महाराष्ट्राच्या हितासाठी महायुती सरकार घालवणे गरजेचे

कोल्हापूर, प्रतिनिधीः राज्यातील महायुतीच्या सरकारच्या काळात भ्रष्टाचाराला ऊत आला. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये नेले. शेतकरी, तरुण, महिला असे सगळे घटक त्रासले आहेत. दिल्लीच्या इशा-यावर चालणारे हे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी सत्तेवरून खाली खेचले पाहिजे, असे मत खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी `महाराष्ट्र दिनमान`शी बोलताना व्यक्त केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी कोल्हापूरचे राजकारण, सध्याची राजकीय स्थिती, विधानसभा निवडणुकीचे वातावरण तसेच कोल्हापूर उत्तरच्या रिंगणातून मधुरिमाराजे छत्रपती यांची माघार, अशा विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला नाकारले आहे आणि तोच ट्रेंड विधानसभा निवडणुकीतही दिसत असल्याचे सांगून शाहू महाराज म्हणाले, राज्यातील महायुतीचे सरकार दोन पक्ष फोडून सत्तेवर आले आहे. अशा प्रकारची पक्षफोडी महाराष्ट्रातील जनतेला आवडलेली नाही. त्याविरोधातला राग जनतेने लोकसभा निवडणुकीत व्यक्त केला असला तरी यावेळी तो अधिक तीव्रतेने मतदान यंत्रातून व्यक्त होईल.

मधल्या काळात महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजनेसह अनेक योजना जाहीर केल्या आहेत, त्यांना प्रतिसाद मिळत आहे, याकडे लक्ष वेधले असता शाहू महाराज म्हणाले, लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईने काही निर्णय घेतले गेले आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेल्या निर्णयांकडे लोक फार गांभीर्याने बघत नाहीत. एकीकडे लाडकी बहीण योजना म्हणायचे आणि दुसरीकडे भाजपचे एक खासदार काँग्रेसच्या सभेला गेलेल्या महिलांचे फोटो काढा म्हणून सांगतात. सरकारी योजनांच्याबाबतही किती राजकारण केले जाते, हे यावरून दिसून येते.

लोकसभा निवडणुकीवेळी संविधान बदल, अल्पसंख्याकांची असुरक्षितता असे मुद्दे होते, या निवडणुकीत तुम्हाला कोणते मुद्दे दिसतात, असे विचारता शाहू महाराज म्हणाले, महागाईचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. शहरी-ग्रामीण सर्व लोकांना त्याची झळ सोसावी लागतेय. बेरोजगारीचा मुद्दा आहे. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये नेऊन इथल्या तरुणांचे रोजगार हिसकावून घेतले जात आहेत. एकीकडे लाडकी बहीण योजनेचा गाजावाजा केला जात असताना दुसरीकडे महिलांवरील अत्याचारातही वाढ होते आहे. शेतकरी वर्गात मोठा असंतोष आहे. असे सगळे मुद्दे आहेत आणि त्यावरून महायुती सरकारविरोधात जनमत दिसून येते.

कोल्हापूर उत्तरच्या उमेदवारीवरून जे प्रसंग उद्भवले ते सगळे आता मागे पडले असून, काँग्रेससह महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकजुटीने कामाला लागले आहेत. काँग्रेसचे चिन्ह नसले तरी राजेश लाटकर हे काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रेशर कुकर या चिन्हाने महायुतीवर प्रेशर निर्माण केले आहे.

उमेदवारीचा आणि माघारीचाही निर्णय मालोजीराजे आणि मधुरिमाराजे यांचा

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील उमेदवार बदलाच्या घटना-घडामोडींबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, आमच्या घरात खासदारकी असताना पुन्हा आमदारकी घ्यायची नाही, असे आम्ही ठरवले होते. त्यानुसार मधुरिमाराजे सुरुवातीपासून उमेदवारीच्या स्पर्धेत नव्हत्या, परंतु लाटकर यांच्या उमेदवारीला होणारा विरोध मोठा आहे, असे चित्र निर्माण केले गेले आणि त्या विशिष्ट परिस्थितीत त्यांची उमेदवारी पुढे आली. सामान्य कार्यकर्त्याला डावलून आपण उमेदवारी घ्यायची नाही, अशी सुरुवातीपासूनची माझी भूमिका होती. त्यामुळे लाटकर यांची माघार होत नाही हे लक्षात आल्यावर मधुरिमाराजे यांनी माघार घेतली. खरेतर नगरसेवकांच्या आग्रहानंतर उमेदवारी स्वीकारण्याचा निर्णय मालोजीराजे आणि मधुरिमाराजे यांचाच होता. आणि नंतर माघारीचा निर्णयही त्या दोघांचाच होता. मी फक्त त्यांच्या निर्णयाला संमती दिली होती.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी