मुंबईः मुंबईतील पत्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाची सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने आरोपीच्या वकिलाला चांगलेच फटकारले. न्यायालयाने म्हटले आहे, की एका अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला आणि तुम्ही पीडितेशी आरोपीचे अधिकार संतुलित करण्याची मागणी करत आहात, तुम्ही हे कसे करू शकता? या खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी करत होते.
सुनावणीदरम्यान न्या. शर्मा म्हणाले, की यापेक्षा क्रूर केस मी पाहिलेली नाही. न्या. त्रिवेदी म्हणाल्या, की हे ओपन अँड शट केस आहे. सर्व साक्षीदार तुमच्या विरोधात आहेत, हा उच्च न्यायालयाचा सविस्तर निर्णय आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आरोपींनी केलेल्या अपिलावर सर्वोच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली. या प्रकरणाची सुनावणी मंगळवार, २६ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. २०१३ मध्ये मुंबईत २३ वर्षीय महिला फोटो जर्नालिस्टवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला. महिला पत्रकार संध्याकाळी फोटो काढण्यासाठी तिच्या मित्रासोबत लोअर परळ येथील शक्ती मिल परिसरात गेली होती. त्यादरम्यान आरोपींनी पीडितेच्या मित्राला बंधक बनवून बेल्टने बांधले. त्यानंतर महिलेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला. या आरोपींपैकी एक किशोरवयीन होता.
सामूहिक बलात्कारानंतर पीडित महिलेची प्रकृती अत्यंत वाईट झाली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली. त्यांना पकडण्यासाठी सुमारे २० पथके तैनात करण्यात आली होती. सर्व आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. त्या वेळी या प्रकरणावरून बराच गदारोळ झाला होता. या घटनेमुळे संतप्त झालेल्या शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईतील एन. एम.जोशी पोलिस ठाण्याबाहेर निदर्शने केली, तर मुंबईतील पत्रकार संघटनेनेही मोर्चा काढला होता.