मोदी-जिनपिंग यांच्यात पुन्हा चर्चेची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : रशियातील ‘ब्रिक्स’ बैठकीनंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी-२० शिखर परिषदेत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत आणखी एक बैठक होऊ शकते.

गलवान खोऱ्यातील संघर्ष मंदावल्याने, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांमधील अधिक चांगल्या समन्वयादरम्यान ही बैठक महत्त्वाची ठरू शकते. सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे, की दोन्ही बाजू शिखर परिषदेच्या वेळी भेटण्याची शक्यता तपासत आहेत. सरकारी सूत्राने सांगितले की सध्या चीनला जी-२० शिखर परिषदेच्या वेळी दोन्ही नेत्यांमधील भेटीत रस आहे. बैठकीची शक्यता पडताळून पाहण्याची तयारी सुरू आहे. ही बैठक झाली तर दोन्ही देश पर्यावरण, जागतिक अर्थव्यवस्था आणि सुरक्षेशी संबंधित आव्हानांवर चर्चा करतील. या काळात द्विपक्षीय व्यापार चर्चेच्या केंद्रस्थानी राहू शकतो.

दरम्यान, अमेरिकेतील सत्तापरिवर्तनानंतर नव्या वर्षात संपूर्ण जगात एक नवी परिस्थिती निर्माण होणार असल्याने युक्रेन युद्धाबाबतही नवी परिस्थिती निर्माण होऊ शकते. या परिस्थितीत जिनपिंग-मोदी यांची भेट अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. ट्रम्प यांचा चीन, पाकिस्तान आणि आशियाबाबत सध्याचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन आहे. युक्रेन युद्धाबाबतही ट्रम्प यांचे मत वेगळे आहे. अशा स्थितीत ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेचे रशियासोबतचे संबंध सुधारण्याची शक्यता अधिक असून ते चीनबाबत आक्रमक भूमिका स्वीकारतील. यापूर्वीचे ट्रम्प सरकार चीनला लगाम घालण्यासाठी भारताच्या बाजूने उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत मोदी-जिनपिंग यांच्या संभाव्य भेटीबाबत राजनैतिक खळबळ उडणे स्वाभाविक आहे.

मोदी १६-१७ तारखेला नायजेरियाला भेट देणार आहेत.  आर्थिक संबंध सचिव डम्मू रवी यांनी एका निवेदनात सांगितले, की भारताची ही भेट १७ वर्षांनंतर होत आहे. ते म्हणाले, की नायजेरियाचे राष्ट्रपती बोला अहमद टिनुबू यांच्या निमंत्रणावरून मोदी नायजेरियाला भेट देत आहेत. डॉ. मनमोहन सिंग यांनी ऑक्टोबर २००७ मध्ये शेवटची भेट दिली होती. या काळात दोन्ही देशांदरम्यान धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित झाली. नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष टिनुबू हे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जी-२० शिखर परिषदेसाठी भारत भेटीवर आले होते. १७ नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी प्रेसिडेन्शियल व्हिला येथे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर ते राष्ट्रपती टिनुबू यांच्याशी एक-एक बैठक घेतील आणि त्यानंतर द्विपक्षीय संबंध आणि त्याच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यासाठी शिष्टमंडळस्तरीय चर्चा करतील.

बायडेन यांच्यांशी केवळ औपचारिक भेट

जी-२० परिषदेच्या निमित्ताने मोदी हे बायडेन यांचीही भेट घेणार आहेत. अमेरिकेत सरकार बदलले असून, ट्रम्प जानेवारीत बायडेन यांच्या जागी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार असल्याने या द्विपक्षीय बैठकीतून कोणतीही फार अपेक्षा नाही. सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे, की अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर ट्रम्प यांची भूमिका बायडेन यांच्यापेक्षा वेगळी आहे, त्यामुळे कोणताही देश कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी नवीन सरकारच्या आगमनाची प्रतीक्षा करेल.

Related posts

Sheikh Hasina : शेख हसीनांना आमच्याकडे सोपवा

Rahul gandhi : सोमनाथची पोलिसांकडूनच हत्या

Python near Hostel: शंभर किलो अजगराचा गर्ल्स होस्टेलजवळ डेरा