India Won : भारताच्या मालिकाविजयात विक्रमांच्या राशी

नवी मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेतील तिसरा सामना जिंकताना अनेक नवे विक्रम नोंदवले. या विजयासह भारताने तीन सामन्यांची ही मालिका २-१ अशी जिंकली. (India Won)

मालिकेत सलग तिसऱ्यांदा प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने २० षटकांत ४ बाद २१७ धावा केल्या. सलामी फलंदाज उमा छेत्री पहिल्याच षटकात बाद झाल्यानंतर बदली कर्णधार स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी दुस्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी रचली. स्मृतीने सलग तिसरे अर्धशतक झळकावताना ४७ चेंडूंमध्ये १३ चौकार व एका षटकारासह ७७ धावा फटकावल्या. जेमिमाने २८ चेंडूंत ३९ धावा केल्या. या दोघी बाद झाल्यानंतर राघवी बिश्त आणि रिचा घोष यांनी संघास दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. रिचा अवघ्या २१ चेंडूंमध्ये ३ चौकार व ५ षटकारांसह ५४ धावा करून बाद झाली, तर राघवीने २२ चेंडूंत २ चौकार व एका षटकारासह नाबाद ३१ धावा केल्या. (India Won)

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला ९ बाद १५७ धावाच करता आल्या. विंडीजकडून शिनेल हेन्रीने सर्वाधिक ४३ धावा फटकावताना ३ चौकार व ४ षटकार लगावले. भारताकडून राधा यादवने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. (India Won)

विक्रमांच्या राशी

बाद २१७ भारतीय महिला क्रिकेट संघाचा ही टी-२० मधील सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी, आशिया कपमध्ये यूएईविरुद्ध केलेल्या ५ बाद २०१ धावा ही भारताची सर्वोच्च धावसंख्या होती. त्याचप्रमाणे, वेस्ट इंडिजविरुद्ध कोणत्याही संघाने नोंदवलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. ऑस्ट्रेलियाने २०२३ मध्ये विंडीजविरुद्ध केलेल्या ६ बाद २१२ धावांचा विक्रमही भारताने मागे टाकला.

३० स्मृती मानधनाही आंतरराष्ट्रीय महिला टी-२० मध्ये सर्वाधिकवेळा पन्नास धावांचा टप्पा पार करणारी फलंदाज ठरली. तिच्या नावावर ३० टी-२० अर्धशतके असून तिने न्यूझीलंडच्या सुझी बेट्सला (२८ अर्धशतके + १ शतक) मागे टाकले.

१८ रिचा घोषने १८ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करून आंतरराष्ट्रीय महिला टी-२० मधील सर्वांत वेगवान अर्धशतकाच्या विक्रमाशी बरोबरी केली. आतापर्यंत न्यूझीलंडची सोफी डिव्हाइन आणि फिबी लिचफिल्ड यांनी १८ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले आहे.

स्मृती मानधनाचे हे २०२४ मधील आठवे टी-२० अर्धशतक ठरले. याबरोबरच ती एका वर्षात सर्वाधिक टी-२० अर्धशतके झळकावणारी महिला फलंदाज ठरली. तिने भारताच्याच मिताली राजला मागे टाकले. मितालीने २०१८ मध्ये ७ टी-२० अर्धशतके झळकावली होती.

७६३ स्मृती मानधनाने या वर्षी टी-२०मध्ये २१ डावांत एकूण ७६३ धावा केल्या. एका वर्षांत ७५० टी-२० धावांचा टप्पा ओलांडणारी ती पहिलीच आंतरराष्ट्रीय महिला फलंदाज ठरली. या यादीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या श्रीलंकेच्या चमारी अटापट्टूने ७२० धावा केल्या आहेत.

हेही वाचा :

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत