भारताला ‘एव्हिएशन हब’ बनवू : पंतप्रधान मोदी

वडोदरा;  वृत्तसंस्था : गेल्या दशकात भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राची अभूतपूर्व वाढ आणि परिवर्तन तुम्ही सर्वांनी पाहिले आहे. आम्ही भारताला ‘एव्हिएशन हब’ बनवण्यासाठी काम करत आहोत. या परिसंस्थेमुळे भविष्यात ‘मेड इन इंडिया’ नागरी विमानांचा मार्ग मोकळा होईल. विविध भारतीय विमान कंपन्यांनी १२०० नवीन विमानांची ऑर्डर दिली आहे. भारत आणि जगाच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी नागरी विमानांच्या डिझाइन आणि निर्मितीमध्ये हा कारखाना महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. (Narendra Modi)

मोदी आणि स्पेनचे अध्यक्ष पेड्रो सांचेझी यांच्या हस्ते सी-२९५ विमानांच्या निर्मितीसाठी ‘टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्स’ चे उद्‌घाटन करण्यात आले. तत्पूर्वी भारत भेटीवर पहिल्यांदाच आलेल्या सांचेझी यांच्यासह मोदी यांनी वडोदऱ्यात रॅली काढली. मोदी म्हणाले, की आमचे मित्र पेड्रो सांचेझ यांची ही पहिलीच भारत भेट आहे. आजपासून आम्ही भारत आणि स्पेन यांच्यातील भागीदारीला नवी दिशा देत आहोत. आम्ही सी-२९५ विमानांच्या उत्पादन कारखान्याचे उद्‌घाटन करत आहोत. या कारखान्यामुळे भारत-स्पेन संबंध तसेच ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ मिशन अधिक मजबूत होईल.

या वेळी रतन टाटा यांचेही मोदी यांनी स्मरण केले. ते म्हणाले, की नुकतेच आपण देशाचे महान सुपुत्र रतन टाटा यांना गमावले. ते असते, तर त्यांना अधिक आनंद झाला असता. हा सी-२९५ विमान कारखाना नव्या भारताची नवीन कार्यसंस्कृती प्रतिबिंबित करतो. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना वडोदरात ट्रेनचे डबे बनवण्याचा कारखाना काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कारखानाही विक्रमी वेळेत उत्पादनासाठी सज्ज झाला. आज आपण त्या कारखान्यात बनवलेले मेट्रोचे डबे इतर देशांमध्ये निर्यात करत आहोत. भविष्यात या कारखान्यात तयार होणारी विमाने इतर देशांमध्येही निर्यात केली जातील, असा मला पूर्ण विश्वास आहे. (Narendra Modi)

मोदी म्हणाले, ‘आज भारतातील संरक्षण उत्पादन परिसंस्था नवीन उंचीला स्पर्श करत आहे. दहा वर्षांपूर्वी जर आपण ठोस पावले उचलली नसती, तर आज ही पातळी गाठणे अशक्य झाले असते. संरक्षण निर्मिती भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर होऊ शकते, याची कल्पनाही त्या वेळी कोणीही केली नसेल; पण आम्ही नव्या वाटेवर चालायचे ठरवले, स्वतःसाठी नवीन ध्येय ठेवले. आज निकाल आपल्या समोर आहे. आम्ही संरक्षण उत्पादनात खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवला. सार्वजनिक क्षेत्र कार्यक्षम केले. शस्त्रास्त्र कारखान्यांचे सात मेगा-कंपन्यांमध्ये रूपांतर केले. ‘डीआरडीओ’ आणि ‘एचएएल’ला मजबूत केले. उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये दोन प्रमुख संरक्षण कॉरिडॉर तयार केले. अशा अनेक निर्णयांनी संरक्षण क्षेत्रात नवी ऊर्जा भरली.

सांचेझ म्हणाले, की  भारतीय कंपन्यांना पुढे जायचे असेल तर माझ्यावर विश्वास ठेवा. २०२६ मध्ये भारतात बनवलेले पहिले सी-२९५ वडोदरा येथील या प्लांटमध्ये तयार केले जाईल. हे विमान स्पॅनिश आणि युरोपीयन विमान उद्योगाचे प्रतीक आहे. भारताच्या संरक्षण क्षमतेच्या आधुनिकीकरणात योगदान देण्याव्यतिरिक्त, ते तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना देईल. येथे हजारो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील आणि उच्च पात्र अभियंते आणि तंत्रज्ञांच्या नवीन पिढीला प्रशिक्षित केले जाईल.

४० विमानांची भारतात बांधणी

सी-२९५ कार्यक्रमांतर्गत एकूण ५६ विमाने तयार केली जाणार आहेत, त्यापैकी १६ विमाने थेट स्पेनमधून एअरबसद्वारे वितरित केली जात आहेत आणि उर्वरित ४० भारतात बांधली जाणार आहेत. ‘टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड’ या ४० विमानांची निर्मिती भारतात करणार आहे. ही सुविधा भारतातील लष्करी विमानांसाठी खासगी क्षेत्रातील पहिली ‘फायनल असेंब्ली लाइन’असेल.

हेही वाचा :

Related posts

Python near Hostel: शंभर किलो अजगराचा गर्ल्स होस्टेलजवळ डेरा

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित