माओवादी नेत्याची तुरुंगातून पदवी!

भुवनेश्वर; वृत्तसंस्था :  कुख्यात माओवादी नेता सब्यसाची पांडा हा ओडिशातील गंजम जिल्ह्यातील बेरहामपूर सर्कल जेलमधून मास्टर ऑफ आर्टस्‌ (एमए) शिकत आहे. पदवीनंतर तो आता पदव्युत्तर पदवी घेत आहे. तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला सब्यसाची ‘ओडिशा स्टेट ओपन युनिव्हर्सिटी’मधून लोक प्रशासनात एमएचे शिक्षण घेत आहे. दोन दशकांहून अधिक काळ पोलिस आणि प्रशासनाला त्रास देणाऱ्या सब्यसाचीला आता अभ्यासात खूप रस आहे आणि तो तुरुंगात जास्त वेळ अभ्यासात घालवत आहे.

दोन वर्षांपूर्वी ‘इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी’मधून बीए केलेले पांडा आता ओडिशा मुक्त विद्यापीठात दोन वर्षांच्या एमए (सार्वजनिक प्रशासन) मध्ये प्रवेशासाठी कागदपत्रे सादर केलेल्या सहा कैद्यांपैकी एक आहे. सब्यसाचीसोबत एकूण चार कैदी आणि दोन अंडर ट्रायल कैदी (यूटीपी) परीक्षेला बसतील. कारागृह प्रशासन प्रत्येकाला अभ्यासाचे साहित्य पुरवत आहे. यासोबतच कारागृहातील शिक्षकही त्याच्या अभ्यासाला हातभार लावत आहेत.

बेरहामपूर सर्कल जेलचे अधीक्षक डीएन बारिक म्हणाले, “आम्ही पत्रव्यवहार अभ्यासक्रमाद्वारे दोन वर्षांच्या एमए (पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन) कोर्समध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या पांडासह सहा कैद्यांची कागदपत्रे गोळा केली आहेत. त्यांना त्यांच्या अभ्यासात सर्वतोपरी मदत केली जाईल. शरत उर्फ सुनील या नावाने ओळखला जाणारा सब्यसाची हा ओडिशातील माओवादी पक्षाचा प्रमुख नेता होता आणि पोलिसांना तो हवा होता. त्याच्यावर पाच लाखांचे बक्षीस होते. पांडाला १८ जुलै २०१४ रोजी बेरहामपूरमध्ये अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून तो तुरुंगात आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील १३० हून अधिक माओवाद्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये तो आरोपी आहे. देशात हिंसाचार पसरवल्याप्रकरणी स्थानिक न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Related posts

pooja khedkar: पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Sheikh Hasina : शेख हसीनांना आमच्याकडे सोपवा

Rahul gandhi : सोमनाथची पोलिसांकडूनच हत्या