नेहरूंची अशोकनीती!

– राज कुलकर्णी

नेहरूंनी अंगीकारलेली ही अशोकनीती भारताला एक सक्षम राष्ट्र घडविण्यास कारणीभूत ठरली, हे स्पष्टच आहे. भारताचे अखंडत्व हे नेहरूंच्या मनात अशोकाच्या कालखंडाशी निगडित असल्याचे दिसून येते. नेहरूंचे आंतराष्ट्रीय विरोधक नेहरूंवर अशीच टीका करत असल्याचे शेख अब्दुल्लांनीही ‘आतिश-ए-चिनार’ मधे नमूद केले आहे. पण नेहरूंनी ही अशोकनीती कालानुरूप बदल करून ती स्वीकारली होती, असेच दिसून येते. नेहरूंचे अशोकाबाबतचे विचार पाहता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरसुद्धा वैचारिक पातळीवर नेहरूंचे सर्वयोग्य सहकारी ठरतात. कारण अशोक आणि बुद्ध हा त्यांच्या विचारविश्वातील समान धागा होता, ज्यातून भारतीय जनतेच्या कल्य़ाणाचं स्वप्न त्यांनी ध्येय म्हणून अंगीकारलं होतं.

एच. जी. वेल्स च्या ‘outline of History’ या ग्रंथात म्हटले आहे ‘ इतिहासाच्या पानापानांमधून हजारो लाखो राजांच्या नावाची गर्दी उसळलेली असते, त्यांना दिल्या जाणा-या विविध पदव्या सुद्धा असतात, पण साऱ्या राजांमध्ये खराखुरा तारा म्हणून जर कोणी चमकत असेल तर तो केवळ सम्राट अशोक हाच आहे!’

एच. जी. वेल्स यांचा हाच संदर्भ जवाहरलाल नेहरू आपल्या मुलीला म्हणजे इंदिरेला लिहिलेल्या ३० मार्च १९३२ रोजीच्या पत्रात आहे. ते इंदिरेला लिहितात, ” प्राचीन काळातील राजे राजवाड्यांचे फारसे मी कौतुक करत नाही मात्र राजा आणि सम्राट असूनसुद्धा अतिशय महान, श्रेष्ठ आणि आदरणीय पुरुष म्हणून सम्राट अशोकाचा आवर्जून उल्लेख करेन! अशोकाचा प्रभाव आणि त्यांच्या कार्याने त्याने जागतिक इतिहासावर उमटवलेला ठसा, ही बाब भारतीय म्हणून खूप अभिमानास्पद आहे!”

आधुनिक भारताचे निर्माते जवाहरलाल नेहरू यांच्यावरील सम्राट अशोकाचा प्रभाव हा अगदी सुस्पष्ट असून तो त्यांच्या लेखनातून वारंवार स्पष्ट झाला आहे. ‘ग्लिम्प्सेस ओवर वर्ल्ड हिस्ट्री’ या ग्रंथात त्यांनी सम्राट अशोकावर एक स्वतंत्र दीर्घ प्रकरण लिहिले आहे. नेहरू भविष्यातील भारत म्हणजे जनतेच्या कल्याणाच्या अनुषंगाने ‘अशोकाचा भारत’ या अर्थाने पाहत होते. अर्थात या विचारात त्यांनी कालानुरूप बदलही लक्षात घेतले होतेच. भारत म्हणजे कोणी अफ्रिकन देशाप्रमाणे अविकसित देश नसून सुसंस्कृत व प्रगल्भ विचारांचा संपन्न देश आहे हे त्यांना जगाला सांगायचे होते. म्हणून त्यांनी भारताच्या प्राचीन वैभवाची जगातील इतर तशाच संस्कृतीबरोबर तुलना करून भारतीय संस्कृती ही जगाच्या प्राचीन इतिहासातील संपन्न भाग असल्याचे वर्णन केले आणि जागतिक पातळीवर भारताला अधिकृत चेहरा प्रदान केला! अलाहाबादच्या किल्ल्यात अशोकाचा एक स्तंभ असल्याचा उल्लेख करून नेहरूंनी या स्तंभातील सारतत्त्व खूप आदर्श असल्याचे मत या लेखात व्यक्त केले आहे. या स्तंभात म्हटले आहे की, “ खरा विजय एकच आहे – तो म्हणजे आपल्या आत्म्यावरील विजय आणि धर्माचा मनुष्याच्या अंत:करणावरील विजय होय!” अशोकाच्या या लेखात वारंवार धर्म म्हणून जो उल्लेख आला आहे, तो बुद्ध धर्माविषयी आहे ! अशोकासाठी धर्म म्हणजे पूजा विधी आणि कर्मकांड म्हणजे धर्म नव्हता तर सत्कार्य आणि सामाजोन्नती म्हणजे धर्म अशी त्याची भूमिका होती. अशोकाने हाच धर्म अर्थात धम्म जगभरात पोचवला.

देश स्वातंत्र्य झाल्यावर बहुधर्मिय, बहुपंथिय अशा देशाचे धोरण म्हणून स्वीकारलेले सर्वात महत्वपूर्ण मूल्य म्हणजे धर्मनिरपेक्षता ! नेहरूंनी स्वीकारलेल्या धर्मनिरपेक्षतेत धर्म ही संकल्पना अशीच ‘सत्कार्य’ आणि ‘समाजोन्नती’ यातच धर्म शोधू पाहणारी आहे. म्हणूनच त्यांनी ‘भाक्रा नांगल’ या धरणाच्या उद्घाटनाच्या वेळी हीच भारताची खरीखुरी मंदिरे आहेत असा मौलिक विचार मांडला होता. ‘लोकहितार्थ कार्य’ हा धर्माचा अर्थ जो अशोकाने त्याच्या अनेक स्तंभातून सांगितला आहे, तोच नेहरूंनी अधोरेखित केला होता. नेहरू इश्वराच्या अस्तित्वाबद्दल कांहीच बोलले नाहीत, पण व्यक्तिगत स्तरावर नेहरूंनी अलौकिक शक्तीचे अस्तित्व आणि आत्मा नावाची काही गोष्ट अस्तित्वात असते यावर माझा विश्वास बसत नाही असे म्हटले आहे. परंतु ‘परलोकाबद्दल आपण जेवढी कमी चिंता करू, तेवढे जास्त आपण लोकांचे कल्याण करू शकू’ ,असे त्यांचे स्पष्ट मत होते, जे बुद्धांच्या अज्ञेयवादी विचारांशी सुसंगत असेच आहे.

बुद्धाचा प्रभाव

नेहरूंनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे कि, ‘गौतम बुद्ध हे एकमेव धार्मिक व्यक्तिमत्व आहे ज्याने माझ्या जीवनावर प्रभाव टाकला ’! नेहरूंच्या अशोकाबद्दल वाटणाऱ्या आत्मीयतेचा संबंध या अर्थाने सुद्धा होता. कारण त्यांच्या दोघांवरही बुद्धाचा प्रभाव होता! देश स्वतंत्र झाल्यावर भारताची जडण घडण कशा पद्धतीने होणार याबाबतची पूर्वतयारी तत्कालीन सर्वच नेत्यांनी केलेली होती. कोणी फ्रेंच राज्यक्रांतीतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यावर तिची मांडणी केली होती तर काहींनी रशियातील ऑक्टोबर क्रांतीला समोर ठेवले होते! कांहींनी बहुसंख्यांच्या धर्मावर आधारीत धर्माधिष्टीत राष्ट्राची निर्मिती म्हणून भारताच्या स्वातंत्र्याकडे पहिले होते. महात्मा गांधींनी तत्कालीन समाज मान्यतेनुसार रामराज्याच्या अनुषंगाने हीच कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडली आणि मात्र तीच बाब नेहरूंनी गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वातून सम्राट अशोकाच्या कारकीर्दीच्या अनुषंगाने मांडली, जी अधिक वास्तववादी व व्यवहारिक होती.

अशोकाची राजमुद्रा स्वीकारली

अशोकाची राजमुद्रा भारताची राजमुद्रा म्हणून स्वीकारण्याचे श्रेय म्हणूनच नेहरूंना आहे. बौद्ध प्रतीके, अशोक कालीन मूल्ये यांना आधुनिक भारताच्या निर्मितीत प्राचीन वारसा म्हणून स्थान दिले आणि भारतीय प्रशासन तथा संसदेत देखील या प्रतीकांचा वापर करण्याचा आग्रह त्यांनी धरला. भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचा ठराव नेहरूंनी संविधान सभेत २२ जुलै १९४७ रोजी मांडला. या ठरावाच्या वेळी भाषण करताना ते म्हणाले “ There shall be a wheel in navy blue to represent the charkha. The design of the wheel shall be that of the wheel ( chakra ) which appears on the abacus of the sarnath loin capital of Ashoka” याच भाषणात सम्राट अशोकाचा गौरव करताना ते म्हणतात “am exceedingly happy that, in this sence indirectly we have associated with this flag of ours not only this emblem but in a sense the name of ashoka, one of the most magnificent names not only in Indias history but world history! ” नेहरू अशोकाच्या कालखंडाचा उल्लेख देदीप्यमान कालखंड असा करतात आणि देशात त्याकाळी चालू असलेल्या द्वेषपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर म्हणतात “ It is well that at this moment of strife ,conflict and intolerance, our minds should go back towords what India stood for in anicient days”

