निसर्ग आंदोलन करत नाही पण दुष्काळाच्या रुपाने प्रतिक्रिया देतो  : अतुल देऊळगावकर

(Lecture by Atul Deulgaonkar)

कोल्हापूर : प्रतिनिधी : निसर्ग ओरडत नाही किंवा आंदोलन करत नाही पण उष्णता आणि दुष्काळाच्या रूपाने तो प्रतिक्रिया देतो. उष्णता वाढीचा परिणाम केवळ पर्यावर्णावरच नाही तर मानवी मेंदू आणि कार्यक्षमतेवर होत आहे, असे मत ख्यातनाम पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केले. देशातील सध्याच्या विकास सर्वभक्षी बाजार संस्कृतीचे लक्षण असल्याने विकासाच्या संकल्पनांची पुनर्मांडणी होणे आवश्यक आहे. यासाठी पर्यावरणाचा प्रश्न जीवनवादाशी जोडला गेला तरच मानवी जीवन सुसह्य होईल, असेही ते म्हणाले.
शिवाजी विद्यापीठाचा पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन, हिंदी अधिविभाग, किर्लोस्कर ऑईल इंजिन आणि लक्ष्मी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘साहित्य, संस्कृती,विज्ञान, माध्यमे आणि शाश्वत विकास’ या विषयावरील विशेष व्याखानाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते.
देऊळगावकर म्हणाले, भारतीय समाज विकसित होता. वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणारा होता. तो निसर्गाच्या अधिक जवळ होता. जंगले त्याच्याच ताब्यात होती. ब्रिटिश राजवटीपूर्वी जलव्यवस्थापन, शेती, उद्योग, समृद्ध होते. ब्रिटिश राजवटीनंतर त्यांनी सर्व मूलभूत संरचनेवर अतिक्रमण केले. तेव्हा पासून पर्यावरणाच्या र्‍हासाला सुरुवात झाली. सध्याचा विकास म्हणजे सर्वभक्षी बाजार संस्कृतीचे लक्षण आहे. त्याची पुनर्मांडणी होऊन त्यात जीवनवाद यायला हवा.

उष्णता वाढीचा परिणाम मानवी मेंदूवर

अतुल देऊळगावकर म्हणाले, एकनाथ, तुकाराम, नामदेव यांनी साहित्यामधून जे तत्त्वज्ञान सांगितले ते खर्‍या अर्थाने भारतीय समाजाचे जगणे होते. परदेशातील शाळांमध्ये  पुस्तके, चित्र, कविता यामधून निसर्ग सांगितला जातो. त्याचा परिणाम अंतःकरणावर जास्त होतो. युरोपमध्ये उड्डाणपूल पाडून शहरे सायकल आणि पादचार्‍यांसाठी खुली केली जात आहेत. भारतात हा आदर्श घेणे गरजेचे आहे. टिशूच्या वापरामुळे आपण नकळतपणे निसर्गाच्या विनाशाला हातभार लावत आहोत. निसर्ग ओरडत नाही किंवा आंदोलन करत नाही पण उष्णता आणि दुष्काळाच्या रूपाने तो प्रतिक्रिया देतो. उष्णता वाढीचा परिणाम केवळ पर्यावर्णावरच नाही तर मानवी मेंदू आणि कार्यक्षमतेवर होत आहे. आपण स्मार्ट सिटी तयार करण्यावर भर देत आहोत. स्मार्ट सिटी म्हणजे केवळ तंत्रज्ञान नसून जिथे झाडे, पाणी आणि गवत जपले जाते अशी शहरे होय. निसर्गाकडे जाणे हे आधुनिकतेचे आणि स्मार्ट होण्याचे लक्षण आहे. याकडे मात्र आपले दुर्लक्ष होत असल्याची खंत देऊळगावकर यांनी व्यक्त केली. (Lecture by Atul Deulgaonkar)

अध्यक्षीय भाषणात डॉ. विलास शिंदे म्हणाले, निसर्ग संवर्धनासाठी केवळ झाडे लावणे पुरेसे नाही तर त्यामागचे विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. जैवविविधता टिकवण्यासाठी आपल्या परिसरातील स्थानिक झाडे लावल्यावर भर दिला पाहिजे. निसर्ग वाचवण्यासाठी प्रत्येकाने विवेकाने वागले पाहिजे. स्थानिक गरजा विचारात घेऊन पर्यावरणाचे शास्त्र आणि विज्ञान यांचा सुयोग्य मेळ घातला गेला पाहिजे. (Lecture by Atul Deulgaonkar)

प्रास्ताविक पद्मश्री डॉ. ग. गो.जाधव पत्रकारिता अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. पाहुण्यांची ओळख हिंदी विभाच्या प्रभारी प्रमुख प्रा. डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी करून दिली. आभार सामाजिक बांधिलकी अधिकारी शरद आजगेकर यांनी मानले. यावेळी लक्ष्मी फाउंडेशनचे विनायक देसाई, ज्येष्ठ आर्किटेक्ट शिरीष बेरी, सौ. बेरी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, ज्येष्ठ संपादक रावसाहेब पुजारी, राजश्री साकळे, डॉ.अविनाश भाले, डॉ. प्रकाश मुंज, डॉ.संतोष कोळेकर, डॉ. जयसिंग कांबळे, डॉ. गीता दौडमणी, डॉ. सुवर्णा गावडे, डॉ. सुमेधा साळुंखे, जयप्रकाश पाटील, अनुप जत्राटकर यांच्यासह संशोधक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Lecture by Atul Deulgaonkar)

Related posts

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर

डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या स्थानी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर