मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राज्यातील ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षात ‘इनकमिंग’ जोरात सुरू आहे. पुतणे व उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजपातील अनेक दिग्गज नेते त्यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत.
आज (दि. १९) माजी मंत्री व अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी हाती तुतारी घेतली. तर, सोलापूर जिल्ह्यातील भाजपाचे नेते रणजीतसिंह मोहिते -पाटील यांनी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लवकरच पवार गटात प्रवेश करून तुतारी चिन्हावर माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षाच्या नेत्यांमध्ये सध्या बैठकांचा धडाका सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला मिळालेल्या यशामुळे सर्वच पक्षातील इच्छुक व नाराज नेत्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली आहे. विशेषता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेले अनेक आमदार व नेते पवारांकडे घरवापसी करत आहेत.
आज आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित होते. त्यामुळे अजित पवारांना ऐन निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा :