कन्नडमध्ये पती-पत्नी, बीडला भाऊ – भाऊ तर लोह्यात बहिण – भावात लढत 

रणजित खंदारे;  छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप अशा विविध पक्षांमध्ये अनेक मातब्बर नेते होऊन गेले. त्यांनी मराठवाड्याबरोबरच महाराष्ट्राच्या राजकारणातही आपला ठसा उमटवला. या नेत्यांची पुढची पिढी आपापल्या मतदारसंघात वारसा हक्क चालवण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरली आहे. यंदाच्या विधानसभा   निवडणुकीतील वैशिष्ट्य म्हणजे कन्नड मतदारसंघात रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्याविरुद्ध त्यांचे पती माजी आमदार हर्षवर्धन जाधव रिंगणात आहेत. बीड मतदारसंघात संदीप क्षीरसागर आणि डॉ. योगेश क्षीरसागर हे सख्खे चुलत भाऊ तर लोहा मतदारसंघात प्रताप पाटील चिखलीकर आणि त्यांच्या भगिनी आशाताई शिंदे एकमेकांविरुद्ध लढत आहेत.

तुळजापुरातून लढताहेत अजित पवारांचे भाचे

तुळजापूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असलेले राणाजगजितसिंह पाटील हे शरद पवारांचे खंदे समर्थक असलेले माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव आहेत. तसेच ते अजित पवार यांचे भाचे आहेत. कारण सुनेत्रा पवार या डॉ. पाटील यांच्या भगिनी आहेत. परंडा मतदार संघातील उमेदवार राहुल मोटे हे डॉ. पद्मसिंह पाटील यांचे भाचे आहेत. अनेक नेत्यांमध्ये असे नात्यागोत्याचे राजकारण पाहायला मिळते.

बीडमध्ये भावकिची लढाई

बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघापैकी बीड आणि परळी या दोन मतदारसंघात महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. परळी मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे उभे आहेत.

बीड मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या उमेदवारांत लढत आहे. लढणारेही क्षीरसागर घराण्यातील दोन सख्खे  चुलत भाऊ आहेत. त्यामुळे तेथील लढत ही खऱ्या अर्थाने भावकितील लढत म्हणता येईल.

बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून विद्यमान आमदार संदीप रवींद्र क्षीरसागर यांना तर त्यांचे चुलत बंधू डॉ. योगेश भारतभूषण क्षीरसागर यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात त्यांचे चुलते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनीही अर्ज भरला होता. त्यामुळे एकाच कुटुंबातील काका – पुतण्यांमध्ये ही तिरंगी लढत होईल, असे चित्र होते. मात्र शेवटच्या दिवशी काका जयदत्त क्षीरसागर यांनी माघार घेतली. तसे ते दोन्ही पुतण्यांकडून दुखावलेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत ते काय भूमिका घेतात हे महत्वाचे ठरणार आहे.

मराठवाड्यातील केशरकाकू क्षीरसागर यांचं घराणं हे मातब्बर राजकीय घराणं म्हणून ओळखलं जातं. त्यांचे पती सोनाजीराव क्षीरसागर हे काँग्रेसचे कार्यकर्ते. १९७२ मध्ये ते बीड जिल्ह्यातील चौसाळा मतदारसंघातून आमदार झाले होते. त्यानंतर १९८० ते १९९१ अशा तीन वेळा काकू बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. इंदिरा गांधी यांच्याकडे साखर कारखान्याचा प्रस्ताव घेऊन जाणाऱ्या काकू पहिल्या महिला खासदार होत्या. स्पष्टवक्त्या आणि निर्भीड असलेल्या काकू इंदिरा गांधी यांच्या विश्वासू म्हणून ओळखल्या जात होत्या.

काकूंची चारपैकी डॉ. विठ्ठल क्षीरसागर वगळता तिघे मुलं राजकारणात सक्रिय झाली. प्रारंभी त्यांनी आपापली राजकीय क्षेत्र निश्चित केली होती. जयदत्त क्षीरसागर हे राज्याच्या राजकारणात असल्याने त्यांनी चौसाळा आणि बीड मतदारसंघातून निवडणुका लढवल्या. ते चार वेळा आमदार झाले. त्यांना राज्यमंत्रीपदाचीही संधी मिळाली.

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी बीड नगर पालिकेत जवळपास ३० वर्षे नगराध्यक्षपद भूषविले. त्यांच्या पत्नी डॉ. दिपा क्षीरसागरही नगराध्यक्ष होत्या. तर रवींद्र क्षीरसागर यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेत सक्रिय राहिले. तसेच काकूंनी उभारलेल्या गजनान सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते.

क्षीरसागर कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील आमदार संदीप, त्यांचे बंधू हेमंत आणि डॉ. योगेश हे राजकारणात सक्रिय आहेत. गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक कलहामुळे क्षीरसागर कुटुंबातील प्रत्येकजण राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आपापले मार्ग शोधत आहेत.

जयदत्त क्षीरसागर २००९ आणि २०१४ असे सलग दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसकडून बीडमधून विजयी झाले होते. मात्र, कुटुंबातील कलाहानंतर संदीप क्षीरसागर २०१९ ला राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट मिळविण्यात यशस्वी झाले. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली. मात्र, काका पुतण्याच्या लढाईत संदीप क्षीरसागर विजयी झाले. पुढे जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत असूनही पक्षात अलिप्त राहिले. परिणामी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर ते कोणत्याही पक्षात सहभागी झालेले नाहीत.

कमळमुक्त परळीत मुंडेंची अस्तित्वाची लढाई

निर्भिड,परखड अशी ओळख असलेल्या गोपीनाथ मुंडे यांचा हा मतदारसंघ. लोक संघटनात हातखंडा असल्याने त्यांना लोकनेता अशी ओळख मिळाली होती. त्यांची सामाजिक व राजकीय कारकीर्द परळीमधूनच उदयाला आली आणि ती दिल्लीपर्यंत फुलली. पाच वेळा आमदार राहिलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या या मतदारसंघात १९८० पासून २०१९ च्या निवडणुकीपर्यंत त्यांनी कमळ चिन्हावरच निवडणूक लढली. यावेळी ही जागा महायुतीत अजित पवार यांच्याकडे गेली आहे. त्यामुळे तब्बल ४४ वर्षांनंतर प्रथमच कमळ चिन्हाशिवाय ही निवडणूक होत आहे.

यावेळी तेथे अजित पवारांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना तर त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे ही बहिण-भावंड एकत्र आली असल्याने ही निवडणूक एकतर्फी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक उमेदवारांपेक्षा मतदारांनी मराठा विरुद्ध वंजारा या वादावर नेली गेल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. त्यामुळे ही निवडणूकही त्याच धर्तीवर होईल, असे बोलले जाते. कारण धनंजय मुंडे हे वंजारा समाजातून येतात. तर शरद पवारांनी उमेदवारी दिलेले राजेसाहेब देशमुख हे मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे एकतर्फी वाटणारी ही निवडणूक चुरशीची होईल असे दिसते.

१९८० पासून पूर्वीचा रेणापूर आणि आताचा परळी मतदारसंघ मुंडे कुटुंबांचा गड मानला जातो. पक्ष कोणताही असला तरी हा गड मुंडे कुटुंबीयांकडेच ठेवण्याचे धनंजय मुंडे यांच्यासमोर आव्हान आहे.

केशर काकू क्षीरसागर यांच्यानंतर बीड जिल्ह्यातील राजकारणावर गोपीनाथ मुंडे यांनी प्रभुत्व मिळवले होते. मुंडे हे विद्यार्थी दशेपासूनच अभाविप व पुढे भारतीय जनता पक्षात अगदी शेवटपर्यंत कार्यरत राहिले.  त्यांनी सर्वप्रथम १९७८ ला रेणापूर मतदारसंघातून जनता जनता पक्षाकडून निवडणूक लढवली, मात्र त्यावेळी ते पराभूत झाले. त्यानंतर १९८० ला ते भाजपकडून निवडणूक लढवून विजयी झाले. मात्र १९८५ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या पंडितराव दौंड यांनी त्यांना पराभूत केले त्यानंतर १९९० ते २००४ पर्यंत सलग चार वेळा ते या मतदारसंघातून आमदार झाले. २००८ च्या पुनर्रचनेमध्ये रेणापूर मतदारसंघ बाद करून परळी हा नवीन मतदार संघ अस्तित्वात आला. या नव्या मतदारसंघात त्यांनी त्यांची कन्या पंकजा मुंडे यांना वारसदार केले व स्वतः बीड लोकसभा मतदारसंघातून २००९ आणि २००१४ ची निवडणूक जिंकून ते केंद्रीय राजकारणात गेले.  २००९ आणि २०१४ अशा दोन निवडणुका पंकजा मुंडे यांनी जिंकल्या. क्षीरसागर कुटुंबाप्रमाणे मुंडे कुटुंबातही गृहकलह झाल्याने त्यांचे पुतणे धनंजय मुंडे हे त्यांच्यापासून दुरावले व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. २०१४ ला परळी मतदारसंघात भाजपकडून पंकजा मुंडे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे अशी बहीण भावामध्ये लढत झाली. या निवडणुकीत पराभूत झालेल्या धनंजय मुंडे यांनी २०१९ च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव केला. परिणामी दोन्ही भावंडांमधील दुरावा वाढतच गेला. ग्रामीण भागात भावकीचा वाद चव्हाट्यावर आला, असे बोलले जाते. त्याप्रमाणे हे बहिण – भाऊ एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात कधीही मागे हटत नव्हते.

 गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर २०१९ ला बीड लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या दुसऱ्या कन्या डॉ. प्रीतम मुंडे या विजयी झाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर धनंजय मुंडे हे अजित पवारांसोबत गेले. अजित पवार भाजप भाजपसोबत गेल्यानंतर महायुतीत काम करताना पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची पंचायत होऊ लागली तसेच दोघांचाही एकच मतदारसंघ असल्यामुळे राजकीय अस्तित्वाचाही प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे दोघांनी हळूहळू जुळवून घेण्यास सुरुवात केली. पुढे पंकजा मुंडे यांनी लोकसभा तर धनंजय मुंडे विधानसभा यांनी लढायची असे ठरले. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभेत पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला. पण भाजपने त्यांना लागलीच राज्यसभेवर संधी दिली. लोकसभेप्रमाणे आता विधानसभेच्या प्रचारातही दोघे बहिण-भाऊ एकत्र काम करताना दिसत आहेत. मात्र पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लोकसभेला धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी काम केले नाही, असा आरोप केला जात होता. ते कार्यकर्ते आता विधानसभेला धनंजय मुंडे यांना मदत करतात की नाही हेही महत्त्वाचं ठरणार आहे.

दोन मतदारसंघात लढताहेत दानवे यांचे वारसदार

राज्यभर ओळखलं जाणार मराठवाड्यातील आणखी एक घराणं म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे घराणं होय.  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने लागोपाठ पाच वेळा खासदार होणाऱ्या दानवे यांचा सलग विजयाचा षटकार हुकला.

रावसाहेब दानवे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात ग्रामपंचायत व नंतर पंचायत समिती अशा स्थानिक स्वराज्य संस्थेतून झाली. १९९० व १९९५ असे दोनदा  विधानसभेवर तर त्यानंतर १९९९ ते २०१९ अशा पाच वेळा लोकसभेवर विजय मिळवत सलग सात निवडणुका जिंकणारे श्री. दानवे हे भाजपमधील महत्त्वाचं व्यक्तिमत्व मानलं जातं. स्वतःची विजयी घोडदौड सुरू असतानाच २००९  मध्ये त्यांच्या पत्नी निर्मला दानवे यांना पुन्हा भोकरदन विधानसभा मतदारसंघात उभा करून वारसदारासाठी मतदारसंघ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी त्यांच्या पत्नींचा पराभव झाला. त्यानंतर २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भोकरदनमधून त्यांचे चिरंजीव संतोष दानवे हे आमदार झाले. आता यंदाच्या निवडणुकीत पुन्हा संतोष दानवे भाजपकडून उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून माजी आमदार चंद्रकांत दानवे यांना उमेदवारी दिली असून दोघांमध्ये चुरशीची लढत आहे. दोन्ही उमेदवार दानवे असले तरी त्यांची गावे वेगवेगळी असून त्यांचं भावकीचं नातं नाही.

मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भातील रावसाहेब दानवे यांची वक्तव्ये खटकल्यामुळे मराठा तरुणांमध्ये त्यांच्याबद्दल रोष होता. त्यांच्या लोकसभेच्या पराभवामध्ये ते एक महत्त्वाचं कारण मानलं जातं. विधानसभा निवडणुकीतही संतोष दानवे यांना या तरुणांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून त्याचा फटका बसेल, असे बोललं जात आहे.

कन्नडमध्ये दानवे यांच्या कन्या शिंदे गटाच्या उमेदवार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघात रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना हर्षवर्धन जाधव या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून त्यांचे पती माजी आमदार हर्षवर्धन जाधव तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघात अपक्ष उमेदवारांची संख्याही मोठी आहे.

संजना जाधव यांचं सासरही राजकीय घराणं आहे. त्यांचे सासरे रायभान जाधव काँग्रेसचे जुने नेते होते. कन्नड विधानसभा मतदारसंघातून ते तीन वेळा आमदार झाले. त्यांच्या पत्नी तेजस्विनी जाधव याही एक वेळ आमदार होत्या. त्यानंतर त्यांचे पुत्र व रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन पाटील यांनीही एकदा मनसे व दुसऱ्यांदा शिवसेनेकडून या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. या पती-पत्नीतील वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे.

लोहा मतदारसंघात बहिण – भावात लढत

नांदेड जिल्ह्यात असलेल्या लोहा मतदार संघात विद्यमान आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी यावेळी त्यांच्या पत्नी आशाताई शिंदे यांना शेकापकडून उभे केले आहे. भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे अजित पवार गटाकडून तर उध्वव ठाकरे गटाकडून एकनाथ पवार या मतदारसंघात लढत आहेत. श्री चिखलीकर आणि आशाताई शिंदे हे बहीण – भाऊ आहेत.

२०१९ मध्ये श्री चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव करून काँग्रेसचा नांदेड लोकसभेचा गड भाजपला मिळवून दिला होता. दरम्यान २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे चिखलीकर अस्वस्थ होते. तरीही भाजपने त्यांना पुन्हा लोकसभेचे तिकीट दिले. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ते पाचव्यांदा पक्ष बदलत अजित पवार गटात दाखल झाले. यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास झालेला आहे

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतही वारसदार उमेदवार

विधानसभा निवडणुकीसोबत नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे या मतदारसंघातही दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण काँग्रेसचे उमेदवार आहेत. वसंतराव चव्हाण हे एक वेळा विधानपरिषद तर दोन वेळा विधानसभेचे सदस्य होते.  २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेसकडून विजयी झाले होते मात्र ऑगस्ट २०२४ मध्ये त्यांचे आजाराने निधन झाले. त्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. त्यांचे वडील बळवंतराव चव्हाण हे आमदार होते. या चव्हाण घराण्याचा वारसा आता रविंद्र चव्हाण यांच्याकडे आला आहे.

मराठवाड्यातील आणखी काही वारसदार

मतदारसंघ ——– वारसदार ——–  घराणे

१) घनसावंगी – राजेश टोपे (शरद पवार गट) – अंकुशराव टोपे

२) औरंगाबाद पूर्व – अतुल सावे (भाजप)- मोरेश्वर सावे

३) पैठण – विलास भुमरे (शिंदे गट) – संदिपान भुमरे

४) परंडा – राहुल मोटे (शरद पवार गट) – महारुद्र मोटे

५) जिंतूर – मेघना बोर्डीकर (भाजप) – रामप्रसाद बोर्डीकर

६) गेवराई – विजयसिंह पंडित (अजित पवार गट) – शिवाजीराव पंडित

७) माजलगाव – प्रकाश सोळंके (अजित पवार गट) – सुंदरराव सोळंके

८) देगलूर – जितेश अंतापुरकर (भाजप) – रावसाहेब अंतापुरकर

९) पाथरी – राजेश विटेकर (अजित पवार गट) – उत्तमराव विटेकर

Related posts

पोटातले ओठावर!

परभणीत तरुणाचा मृत्यू

हिंदुदुर्ग!