Home » Blog » सासू,सासऱ्यानेच एसटी बसमध्ये केला जावयाचा खून

सासू,सासऱ्यानेच एसटी बसमध्ये केला जावयाचा खून

Kolhapur Crime News : अवघ्या आठ तासांत संशयितांना बेड्या

by प्रतिनिधी
0 comments
Kolhapur Crime News

कोल्हापूर; प्रतिनिधी : एसटी बसमध्ये गळा आवळून जावयाचा खून केल्याची घटना कोल्हापुरात (Kolhapur Crime News) घडली. सासू, सासऱ्यानेच हा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची सूत्रे हलवत अवघ्या आठ तासांत संशयितांना बेड्या ठोकल्या. गडहिंग्लज-कोल्हापूर एसटी बसमध्ये ही घटना घडली. तेव्हा रात्रीच्या वेळी अवघे पाच प्रवाशी बसमध्ये होते. संदीप रामगोंडा शिरगावे (वय ३०, रा. चिंचवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. हणमंताप्पा यल्लाप्पा काळे (वय ४८), सावत्र सासू गौरवा हणमंताप्पा काळे (३०, दोघे रा. हुनिगनाळ, ता. गडहिंग्लज) अशी संशयितांची नावे आहेत. पँटच्या नाडीने हा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.

शाहूपुरी पोलिसांनी खुनाच्या तपासाची माहिती दिली. बुधवारी सकाळी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एका युवकाचा मृतदेह आढळला. त्याच्या गळ्यावर व्रण होते. मृताच्या खिशात डायरी होती. त्यात मोबाईल नंबर होता. पोलिसांनी या नंबरवर संपर्क साधून मृताची ओळख पटवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक जोडपे मृतदेह एका दुकानाजवळ ठेवत असल्याचे दिसून आले. हेच दोघे गडहिंग्लज एसटी स्टँडवरील सीसीटीव्हीतही दिसून आले. शाहूपुरी पोलिसांनी गडहिंग्लज पोलिसांच्या सहकार्याने संदीप शिरगावेची पत्नी करुणाला दाखवले. ते दोघे आपले आईवडील असल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी हणमंताप्पा आणि गौरवाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोघांनी खुनाची कबुली दिली.

संदीप शिरगावेचा दहा वर्षापूर्वी करुणाशी विवाह झाला होता. दोघांना पाच वर्षांचा मुलगा आहे. संदीप खासगी वाहनावर चालक होता. त्याला दारुचे व्यसन होते. तो पत्नीला सतत मारहाण करत असे. या त्रासाला कंटाळून ती माहेरी आली. तिने घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला आहे. दरम्यान, सोमवारी २३ सप्टेंबर रोजी संदीप गडहिंग्लजला आला. त्याने पुन्हा पत्नीशी वाद घातला. सासूसासऱ्यांनाही शिवीगाळ केली. पत्नी करुणाने संदीपला पैसे देत तू परत गावी जा, असे बजावले. त्यानंतर संदीप गडहिंग्लज बसस्थानकावर आला. गडहिंग्लज-कोल्हापूर विना वाहक बसने तो कोल्हापूरकडे निघाला. त्याच बसमधून हणमंताप्पा आणि गौरवा कोल्हापूरकडे प्रवास करत होते. आपल्या मुलीला त्रास देणाऱ्या जावयाचा काटा काढायचा निर्णय दोघांनी घेतला. संदीप दारुच्या नशेत झोपला होता. त्यांनी एका सीटवर संदीपला मध्ये बसवले. गौरव्वाने त्याचे तोंड दाबून धरले. त्यानंतर हणमंताप्पाने नाडीने गळा आवळून त्याचा खून केला. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात बस आल्यावर दोघांनी त्याचा मृतदेह बसमधून उतरवला आणि स्वच्छतागृहाजवळील एका बंद दुकानाजवळ ठेवून ते पळून गेले. खुनाची घटना कुणी पाहिली नाही, या अविर्भावात ते निर्धास्तपणे गावांकडे परतले. पण सीसीटीव्हीत हे दोघे कैद झाल्याने पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.

हेही वाचा : 

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00