IPL Timetable : आयपीएलचा अंतिम सामना ‘इडन गार्डन्स’वर

IPL Timetable

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या २०२५ च्या मोसमाचे वेळापत्रक रविवारी जाहीर करण्यात आले. २२ मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गतविजेते कोलकाता नाइट रायडर्स यांच्यादरम्यान इडन गार्डन्सवर या स्पर्धेचा सलामीचा सामना रंगेल. याच स्टेडियमवर २५ मे रोजी अंतिम सामना होणार आहे. (IPL Timetable)
यावर्षी ही स्पर्धा ६५ दिवस रंगणार असून यामध्ये दहा संघांदरम्यान ७४ सामने खेळवण्यात येतील. यांपैकी १२ दिवशी प्रत्येकी दोन सामने रंगणार आहेत. यंदाच्या स्पर्धेसाठी एकूण १३ स्टेडियम्सची निवड करण्यात आली आहे. सहभागी दहा संघांची घरची मैदाने वगळता गुवाहाटी, विशाखापट्टणम आणि धरमशाला येथील स्टेडिमवर स्पर्धेचे सामने रंगतील. यांपैकी गुवाहाटी व विशाखापट्टणम येथे दोन, तर धरमशाला येथे तीन सामने खेळवण्यात येणार आहेत. (IPL Timetable)
स्पर्धेच्या प्ले-ऑफ गटातील एक क्वालिफायर आणि एलिमिनेटर असे दोन सामने हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर रंगतील. दुसरा क्वालिफायर सामना इडन गार्डन्सवर होणार आहे. तब्बल दहा वर्षांनी इडन गार्डन्स स्टेडियमवर आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे. यापूर्वी, २०१३ आणि २०१५ च्या मोसमात या स्टेडियमवर अंतिम सामना खेळवण्यात आला होता. स्पर्धेतील दुपारचे सामने ३.३० पासून, तर सायंकाळचे सामने ७.३० पासून सुरू होतील. स्पर्धेतील सहभागी दहा संघांना दोन गटांत विभागण्यात आले आहे. (IPL Timetable)
प्रत्येक संघ आपल्या गटातील अन्य चार संघांशी, तसेच दुसऱ्या गटातील एका संघाशी प्रत्येकी दोन सामने खेळेल. दुसऱ्या गटातील बाकीच्या संघांशी प्रत्येक संघाचा एक सामना होईल. यापद्धतीने साखळी फेरीत प्रत्येक संघाचे १४ सामने होतील. साखळी फेरीअखेर गुणतक्त्यातील आघाडीच्या चार संघांना प्ले-ऑफ गटात प्रवेश मिळेल. गुणतक्त्यातील पहिले दोन संघ क्वालिफायर-१ सामना खेळतील. या सामन्यातील विजयी संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. तिसऱ्या व चौथ्या स्थानावरील संघांमध्ये एलिमिनेटर लढत होईल. यातील पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येईल, तर विजयी संघाची लढत क्वालिफायर-१मधील पराभूत संघाशी होईल. या क्वालिफायर-२ सामन्यामध्ये विजयी ठरणारा संघ अंतिम फेरी गाठेल.
हेही वाचा :

जैस्वाल उपांत्य सामन्यास मुकणार

Related posts

आयपीएलमध्ये विदर्भाच्या प्रफुल्ल हिंगेचा नवा विक्रम  

सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत ‘दिलबहार’उपांत्य फेरीत  

श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा सनराईज हैद्राबादवर विजय