इंडिया टुडे समूहाने घेतले १२० कर्मचाऱ्यांचे राजीनामे

नवी दिल्ली : टीव्ही टुडे नेटवर्क लिमिटेडच्या नोएडा येथील कार्यालयात गेल्या आठवड्यात अनेक कर्मचाऱ्यांना अचानक राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, २० ते २४ जुलैदरम्यान कंपनीच्या विविध विभागांतील सुमारे १२० कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्यास भाग पाडण्यात आले. यासंदर्भातील वृत्त `न्यूज लाँड्री`ने दिले आहे. दरम्यान या मोठ्या समूहातील कपातीमुळे माध्यम जगतात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (India Today Group lays off 120 employees)

आजच तुमचा शेवटचा दिवस आहे

एका कर्मचा-याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या बुधवारी त्यांची ड्युटी संपण्याच्या सुमारे तासभर आधी त्यांना नोएडा सेक्टर-१६ येथील कार्यालयाच्या तळमजल्यावरील एका केबिनमध्ये बोलावण्यात आले. ते गेली दोन वर्षे आज तक हिंदी वेबसाइट विभागात कार्यरत होते.

त्यांच्या म्हणण्यानुसार, तेथे त्यांचे व्यवस्थापक आणि मानव संसाधन (HR) विभागातील प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांना, “आज तुमचा शेवटचा दिवस आहे. कृपया तुमचा राजीनामा द्या,” असे सांगण्यात आले. (India Today Group lays off 120 employees)

संबंधित कर्मचा-याच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या फुल अँड फायनल सेटलमेंटची कागदपत्रे आधीच तयार ठेवण्यात आली होती आणि ही कारवाई कंपनीतील पुनर्रचना (Restructuring) प्रक्रियेचा भाग असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी राजीनामा सादर केला, लॅपटॉप आणि ओळखपत्र जमा केले आणि कार्यालयातून बाहेर पडले.

कोणकोणत्या विभागांना फटका?

कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सर्वाधिक परिणाम आज तक हिंदी वेबसाइट विभागावर झाला. याशिवाय कॅमेरा ऑपरेशन्स, व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक्स, फॅक्ट-चेकिंग, डेटा इंटेलिजन्स युनिट आणि आज तक रेडिओ या विभागांतील कर्मचाऱ्यांनाही राजीनामे देण्यास सांगण्यात आले. काही कर्मचारी इंडिया टुडे इंग्रजी वेबसाइट विभागातीलही असल्याचा दावा करण्यात आला असल्याचे न्यूज लाँड्रीच्या यासंदर्भातील बातमीत म्हटले आहे. (India Today Group lays off 120 employees)

राजीनामा की बडतर्फी?

कर्मचाऱ्यांच्या दाव्यानुसार, बहुतेकांनी एचआर आणि व्यवस्थापकांच्या सांगण्यावरून राजीनामा दिला. ज्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला, त्यांना थेट सेवेतून कमी करण्यात आले.

त्यांच्या म्हणण्यानुसार राजीनामा देणाऱ्यांना दोन महिन्यांचा पूर्ण पगार देण्याचे आश्वासन देण्यात आले. बडतर्फ करण्यात आलेल्यांना दोन महिन्यांचा केवळ मूळ पगार (Basic Salary) देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, या दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी होऊ शकलेली नाही.

सहकाऱ्यांनाही भेटू दिले नाही

आज तक मध्ये १३ वर्षांपासून कार्यरत असल्याचा दावा करणारे एक कर्मचारी म्हणाले की, कर्मचाऱ्यांना वेतनवाढीच्या प्रक्रियेची प्रतीक्षा होती आणि त्यासंबंधीचे फॉर्मही अद्याप वितरित झाले नव्हते. त्यांच्या मते, गुरुवारी ते नेहमीप्रमाणे कार्यालयात आले. काही वेळाने त्यांनाही खाली बोलावण्यात आले आणि तातडीने राजीनामा देण्यास सांगण्यात आले.

हेही वाचाः नोटाबंदी आणि अर्थव्यवस्थेचे वर्षश्राद्ध

 “१३ वर्षे या संस्थेसाठी काम केले, पण मला माझ्या सहकाऱ्यांनाही भेटू दिले नाही. माझ्या कामात काही त्रुटी असत्या, तर मी इतकी वर्षे येथे टिकू शकलो असतो का? मला फसवल्यासारखे वाटत आहे,” असे त्यांनी सांगितले. (India Today Group lays off 120 employees)

चार वर्षे काम केल्याचा दावा करणाऱ्या एका महिला कर्मचा-यानेही असाच अनुभव सांगितला. २१ जुलै रोजी त्यांची ड्युटी दुपारी २ वाजेपर्यंत होती. मात्र दुपारी १२ वाजताच त्यांना खाली बोलावून राजीनामा देण्यास सांगण्यात आले. डेस्कवर राहिलेल्या वैयक्तिक वस्तू आणण्यासाठी वर गेल्यामुळे त्यांना सहकाऱ्यांचा निरोप घेता आला.

काही कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या दिवशी कंपनीचा उर्वरित लॅपटॉप किंवा साहित्य परत करण्यासाठी कार्यालयात आलेल्या कर्मचाऱ्यांना प्रवेशद्वारावरच थांबवून साहित्य जमा करून घेण्यात आले.

आर्थिक अडचणींचा परिणाम?

कंपनीतील एका वरिष्ठ कर्मचाऱ्याच्या दाव्यानुसार, ही कर्मचारी कपात आर्थिक दबावामुळे करण्यात आली आहे. त्यांच्या मते, गेल्या वर्षीही मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीची योजना होती; मात्र ती तेव्हा टळली. यावेळी व्यवस्थापनाने ती अंमलात आणली असून, ही प्रक्रिया पुढेही सुरू राहू शकते.

हेही वाचाः Artificial Intelligence : आर्टिफिशल इंटिलिजंस, अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता – भारतीय युवकांनो, सावधान !

आज तक आणि इंडिया टुडे सारख्या ब्रँडचे संचालन करणाऱ्या या कंपनीच्या आर्थिक कामगिरीत गेल्या आर्थिक वर्षात मोठी घसरण झाली. उपलब्ध आर्थिक अहवालांनुसार— वार्षिक निव्वळ नफा ८१ टक्क्यांनी घसरून सुमारे १४ कोटी रुपयांवर आला. कंपनीचे एकूण उत्पन्न १९ टक्क्यांनी घटून सुमारे ८०७ कोटी रुपये राहिले. यामागे जाहिरात महसुलातील घट, पुनर्रचना खर्च आणि रेडिओ व्यवसायातील तोटा ही प्रमुख कारणे असल्याचे वृत्त आहे.

अद्याप सेवेत असलेल्या काही कर्मचाऱ्यांचा दावा आहे की, कर्मचारी कपातीची प्रक्रिया थांबलेली नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार मे महिन्याच्या अखेरीस इंडिया टुडे मासिकाशी संबंधित सहा कर्मचाऱ्यांनाही अशाच पद्धतीने कमी करण्यात आले. अलीकडेच अनेक उच्च वेतनाचे कर्मचारी एनडीटीव्हीमध्ये गेले. सध्या नोकरी गमावणाऱ्यांमध्ये महिन्याला सुमारे ३० हजार रुपये वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

कंपनीची प्रतिक्रिया नाही

या संदर्भात कंपनीच्या HR विभागाला, न्यूज डायरेक्टर सुप्रिया प्रसाद आणि ग्रुप कन्सल्टिंग एडिटर बी. व्ही. राव यांना प्रश्न पाठवले आहेत. त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नसल्याचे न्यूज लाँड्रीच्या बातमीत म्हटले आहे.

Related posts

आसाममधील ग्रामपंचायतीचे स्वयंपूर्ण कचरा व्यवस्थापन

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

दिल्ली पोलिसांचे क्रौर्य चिंताजनक