मुंबई : प्रतिनिधी : लाडकी बहीण योजनेतून ९२ लाख महिलांना वगळण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. या योजनेचा १४ हजार पुरुषांनी लाभ घेतला आहे. ९२ लाख महिलांना वगळल्यावरुन विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी ई केवायसी प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानंतर या योजनेतून ८० लाख महिलांना वगळण्यात येणार आहे असे राज्य सरकारने एक हिन्यापूर्वी जाहीर केले होते. ई केवायसी पूर्ण करण्यासाठी सरकारने आठ महिन्यांची मुदत दिली होती. ही पूर्ण न करणाऱ्या ५० ते ५५ लाख महिला या योजनेतून थेट बाद झाल्या. या योजनेनुसार अडीच लाखापेक्षा कमी कौटंबिक उत्पन्न असणे आवश्यक होते. पण तपासणीत १२ लाख महिला या प्राप्तिकर भरणाऱ्या आणि उत्पन्नाची मर्यादा ओलांडली आहे हे निदर्शनास आल्याने त्यांचे अर्ज फेटाळले. साडेचार लाख महिलांची ६५ वयोमर्यादा ओलांडल्याने त्यांना वगळण्यात आले. नमो योजनेचा लाभ घेणाऱ्या पाच लाख महिलांना वगळण्यात आले. (92 lakh women ineligible for the ‘Ladki Bahin’ scheme)
कॅगचा इशारा
शुक्रवारी कॅगने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ताशेरे ओढण्यात आले आहे. या योजनेवर होणाऱ्या वारेमाप खर्चामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीतवर ताण येऊ शकतो, असा स्पष्ट इशारा दिला आहे. तसेच योजनेअंतर्गत २५४२ कोटी रुपयांच्या खर्चाचे ठोस समर्थन करत येत नसल्याचे अहवालात नमूद केले.
संजय राऊतांची टीका
लाडकी बहीण योजना फक्त मते विकत घेण्यासाठी आणली अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. ९२ लाख बोगस लाभार्थ्यांना दिलेले पैसे कोण वसुल करणार? असा सवाल करत ही वसुली राज्याचे मुख्य सचिव, अर्थसचिव, संपूर्ण मंत्रीमंडळाची संपत्ती जप्त करुन वसुली करावी अशी मागणीही त्यांनी केली. कॅगचा अहवाल आणि अन्य कारणामुळे ही योजना बंदही केली जाईल असेही ते म्हणाले. (92 lakh women ineligible for the ‘Ladki Bahin’ scheme)
लाडक्या बहिणी जड झाल्या आहेत?
लाडकी बहीण योजनेतून ९२ लाख महिलांना अपात्र करण्यात आले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांना आता लाडक्या बहिणींचा खर्च दिसत आहे. आता तुम्हाला लाडक्या बहिणी जड झाल्या आहेत का? अशी टीका खडसे यांनी केली. लाडक्या बहिणींचा खंबीर दादा आता नाही. पण किमान सुनेत्रा वहिणी तुम्ही तरी लाडक्या बहिणीवर होणारा अन्याय मांडावा, अशी मागणी त्यांनी उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना केली आहे.
लाडक्या बहिणी जड झाल्या आहेत?
निवडणूक संपताच सरकार मस्तीत आले आहे…. निवडणूक तोंडावर असताना लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्याही अटी शर्ती लावल्या नाही. पण आता निवडणूक संपताच सरकार पूर्णपणे मस्तीत आले आहे. जाचक अटी लादून ९२ लाख महिन्यांना वगळण्याचे पाप सरकारने केले आहे. वगळलेल्या महिला आता सरकारला जाब विचारतील अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवर यांनी केला. (92 lakh women ineligible for the ‘Ladki Bahin’ scheme)