बर्फवृष्टीमुळे काश्मीर, हिमाचलमधील अनेक रस्ते बंद

श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील डोंगरांवर पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे लोकांच्या अडचणींत वाढ झाली आहे. काश्मीर खोऱ्यात जोरदार बर्फवृष्टीमुळे गुरेझ-बांदीपोरा महामार्गासह अनेक रस्ते बंद झाल्याने अनेक पर्यटक तासनतास अडकून पडले होते. बर्फवृष्टीमुळे हिमाचलमधील पांगीचा रस्ता बंद करावा लागला. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहने अडकून पडल्याने पर्यटकांना वाहनांमध्येच रात्र काढावी लागली.

जम्मू-काश्मीरमधील गुरेझ-बांदीपोरा महामार्ग खुला करण्यासाठी ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ची टीम बर्फ हटवण्यात व्यस्त होती. तासाभराच्या प्रयत्नानंतर श्रीनगर-लेह महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली. राझदान पासमध्ये सुमारे ४-५ इंच बर्फवृष्टी झाली. त्यामुळे रस्त्यांची स्थिती अत्यंत वाईट झाली. येथे २० वाहने अडकली. ‘बीआरओ’ टीमने रस्ता पूर्ववत केला आणि वाहनांसह सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवले. श्रीनगर येथील हवामान केंद्राने १४ व १५ नोव्हेंबर रोजी काश्मीर आणि जम्मू विभागाच्या काही भागात पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे.

हिमाचलमधील रोहतांगसह उंच शिखरांनंतर चंबा जिल्ह्यातील साचेवर सुमारे अर्धा फूट बर्फ पडला. त्यामुळे पांगी रस्ता बंद करावा लागला. जिल्हा मुख्यालयात जाण्यासाठी लोकांना जम्मू-काश्मीर किंवा कुल्लू मार्गे जावे लागले. सार्वजनिक बांधकाम विभागाने बर्फ हटवण्याचे काम सुरू केले आहे. लाहौल-स्पिती आणि कुल्लूमध्येही बर्फवृष्टीमुळे उंच शिखरांवर पांढरी चादर पसरली आहे. कुंजम पास, बरलाचा आणि शिंकुला पासमध्येही नवीन हिमवर्षाव झाला.

Related posts

Rahul gandhi : सोमनाथची पोलिसांकडूनच हत्या

Python near Hostel: शंभर किलो अजगराचा गर्ल्स होस्टेलजवळ डेरा

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव