहरीकरण वाढीबरोबर एकाच वेळी जातीमध्ये अनेक बदल होत होते.  यातील पहिला बदल म्हणजे एका जातीअंतर्गत स्तरीकरण होत असतानाच जाती-जाती अंतर्गत स्तरीकरण होत होते. दुसरा बदल म्हणजे १९९० नंतर जातींच्या अस्मिता निर्मितीस प्रारंभ झाला, यांच्या

पाठीशी १९९१ च;नव आर्थिक

धोरण आणि ओबीसी राजकारणाचा उदय' ही पार्श्वभूमी दिसते. यामुळे जातीच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊन यातून जातीय अस्मितांची घडण झाली. तिसरा बदल म्हणजे जातींमधील व्यवसायातील विविधतेमुळे अर्थव्यवस्थेत  प्रत्येक जातीचे विविध पातळीवर स्तरीकरण झालेले दिसते. या दोन्ही प्रक्रियेवर अनेक घटकांचा प्रभाव पडलेला दिसतो. जसे परंपरागत समाजातील स्थान आणि जातींच्या कौशल्यांचा शहरी जीवनात जसा उपयोग झाला तसेच,  शिक्षणाची पातळी आरक्षणाच्या धोरणाचे फायदे इत्यादींमुळे स्तरीकरणाची प्रक्रिया प्रत्येक जातीच्या बाबतीत वेगवेगळ्या पद्धतीने आकार घेताना दिसते. चौथा बदल म्हणजे व्यवसायातील विविधता आणि अर्थ व्यवहारातील भिन्नीभवन यांची जातींची एकसंघ अस्मिता खंडित करण्यात महत्त्वाची भूमिका राहिली. जातीअंतर्गत आणि आंतरजातीय एकसंधता त्यामुळे धोक्यात आली.

थोडक्यात १९९० नंतर जाती संघटनांच्या उदयानंतर जातींची बदलती भूमिका व यामुळे सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक बदलत जाणारी स्थित्यंतरे याचा अभ्यास या टप्प्यावर अभ्यासकांनी केला आहे. जातीचा आग्रही अविष्कार सामाजिक शास्त्रातील जातींच्या अभ्यासाचा दुसरा टप्पा म्हणजे जातीचा आग्रही आविष्कार. जातीच्या आग्रही आविष्काराचा अभ्यास म्हणजे विविध क्षेत्रातील  कृतिशीलतेचा अभ्यास होय, अशी आग्रही अविष्काराची व्याख्या केली जाते.

दलित जातीच्या आग्रही आविष्काराच्या अभ्यासाला सुरुवात झालेली आहे. प्रकाश लुईस यांच्या मते भेदभाव, वंचितता, बहिष्कृतता आणि शोषण हे प्रत्येक समाजाचा स्थायीभाव असतो. यातूनच नैराश्य, क्रोध आणि आक्रमकतानिर्माण होते. सामान्यत: जे अन्याय व वंचितता यांचे बळी असतात ते बंड करतात. या प्रक्रियेतून आग्रही आविष्कार निर्माण होतो याच आग्रही आविष्कारातून लोक चळवळी उदयास येतात. लुईस यांनी अशी आग्रही आविष्काराची व्याख्या केलेली आहे.

लुईस यांनी तीन मुद्द्याच्या आधारे दलितांचा आग्रही आविष्कार स्पष्ट केलेला आहे. एक जातीय विषमता दोन जाती अस्मिता आणि तीन लोकप्रिय प्रतीक. उदा. उत्तर प्रदेशात बसपने नवीन जिल्ह्यांना काही व्यक्तींची नावे  दिलेली आहेत. यात शाहू महाराज, महामाया, रोहिदास इ. पै यांनी उत्तर प्रदेशातील दलितांच्या राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील आग्रही आविष्काराचा अभ्यास केलेला आहे. त्यांनी राजकीय क्षेत्रातील आग्रही आविष्काराचा अभ्यास तीन प्रकारात केला आहे. पहिला प्रकार शेड्युल्ड कास्ट फेडरेशन, दुसरा प्रकार आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आणि तिसरा प्रकार बहुजन समाज पक्ष या टप्प्यावर बसपाने सामाजिक बदलाऐवजी सत्ताप्राप्तीसाठी त्यांना संघटित  करून आग्रही आविष्कार घडवला. पै यांनी  या आविष्काराच्या तीन कारणाचा अभ्यास केलेला आहे. एक १९९० च्या दशकातील भारतीय राजकारणाची लोकशाहीकरणाची प्रक्रिया, दोन जाती संघटनांचा उदय व दलितांच्या जाती संघटनांमध्ये शिक्षित व आर्थिकदृष्ट्या  सुधारलेली पिढी दिसते व हेच आग्रही आविष्काराचे वाहक म्हणून कार्य करतात. तीन विषम अशी सामाजिक आर्थिक व्यवस्था.

Related posts

ताठ कण्याच्या विदुषी : रोमिला थापर

विहिरीत पडलेला माणूस

लाडकी बहीण योजनेचा खरा परिणाम