वायनाड, वृत्तसंस्था : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. प्रियांका गांधी ६ लाख २२ हजार ३३८ मतांनी विजयी झाल्या आहेत. सीपीआयचे सत्यन मोकेरी यांना २ लाख ११ हजार ४०७ मते मिळाली. त्याचबरोबर भाजपच्या नव्या हरिदास तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना १ लाख ९ हजार ९३९ मते मिळाली.
मतमोजणीच्या सुरुवातीपासून प्रियांका गांधी यांनी वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत आघाडी घेतली होती. प्रत्येक फेरी दरम्यान त्यांच्या आघाडीत वाढ होत गेली. त्यांनी सीपीआयचे सत्यन मोकेरी यांना चार लाखांहून अधिक मतांनी पिछाडीवर टाकून विजय मिळवला. प्रियांका गांधी या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. वायनाडच्या पोटनिवडणुकीत एकूण १६ उमेदवार रिंगणात होते, परंतु प्रियांका गांधी यांनी घेतलेल्या विक्रमी मताधिक्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाली.
राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय नोंदवला होता. राहुल गांधींनी सीपीआयच्या अॅनी राजा यांचा ३ लाख ६४ हजार ४२२ मतांनी पराभव केला होता, तर भाजप उमेदवार के. सुरेंद्रन यांना १ लाख ४१ हजार ४५ मते मिळाली होती. हा फरक भारतीय निवडणूक इतिहासातील सर्वात मोठ्या विजयाच्या फरकांपैकी एक होता. राहुल गांधींना सुमारे ७ लाख ६ हजार ३६७ मते मिळाली होती, तर पी. पी. सुनीर यांना सुमारे २ लाख ७४ हजार ५९७ मते मिळाली होती.