IND vs AUS : तिसऱ्या कसोटीत वरूण राजाची खेळी, सामना अनिर्णित

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी अनिर्णित राहिली. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २७५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता आठ धावा केल्या. परंतु, पावसाने पुन्हा एखदा सामन्यात व्यत्यय आणला. त्यानंतर सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. (IND vs AUS)

सामन्यात नाणेफेक गमावून फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या. यात हेडने आणि स्मिथने शतकी खेळी करत संघाला ४०० धावांचा टप्पा पार करून दिला. हेडने (१५२) आपल्या कसोटी कारकिर्दीतील नववे शतक तर स्मिथने (१०१) ३३वे शतक झळकावले. उस्मान ख्वाजा (२१) आणि नॅथन मॅकस्विनी (९) यांना बाद करून बुमराहने ऑस्ट्रेलियाला दोन धक्के दिले. यानंतर नितीश रेड्डीने मार्नस लॅबुशेनला (१२) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मात्र, यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडने चौथ्या विकेटसाठी २४२ धावांची भागीदारी केली. मिचेल मार्श पाच धावा करून आणि कर्णधार पॅट कमिन्स २० धावा करून बाद झाला.

कमिन्सने कॅरीसोबत सातव्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. मिचेल स्टार्कला बुमराहने तर नॅथन लायनला सिराजने बाद केले. त्याचवेळी आकाश दीपने कॅरीला (७०) बाद करून ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिली विकेट घेतली. बुमराहने सहा विकेट घेतल्या. त्याचवेळी सिराजला दोन विकेट मिळाल्या. आकाश दीप आणि नितीश यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. (IND vs AUS)

ऑस्ट्रेलियाने केलेल्या ४४५ धावांच्या प्रत्युत्तरात भारताचा डाव २६० धावांवर गारद झाला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी सुमार कामगिरी केली. यात यशस्वी (४), गिल (१), विराट (३) पंत (९) आणि रोहित (१०) यांचा समावेश आहे. यानंतर राहुलने जडेजासोबत ६७ धावांची भागीदारी केली. परंतु, राहुलचे शतक हुकले आणि तो १३९ चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने ८४ धावा करून बाद झाला.

यानंतर नितीश रेड्डी आणि रवींद्र जडेजा यांनी सातव्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. नितीश १६ धावा करून कमिन्सच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. तर सिराजला एक धाव करून तंबूत परतला. तर, दुसऱ्या टोकाने फलंदाजी करणाऱ्या जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीतील २२वे अर्धशतक झळकावले. तो नववा विकेट म्हणून बाद झाला. त्याला कमिन्सने मार्शच्या हाती झेलबाद केले. जडेजाने १२३ चेंडूंत ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ७७ धावांची खेळी केली. यानंतर बुमराह आणि आकाशने संयमी खेळी करत भारताला फॉलोऑनपासून वाचवले. त्यांनी १०व्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली. (IND vs AUS)

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरूवात खराब झाली. त्यांनी ३३ धावांत पाच विकेट गमावल्या. यात बुमराहने उस्मान ख्वाजा (८) आणि मार्नस लबुशेन (१) यांना बाद केले. यानंतर आकाश दीपने नॅथन मॅकस्विनी (४) आणि मिचेल मार्श (२) यांना बाद केले. सिराजने स्टीव्ह स्मिथला (४) बाद करून निम्मा ऑस्ट्रेलियन संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला. ट्रॅव्हिस हेड आणि ॲलेक्स कॅरी यांनी सहाव्या विकेटसाठी २७ धावांची भागीदारी केली. सिराजने यष्टिरक्षक पंतला हेडकरवी झेलबाद केले. त्याला १७ धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाला ८५ धावांवर कमिन्सच्या रूपाने सातवा धक्का बसला आणि ऑस्ट्रेलियाचा डाव ८९ धावांवर घोषित करण्यात आला. २० धावांवर कॅरी आणि २ धावांतर स्टार्क नाबाद राहिला. भारताकडून बुमराहने तीन विकेट घेतल्या. तर सिराज आणि आकाशने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

१२ वर्षांनी सामना अनिर्णित

गाबा कसोटीत पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दिवशी केवळ १३.२ षटकांचा खेळ झाला. दुसरा दिवस वगळता उर्वरित चार दिवस पावसाने व्यत्यय आणला. नोव्हेंबर २०१२ नंतर ब्रिस्बेनमध्ये पहिल्यांदाच कसोटी अनिर्णित राहिली आहे. यापूर्वी नोव्हेंबर २०१२ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळली गेलेली कसोटी अनिर्णित राहिली होती. त्या आणि या कसोटी सामन्यादरम्यान ११ कसोटी सामने झाल्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये चौथा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

हेही वाचा :

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत