मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; दहशतवाद्यांकडून बाँबस्फोट, गोळीबार

इंफाळ : मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यात पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. आज (दि.१९) पहाटे पाच वाजता बोरोबेकरा भागातील एका गावात बंडखोरांनी गोळीबार केला. बोरोबेकरा पोलिसांनी सांगितले की, यावेळी बंडखोरांनी गावात बॉम्बही फेकले. माहिती मिळताच पोलीस आणि राज्य राखीव दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. वृद्ध, महिला आणि लहान मुलांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. (Manipur Violence)

पोलिसांनी सांगितले, की बोरोबेकरा हे जिरीबाम शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. या भागात घनदाट जंगल आणि डोंगर असल्याने याआधीही येथे अशा घटना घडल्या आहेत. यापूर्वी १८ ऑक्टोबरला जिरीबाममधील कालीनगर हमर वेंग भागातील एका शाळेला बंडखोरांनी आग लावली होती. १५ ऑक्टोबरला केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निमंत्रणावरून मैतेई, कुकी आणि नागा समुदायातील २० आमदार दिल्लीत पोहोचले होते. त्यांना मणिपूरमध्ये यापुढे हिंसाचार न करण्याची शपथ देण्यात आली होती. सभेच्या चार दिवसानंतर आज (दि.१९) जिरीबाममध्ये हिंसाचार झाला. जिरीबाममधील कालीनगर हमर वेंग भागातील ब्लूमिंग फ्लॉवर स्कूलला बंडखोरांनी आग लावली.

चारदिवसांपूर्वी मणिपूरमधील शांततेसाठी दिल्लीत बैठक झाली होती. १५ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत प्रथम कुकी, नंतर मैतेई आणि नंतर नागा नेत्यांशी बोलणे झाले. प्रत्येकाने आपल्या मागण्या केंद्रापुढे मांडल्या. यानंतर सर्वांनी एका सभागृहात एकत्र येऊन शपथ घेतली, की आजच्या सभेनंतर मणिपूरमध्ये एकही गोळी चालवली जाणार नाही. याला तिन्ही समाजाच्या प्रतिनिधींनी सहमती दर्शवली. यानंतर प्रतिनिधींनी एकमेकांशी हस्तांदोलन केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह उपस्थित नव्हते; परंत, शहा बैठकीवर लक्ष ठेवून होते. (Manipur Violence)

या बैठकीला कुकी, मैतेई आणि नागा आमदारही उपस्थित होते. पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये विधानसभा अध्यक्ष थोकचोम सत्यब्रत सिंग, मंत्री थोंगम विश्वजित सिंग आणि युमनम खेमचंद सिंग यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्रिपदावरून बीरेन यांना हटवण्याची मागणी

मणिपूरमधील भाजपच्या १९ आमदारांनी मुख्यमंत्री बीरेन सिंह यांना हटवण्याची मागणी केली आहे. आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून हिंसाचार थांबवण्याचा हा एकमेव मार्ग असल्याचे म्हटले आहे. केवळ सुरक्षा दलांच्या तैनातीने काहीही होणार नाही. हिंसाचार दीर्घकाळ सुरू राहिल्यास एक राष्ट्र म्हणून भारताची प्रतिमाही डागाळली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा :

Related posts

pooja khedkar: पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Sheikh Hasina : शेख हसीनांना आमच्याकडे सोपवा

Rahul gandhi : सोमनाथची पोलिसांकडूनच हत्या