समरजित घाटगे, राहुल देसाई यांना जिल्हा नियोजन मंडळावरून हटवले

कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा नियोजन मंडळावर विशेष निमंत्रित म्हणून नामनिर्देशित केलेले कागल येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संचालक समरजितसिंह घाटगे आणि गारगोटीचे राहुल देसाई यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक नियोजन विभागातर्फे जारी करण्यात आले आहे. या दोघांऐवजी डॉ. सुभाष जाधव ( शिरगांव, ता. राधानगरी ) आणि ॲड. हेमंत कोलेकर ( नेसरी, ता. गडहिंग्लज) यांची निवड करण्यात आली आहे. समरजितसिंह घाटगे यांच्याकडे यापूर्वी भाजपच्या जिल्हाक्षपदाची धुरा होती. राज्याच्या राजकारणात भाजपने गतवर्षी राष्ट्रवादी अजित पवार गटाशी हातमिळवणी केली. बदललेल्या समीकरणात आमदार हसन मुश्रीफ उपमुख्यमंत्री अजित पवार गटासोबत राहिले. त्यामुळे मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खात्याच्या मंत्रिपदासह कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आली. तेव्हापासून घाटगे नाराज होते. त्यानंतर विधानसभा निवडणूक लढविण्याचे घाटगे यांनी जाहीर केले. त्यानुसार त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला. कागलमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची जाहीर सभा घेत ना. मुश्रीफ यांच्या विरोधात विधानसभेसाठी रणशिंग फुंकले. माजी आमदार बजरंग देसाई यांचे पुत्र व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल देसाई यांच्याकडेही भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी होती. त्यांनीही कांही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ही निवड रद्द होण्यामागे या दोन्ही नेत्यांनी भाजपशी घेतलेली फारकत असल्याचे बोलले जात आहे.

दोघेही भाजपचे पदाधिकारी

जिल्हा नियोजन समितीवर निवड झालेले नूतन निमंत्रीत सदस्य हे भाजपचे पदाधिकारी आहेत. डॉ. जाधव हे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस म्हणून काम पाहतात. तसेच ॲड. कोलेकर हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी