Mensik Wins : जोकोविचला हरवून मेन्सिक विजेता

Mensik Wins

Mensik Wins

मायामी : चेक प्रजासत्ताकचा १९ वर्षीय टेनिसपटू जेकब मेन्सिकने मायामी ओपन टेनिस स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्याने सर्बियाचा २४ ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या नोव्हाक जोकोविचचा ७-६(७-४), ७-६(७-४) धक्कादायक पराभव केला. मेन्सिकचे हे पहिलेच एटीपी विजेतेपद ठरले. (Mensik Wins)

या स्पर्धेमध्ये प्रवेश करताना जोकोविच जागतिक क्रमवारीत पाचव्या, तर मेन्सिक ५४ व्या स्थानावर होता. स्पर्धेसाठी जोकोविचला चौथे मानांकन होते, तर मेन्सिक बिगरमानांकित होता. जोकोविचने यापूर्वी सहावेळा ही स्पर्धा जिंकली होती. २०१६ नंतर प्रथमच जोकोविचने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. त्याचबरोबर, अंतिम फेरीपर्यंत त्याने या स्पर्धेत एकही सेट गमावला नव्हता. या सर्व बाबी लक्षात घेता अंतिम फेरीमध्ये साहजिकच जोकोविचचे पारडे जड मानले जात होते. जोकोविचच्या कारकिर्दीतील विजेतेपदांची संख्या ९९ झाली असल्यामुळे ही स्पर्धा जिंकून तो विजेतेपदांचे शतक साजरे करणार का, याविषयीही उत्सुकता होती. प्रत्यक्ष अंतिम सामन्यात मात्र मेन्सिकने जोकोविचचे मनसुबे धुळीस मिळवले. (Mensik Wins)
पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना सहा तास उशीरा सुरू झाला. अंतिम सामन्याचे दोन्ही सेट चुरशीचे झाले. दोन्ही सेटचा निकाल टायब्रेकरमध्ये लागला आणि हे दोन्ही टायब्रेकर मेन्सिकने ७-४ असे जिंकले. या स्पर्धेत त्याने एकूण सात सेट टायब्रेकरमध्ये जिंकले. या सामन्यात मेन्सिकने एकूण १४ बिनतोड सर्व्हिस केल्या. मेन्सिकअगोदर टीम मायॉटने १९८५ मध्ये जागतिक क्रमवारीत ४६ व्या स्थानी असताना ही स्पर्धा जिंकली होती. तो विक्रम मेन्सिकने मागे टाकला. या विजेतेपदामुळे मेन्सिकच्या जागतिक क्रमवारीतही सुधारणा होणार असून नव्या क्रमवारीनुसार तो २४ व्या स्थानी झेप घेईल. (Mensik Wins)

हेही वाचा :
राजस्थानने खाते उघडले

Related posts

Gold price  : ‘सोनि’याचा वेलू गेला ‘लाखा’वरी

JD Vance Visit: ट्रम्प यांचा वर्षअखेरीस भारत दौरा

Congress Slams Bhandari: पोलिसांनी माधव भंडारींची चौकशी करावी