जमीर काझी : मुंबई : मुंबईत बांगलादेशी रोहिंग्याची मोठया प्रमाणात घुसखोरी केली असल्याची बोंबाबोंब करणाऱ्यांनी पहिल्यांदा भारतात राहत असलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना बाबत बोलावे, असा घणाघात सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते व मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख नवाब मलिक यांनी बुधवारी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसने आज मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने मुंबईकरांसाठी सर्वसमावेशक जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आम्हाला आमच्या मर्यादेची,शक्तीस्थळाची कल्पना असल्याचे सांगितले. (Nawab Malik criticizes BJP)
मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबईत ३० वर्षात हिंदूंची लोकसंख्या २० टक्के घटली असून मुस्लिम १३ टक्क्यांनी वाढली असून बांगलादेशी व रोहिंगे मोठ्या प्रमाणात राहत असल्याचा दावा केला आहे. त्याबाबत नवाब मलिक यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले,’ यांचे खोटे बोल पण रेटून बोल हा प्रकार सुरू असतो. देशात गेल्या ११ वर्षात आणि राज्यात मधील अडीच वर्षे वगळता भाजपाचे सरकार आहे. घुसखोराबाबत बोंबाबोंब करणाऱ्यांनी आधी भारतात राहत असलेल्या शेख हसीना बाबत भूमिका मांडावी, असा टोला साटम यांनी लगावला. (Nawab Malik criticizes BJP)
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार तटकरे म्हणाले, महानगरपालिकांच्या निवडणुकीत महायुती म्हणून कोल्हापूर, जळगावमध्ये एकत्रित लढत आहोत, तर मुंबईत भाजप आणि शिवसेना एकत्रित लढत आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस ९४ जागांवर स्वतंत्रपणे लढत आहे. आम्ही सर्वधर्मसमभाव विचाराचे पुरस्कर्ते असताना जाणीवपूर्वक २३ अल्पसंख्याक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिल्याचा आरोप आमच्यावर करण्यात आला आहे. मात्र ९४ उमेदवारांमध्ये ५६ उमेदवार हे मराठी भाषिक, २१ उत्तर भारतीय, २४ मुस्लिम, सहा उमेदवार ख्रिश्चन, तेलगू, तमिळ, बोरा समाजाचे आहेत. याशिवाय यामध्ये ५० महिला उमेदवारांचा समावेश आहे. शिवाय ओबीसी १७, अनुसुचित जातीचे १२ असल्याची माहितीही सुनिल तटकरे यांनी दिली. (Nawab Malik criticizes BJP)
पत्रकार परिषदेला आमदार सना मलिक-शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी उपस्थित होते.