India-Australia: ऑस्ट्रेलियाने भारताला १८४ धावांनी हरवले

Australia-India

मेलबर्न : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा दुसरा डाव १५५ धावांवर गुंडाळत १८४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह यजमानांनी पाच सामन्यांच्या या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. सोमवारी, अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने भारताला जिंकण्यासाठी ३४० धावांचे लक्ष्य दिले होते. परंतु, भारताच्या दिग्गज फलंदाजांनी ऑसी गोलंदाजांपुढे नांगी टाकल्याने संघाला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड चॅम्पियनशीपची अंतिम फेरी गाठण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. तर भारताचा या स्पर्धेच्या अंतिम फेरीतील प्रवेश जर-तरच्या गणितावर अवलंबून असेल.(India-Australia)

भारतातर्फे यशस्वी जैस्वालने कडवी झुंज देत ८४ धावा जमवल्या. पण त्याला बाद करण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला. डीआरएसमध्ये बॅटला चेंडू लागला नसताना पंचांनी त्याला बाद ठरवल्याने ‘पंचानी जैस्वालला कापला,’ अशी भावना तमाम भारतीय क्रिकेटशौकिनांकडून उमटली. ऑसी कर्णधार पॅट कमिन्स सामनावीर ठरला. त्याने दोन डावांत सहा बळी घेण्याबरोबरच फलंदाजीतही मोठा हातभार लावला. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४७४ धावा केल्यानंतर भारताने पहिला डावात ३६९ धावा केल्या. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला १०५ धावांची आघाडी मिळाली होती. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २३४ धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारतासमोर विजयासाठी ३४० धावांचे आव्हान होते.(India-Australia)

कर्णधार रोहित शर्मा, राहुल, कोहली झटपट बाद

विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या भारताच्या सलामी जोडीने सुरवातीला सावध खेळ करत आठ षटकांत १२ धावा जमवल्या. पॅट कमिन्सने रोहितला ९ धावावर बाद केले. त्यानंतर मैदानावर उतरलेल्या केएल राहुलला पहिल्याच चेंडूवर कमिन्सने शून्य धावावर मैदानाबाहेर घालवले. पहिल्या स्लीपमध्ये ख्वाजाने त्याचा झेल घेतला. उपाहारापूर्वीच्या शेवटच्या मिचेल स्टार्कच्या षटकात पहिल्याच चेंडूवर विराट कोहली फटका मारण्याच्या नादात बाद झाला. त्याने पाच धावा केल्या. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा भारताची स्थिती ३ बाद ३३ अशी होती.

जैस्वाल-पंतने डाव सावरला; जैस्वालचे अर्धशतक

उपाहारानंतर यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी खेळपट्टीवर चांगलाच तग धरला होता. ४० व्या षटकात यशस्वी जैस्वालने १२७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यावेळी भारताची धावसंख्या ३ बाद ८६ होती. या दोघांनी संपूर्ण सत्रात ऑस्ट्रेलियाला यश मिळू न देता संघाचे शतक धावफलकावर झळकावले. चहापानापर्यंत भारताने ३ बाद ११५ धावा केल्या होत्या. चहापानानंतर ट्रॅव्हिस हेडच्या चेंडूवर फटका मारण्याच्या नादात पंत बाद झाला. सीमारेषेवर मिचेल मार्शने त्याचा झेल टिपला. त्यानंतर मैदानात उतरलेला रवींद्र जडेजा अवघ्या दोन धावा करून तंबूत परतला. स्कॉट बॉलंडने त्याला बाद केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजानी टिच्चून मारा करत भारतीय फलंदाजांना खेळपट्टीवर टिकू दिले नाही. पहिल्या डावात शतक झळकावणारा नितीश कुमार रेड्डी एका धावावर बाद झाला. ऑफ स्पिनर नॅथन लायनच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये स्टीव्ह स्मिथने आरामात त्याचा झेल टिपला.(India-Australia)

जैस्वाल ‘बाद’ चा निर्णय वादग्रस्त

रेड्डी बाद झाल्याने भारताच्या गोटात पराभवाची चिंता सतावू लागली. एका बाजूला यशस्वी जैस्वाल खेळपट्टीवर ८४ धावांवर टिकून होता. मिचेल स्टार्कच्या उसळता चेंडूवर हूक मारण्याच्या नादात जैस्वाल बाद झाला. मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद ठरवल्यानंतर ऑस्ट्रेलियाने डीआरएस घेतला. पण चेंडू त्याच्या बॅटला आणि ग्लोव्ह्जला लागला नसतानाही त्यांना बाद ठरवण्यात आल्याने पंचाच्या निर्णयावर जैस्वालने नाराजी व्यक्त केली. मैदानावर उपस्थित भारतीय क्रिकेट समर्थकांनी पंचाच्या निर्णयाची खिल्ली उडवली. जैस्वाल बाद झाल्याने ऑस्ट्रेलिया विजयाच्या समीप आला. आकाश दीप आणि जसप्रीत बुमराह पाठोपाठ बाद झाल्यानंतर भारताला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलॅंडने प्रत्येकी तीन, तर लायनने दोन विकेट घेतल्या.

धावफलक

  • ऑस्ट्रेलिया : पहिला डाव ४७४ आणि दुसरा डाव ८३.४ षटकांत सर्वबाद २३४.
  • भारत : पहिला डाव ३६९ आणि दुसरा डाव – यशस्वी जैस्वाल झे. कॅरी गो. कमिन्स ८४, रोहित शर्मा झे. मार्श गो. कमिन्स ९, लोकेश राहुल झे. ख्वाजा गो. कमिन्स ०, विराट कोहली झे. ख्वाजा गो. स्टार्क ५, रिषभ पंत झे. मार्श गो. हेड ३०, रवींद्र जडेजा झे. कॅरी गो. बोलंड २, नितीश कुमार रेड्डी झे. स्मिथ गो. लायन १, वॉशिंग्टन सुंदर नाबाद ५, आकाश दीप झे. हेड गो. बोलंड ७, जसप्रीत बुमराह झे. स्मिथ गो. बोलंड ०, महंमद सिराज पायचीत गो. लायन ०, अवांतर १२, एकूण – ७९.१ षटकांत सर्वबाद १५५.
  • बाद क्रम : १-२५, २-२५, ३-३३, ४-१२१, ५-१२७, ६-१३०, ७-१४०, ८-१५०, ९-१५४, १०-१५५.
  • गोलंदाजी : मिचेल स्टार्क १६-८-२५-१, पॅट कमिन्स १८-५-२८-३, स्कॉट बोलंड १६-७-३९-३, मिचेल मार्श ३-२-२-०, नॅथन लायन २०.१-६-३७-२, ट्रॅव्हिस हेड ५-०-१४-१, मार्नस लॅबुशेन १-१-०-०.

https://www.espncricinfo.com/series/australia-vs-india-2024-25-1426547/australia-vs-india-4th-test-1426558/full-scorecard

हेही वाचा :

कोनेरू हम्पी विश्वविजेती
अर्शदीपला आयसीसीचे नामांकन

Related posts

KSA Football : ‘पाटाकडील’ला ‘दिलबहार’ने रोखले

Karun Nair : करुण नायरचा विश्वविक्रम

India’s unwanted Records : भारताचे नकोसे विक्रम