बेळगाव : दिवाळी पाडव्याच्या दिवशी माय लेकराच्या आत्महत्येची दुर्दैवी घटना घडली आहे. पतीची मारहाण आणि सासू सासऱ्यांचा जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.
हिंडलगा गणपती जवळ असणाऱ्या अरगन तलावामध्ये आई आणि मुलाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. कविता बसवंत जुने बेळगावकर आणि समर्थ बसवंत जुने बेळगावकर (रा. कलखांब) अशी मयत आई आणि मुलाचे नाव आहेत.
कॅम्प येथील गणपती मंदिराच्या जवळील अरगन तलावात दोन मृतदेह आढळले. मिलिटरी प्रशासनाने याची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हर्फ आणि फेसबुक फ्रेंड सर्कल या संघटनेच्या माध्यमातून तलावातून मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यावेळी मृतदेहासोबत मिळालेल्या सुसाईड नोट मध्ये नवऱ्याने दारू पिऊन मारहाण केल्याने आणि सासू-सासर्यांनी त्रास दिल्याने मुलगा आणि आपण आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे.
शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच हर्फ आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कल संघटनेचे बसवराज हिरेमठ, संतोष दरेकर, अवधूत तुडवेकर आदींनी प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. गेल्या दोन-तीन दिवसात आजूबाजूच्या पोलिस स्थानकात बेपत्ता झालेल्या यादीनुसार तपास केला असता कलखांब येथील आई मुलगा बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले आणि त्यानुसार ओळख पटवण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना बोलवण्यात आले होते. नातेवाईकांनी ओळख पटवल्यानंतर मृतदेह शव विच्छेदनासाठी हलवण्यात आले.सदर घटनेची कॅम्प पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.