कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी सुरू

  • सतीश घाटगे

कोल्हापूर: करवीर नगरीला आता शारदीय नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री अंबाबाई मंदिरात युद्धपातळीवर उत्सवाची तयारी सुरू आहे. मंदिरातील जुना गरुड मंडप उतरवण्यात येत आहे. पण नवरात्रोत्सवात गरुड मंडपाचा फील येण्यासाठी गरुड मंडपाची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील नवरात्रोत्सवाची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भातील बैठकांचे सत्र सुरू आहे.

गरुड मंडपाची प्रतिकृती उभारणार

मंदिराच्या पश्चिमेला असलेल्या नक्षीदार कमानीच्या गरुड मंडपातील लाकडी खांबांना वाळवी लागली आहे. तो धोकादायक बनल्याने उतरवण्यात येत आहे. वैशिष्ट्यपूर्ण गरुड मंडपामुळे मंदिराच्या सौंदर्यात भर पडते. दर शुक्रवारी तसेच नवरात्रोत्सवात प्रत्येक दिवशी देवीची पालखी गरुड मंडपातील सदरेवर विराजमान होते.

जीर्ण झालेला गरुड मंडप उतरवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. असून नवरात्रोत्सवात गरुड मंडपाची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. या ठिकाणीच देवीची पालखी आणि नियमित विधी होणार आहेत.
-शिवराज नायकवडे, सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती.

महाद्वारात उभे राहिले की गरुड मंडपातून थेट समोर अंबाबाईचे मुखदर्शन घडते. नवरात्रोत्सवात गरुड मंडपाची उणीव भासू नये म्हणून देवस्थान समितीने गरुड मंडपाची हुबेहूब प्रतिकृती उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यात सपाटीकरण झाल्यावर नक्षीदार खांब, कौलारु छप्पर असलेला मंडप उभारण्यात येणार आहे. या प्रतिकृतीच्या ठिकाणी उत्सवकाळात अंबाबाईची पालखी विराजमान होणार आहे. शिवाय येथून पूर्वीप्रमाणेच मुखदर्शनाची सोय करता येईल का, याची चाचपणी करण्यात येणार आहे.

यंदा भाविकांची संख्या वाढणार

शनिवार, रविवार आणि सलग सुट्ट्या, दोन शुक्रवार आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ते लक्षात घेता गतवर्षी प्रमाणे यंदाही दर्शनरांगेची सोय शेतकरी संघाच्या बझारमध्ये करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. उत्सवकाळात पावसाची शक्यता आणि ऑक्टोबर हिटचा विचार करुन शेतकरी बझारमध्ये दर्शन मंडप उभारण्यासाठी जिल्हा प्रशासन आग्रही आहे.
महापालिकेच्यावतीने मंदिर परिसरातील रस्त्यांच्या डागडुजीचे आणि पॅचवर्कचे काम करण्यात येणार आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन नऊ ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात येणार आहे. शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी रिंगरोडवर वाहने थांबवण्याचा विचार सुरू आहे. केएमटीने भाविकांसाठी शटल सर्व्हिस द्यावी, अशी सूचनाही पुढे आली आहे. भाविकांसाठी ६४ ठिकाणी स्वच्छतागृहांची सोय करण्यात येणार आहे. सुरक्षेच्यादृष्टीने सीसीटीव्हींची संख्या वाढवण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

अंबाबाई मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी १५० हून अधिक संस्था आणि कलाकारांचे अर्ज आले आहेत. या अर्जांची छाननी करण्यात येत आहे. नऊ दिवसांत १०० संस्थांना देवीच्या दरबारात आपली सेवा देण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली