बीड; प्रतिनिधी : आचारसंहिता लागेपर्यंत आपण विश्वास ठेवू. आचारसंहिता लागल्यावर मी मुख्य भूमिका जाहीर करणार आहे. सरकारने आचारसंहिता लागायच्या आत जनतेच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करून मागण्या पूर्ण करा. आम्हाला खुन्नस देऊन, अवमान करून आणि डोळ्यात चटणी टाकून काम करणार असाल तर तुमच्या नाकावर टिच्चून तुम्हाला उलथवल्याशिवाय राहणार नाही, असा गर्भित इशारा मराठा नेते मनोज जरांगे यांनी शनिवारी दिला.
नारायण गडावर आयोजित भव्य जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी लाखाेंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित हाेते. पाचशे एकरहून अधिक परिसरात ही सभा झाली. मराठा बांधव माेठ्या संख्येने एकत्र आले हाेते.
उपस्थित प्रचंड जनसमुदायापुढे नतमस्तक होत असल्याचे सांगून जरांगे म्हणाले, सतरा जाती आरक्षणात घातल्या तर तुम्हाला धक्का लागला नाही का? आम्हाला आरक्षण नको नको म्हणणारे आता कुठे आहेत. एकाला एक तर दुसऱ्याला वेगळा असा न्याय का ? अन्याय सहन करू नये, न्यायासाठी उठाव करण्याची शिकवण संविधानाने दिली आहे. मराठा प्रचंड ताकदीचा समुदाय आहे. ताे संस्कारी आहे. ताे कधी जातिवाद करत नाहीत. प्रचंड ताकदीचा हा समुदाय या राज्यावर समुद्रासारखा पसरला आहे. पण तो कधीच मस्तीत आणि मग्रुरीत वागत नाही, वागला नाही. प्रत्येकाला सांभाळण्याचे आणि साथ द्यायचे काम त्यांनी केले. त्यांना कधीही जात शिवली नाही. माझा समाज राज्य आणि देश पुढे जावा म्हणून लढला आहे. त्याच्या हातात तलवारी होत्या, पण त्याने कधी दुसऱ्यावर अन्याय होऊ दिला नाही. रक्त आमचे सांडले, माना आमच्या कटल्या पण श्रेय आम्ही दुसऱ्याला दिले. अत्याचार करणाऱ्यांचे अड्डे आम्ही उद्ध्वस्त केले, अन्यायाचा विनाश आम्ही केला. मग आमच्यावरच अन्याय का ? आमचे काय चुकले आहे. हे कोणी सांगेल का ? आमचे दारिद्र्य कमी व्हावे म्हणून आम्ही संघर्ष करीत आहोत. आम्ही गोरगरीब मराठ्यांसाठी आरक्षण मागत आहोत. गरिबांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आमचा उठाव सुरू आहे. इथून पुढे समाजाची शान, शक्ती आणि बळ वाढवायचे. आता कमी पडायचे नाही, असे आवाहन त्यांनी केले.
कुणी चिडवले तर शांत रहा…
अटकेपार झेंडा फडकवणारा समाज गप्प कसा, असा सर्वांना प्रश्न पडला आहे. पण संयम पाळा, मी सुद्धा खूप सहन करत आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही सुद्धा सहन करा असे आवाहन करून त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर उपस्थित असणाऱ्या समुदायला शांततेचे आवाहन केले. कोणी चिडवले तरी शांतपणे जा, हे आपल्यापुढे चिलटे आहेत. नुसता एका बीड जिल्ह्यात सात लाख ३५ हजार मराठा आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावे असा इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला.
भरपूर वेळ दिला आता नाही
सरकारला निर्णय घेण्यास १४ महिन्यांचा वेळ दिला होता. आता आणखी वेळ कशाला पाहिजे, असा सवाल करून जरांगे म्हणाले, सरकार आता काय निर्णय घेते पाहूया. आचारसंहिता लागल्यावर एकविचाराने काम करायचे. त्यावेळी निर्णय घेवू.
हेही वाचा :