देवानाम् प्रियदर्शी

भारत स्वतंत्र झाल्यावर भारताच्या परराष्ट्र धोरणावर देखील सम्राट अशोकाच्या मूल्यांचा प्रभाव त्यांनी आधुनिक परिप्रेक्षात स्वीकारला. कोलकात्यात बुल्गानिन आणि क्रुश्चेव यांच्या स्वागतादरम्यान भाषण करताना ३० नोव्हेंबर १९५५ रोजी नेहरू म्हणतात “ peaceful co-existence is not a new idea for India. It has been our way of life and as old as our thought and culture. About 2200 years ago ,a great son of India ,Ashoka proclaimed it and inscribed it on the rock and the stone, which exist today and give us his messege”
नेहरूंना शांतीदूत म्हटलं जातं हे खरे! पां.वा.गाडगीळांनी लिहिलेल्या ‘शांतीदूत नेहरू’ या पुस्तकाचे `मागोवा` या पुस्तकात नरहर कुरूंदकरांनी केलेले परीक्षण वाचल्यावर लक्षात येते की नेहरूंनी सम्राट अशोकाचा शांतीवाद हा मुत्सद्दीपणे कालसुसंगत स्वरूपात स्वीकारला होता. पण त्यामुळे भारताबद्दल विश्वासार्ह वातावरण जगात निर्माण झाले! नेहरूंवरील अशोकाचा प्रभाव सांगण्यासाठी इंदिरेचे ‘प्रियदर्शिनी’ हे नाव सुद्धा खूप बोलके आहे, कारण ‘देवानाम् प्रियदर्शी’ या अशोकाच्या नावावरून स्वीकारलेले आहे.

अशोक आणि बुद्धाचा समान धागा

नेहरूंनी अंगिकारलेली ही अशोक नीती भारताला एक सक्षम राष्ट्र घडविण्यास कारणीभूत ठरली, हे स्पष्टच आहे. भारताचे अखंडत्व हे नेहरूंच्या मनात अशोकाच्या कालखंडाशी निगडित असल्याचे दिसून येते. नेहरूंचे आंतराष्ट्रीय विरोधक नेहरूंवर अशीच टीका करत असल्याचे शेख अब्दुल्लांनीही ‘आतिश-ए-चिनार’ मधे नमूद केले आहे. पण नेहरूंनी ही अशोक नीती कालानुरूप बदल करून ती स्वीकारली होती, असेच दिसून येते. नेहरूंचे अशोकाबाबतचे विचार पाहता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरसुद्धा वैचारीक पातळीवर नेहरूंचे सर्वयोग्य सहकारी ठरतात. कारण अशोक आणि बुद्ध हा त्यांच्या विचारविश्वातील समान धागा होता, ज्यातून भारतीय जनतेच्या कल्य़ाणाचं स्वप्न त्यांनी ध्येय म्हणून अंगीकारलं होतं.नेहरूं देशाचे पहिले पंतप्रधान! सतत सतरा वर्ष या पदावर ते कार्यरत होते. घटनेतील समतावादी संसदीय लोकशाही तत्वांची अंमलबजावणी त्यांनी समर्थपणे केली! त्यांच्या राजकीय विरोधकांना आणि एकाच धर्माची सत्ता देशात असावी अशी स्वप्ने बाळगणा-यांना बुद्धाबद्ल,अशोकाबद्दल आणि नेहरूं, गांधी बद्दल आणि आंबेडकरांबद्दलही प्रचंड आकस होता! हे सर्वच त्यांना शत्रूसम वाटणे स्वाभाविक होते. वेदप्रणित शोषणावर प्रहार करणा-या बुद्धावर टीका करून, बुद्ध अनुयायी सम्राट अशोकाच्या शांततावादी धोरणामुळे देश कमजोर होवून पुढील काळातील इस्लाम आक्रमणासमोर टिकू शकला नाही ,अशी टीका करताना कांहीजण आढळून येतात. गांधीजींच्या अंहिसेवर ही अशीच टिका झाल्याचेही दिसून येते. पण खेदाची बाब अशी की, बुद्ध आणि अशोक यांना मानणारे देखील गांधींवर, नेहरूंवर त्याच सुरात टीका करतात!

अशोक हा निव्वळ एक भारतीय राजा वा सम्राट म्हणून नव्हे, किंवा तो केवळ कोण्या एका धर्माचा म्हणून नव्हे! तर जगातील महान मानवी संस्कृतीतील तो एक थोर पुरूष म्हणून त्याची थोरवी आहे. जी सार्वकालिक आहे. पण तो भारतीय असल्यामुळे अभिमान वाटण्याची संधी आपणास मिळाली आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.

Related posts

पोटातले ओठावर!

हिंदुदुर्ग!

Lok Sabha : खेळपट्टी खराब करण्याचा संसदीय खेळ