भारताचा दणदणीत विजय

जोहान्सबर्ग, वृत्तसंस्था : संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्या झंझावाती नाबाद शतकांच्या जोरावर भारताने मालिकेतील चौथ्या व अखेरच्या टी-२० क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर १३५ धावांनी दणदणीत मात केली. या विजयासह भारताने ही मालिका ३-१ अशी जिंकली.

या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधार सूर्यकुमारचा निर्णय भारतीय फलंदाजांनी सार्थ ठरवला. संजू आणि अभिषेक शर्मा यांनी पॉवर प्लेमध्येच भारताला ७३ धावांची सलामी दिली. अभिषेक १८ चेंडूंमध्ये २ चौकार व ४ षटकारांसह ३६ धावा करून बाद झाला. त्यानंतर, संजू आणि तिलक यांनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद २१० धावांची भागीदारी रचत भारताला पावणेतीनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. संजूने मालिकेतील दुसरे आणि कारकिर्दीतील तिसरे टी-२० शतक झळकावताना ५६ चेंडूंमध्ये ६ चौकार व ९ षटकारांसह नाबाद १०९ धावा फटकावल्या. तिलकने मिळालेल्या दोन जीवदानांचा पुरेपूर लाभ घेत सलग दुसरे शतक साजरे केले. तो ४७ चेंडूंमध्ये ९ चौकार १० षटकारांसह १२० धावांवर नाबाद राहिला.

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने सुरुवातीच्या तीन षटकांमध्येच चार विकेट गमावल्या. त्यानंतर, ट्रिस्टन स्टब्ज, डेव्हिड मिलर यांनी ८६ धावांची भागीदारी रचून थोडेफार प्रयत्न केले. परंतु, महाकाय आव्हानापुढे त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. अखेर आफ्रिकेचा डाव १४८ धावांत संपुष्टात आला. भारतातर्फे अर्शदीप सिंगने ३, तर वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेलने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तिलक वर्मा सामनावीर व मालिकावीर ठरला.

संक्षिप्त धावफलक : भारत – २० षटकांत १ बाद २८३ (संजू सॅमसन नाबाद १०९, तिलक वर्मा नाबाद १२०, अभिषेक शर्मा ३६, ल्युथो सिम्पाला १-५८) विजयी विरुद्ध दक्षिण आफ्रिका – १८.२ षटकांत सर्वबाद १४८ (ट्रिस्टन स्टब्ज ४३, डेव्हिड मिलर ३६, मार्को यान्सन नाबाद २९, अर्शदीप सिंग ३-२०, अक्षर पटेल २-६).

विक्रम-पराक्रम

  • या सामन्यामध्ये भारताने डावात एकूण २३ षटकार ठोकले. भारतीय संघाने ‘टी-२०’च्या एका डावामध्ये ठोकलेले हे सर्वाधिक षटकार ठरले. यापूर्वी, मागील महिन्यात बांगलादेशविरुद्ध भारताने डावात २२ षटकार ठोकले होते.

Related posts

Mohammed Shami : शमीचा समावेश अद्याप दूरच

Tanush Kotian : तनुष कोटियनला ऑस्ट्रेलियाचे तिकीट?

Vinod Kambli : विनोद कांबळीची प्रकृती खालावली