– ज्ञानेश्वर मुळे
‘ब्रिक्स’ परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाच्या कझान शहराचा दौरा केला. याआधी, मोदी यांच्या जुलै महिन्यातील रशिया दौऱ्यामध्ये कझान व येकातेरिनबर्ग या शहरांमध्ये भारतीय वकिलाती सुरू करण्यात आल्या. भारताच्या व्यापारी आणि सांस्कृतिक संबंधांच्या दृष्टीने रशियातील विविध प्रांतांच्या राजधान्यांबरोबरील संबंध वाढवणे खूपच महत्त्वाचे आहे. मोदी यांच्या या दोन दौऱ्यांतून हीच बाब अधोरेखित होते. (Importance of Kazan to India)
आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये रशियाचा विचार करत असताना, नेहमीच मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग या शहरांचाच विचार होतो. हजारो वर्षांपासून ही दोन शहरेच रशियाच्या राजकारणाचे केंद्र राहिले आहेत. बाल्टिक समुद्राचे प्रवेशद्वार म्हणून सेंट पीटर्सबर्ग शहराचे महत्त्व आहे; तर रशियाच्या विशाल भूभागावर नियंत्रण ठेवण्यासाठी सोयीस्कर असल्यामुळे राजधानी मॉस्कोचे महत्त्व अबाधित आहे. (रशियाचा पूर्व-पश्चिम विस्तार प्रचंड मोठा असून, रशियामध्ये तब्बल ११ टाइमझोन आहेत.) या दोन शहरांबरोबरच रशियाची लोकसंख्या आणि व्यवस्था विविध प्रांतांमध्ये विभागली असून, या प्रांतांमधील शहरांचेही महत्त्व आहे. त्यामुळे, ‘ब्रिक्स’ परिषदेच्या निमित्ताने कझान शहराचा विचार होत असून, राजनैतिक संबंधांच्या दृष्टीनेही कझान भारतासाठी महत्त्वाचे शहर ठरू शकते.
रशियासाठी १९९०च्या दशकाची सुरुवात वादळी होती. त्या काळामध्ये मी भारतीय परराष्ट्र सेवेत स्थिरावलो होतो. भारताचे रशियाचे तत्कालीन राजदूत रोनेन सेन यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक भारतीय उद्योजक, व्यापाऱ्यांच्या रशिया दौऱ्यांचे नियोजन केले होते. यामध्ये अस्त्रखान, बाश्कोर्तोस्तान, स्वेर्दलोवस्क, तातारस्तान या प्रांतांना भारतीय व्यापाऱ्यांनी भेटी दिल्या होत्या. नव्याने आकाराला आलेल्या रशिया महासंघातील या विभागीय केंद्रांचे महत्त्व या निमित्ताने अधोरेखित झाले होते. या प्रांतांचे गव्हर्नर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने आमचे स्वागत केले होते, आमचा पाहुणचारही केला होता. प्रत्येक वेळी त्यांच्याकडून आमच्यासाठी एक प्रश्न उपस्थित होत असे, तो म्हणजे ‘भारत या प्रांतांच्या राजधान्यांमध्ये वकिलाती कधी सुरू करणार आहे?’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक देशांच्या प्रमुखांनी ‘ब्रिक्स’ परिषदेसाठी कझान शहरामध्ये हजेरी लावली. मोदी यांनी जुलैमध्येही रशियाच दौरा केला होता. त्या दौऱ्यामध्ये त्यांनी रशियामध्ये दोन नव्या वकिलाती सुरू केल्या होत्या, त्यामध्ये कझानचा समावेश होता. त्यातून भारताच्या रशियाबरोबरील संबंधांमध्ये या शहराचे असणारे स्थान लक्षात येते. सामान्य माणसांप्रमाणेच राजनैतिक संबंधांमध्येही अंतर हा घटक खूप महत्त्वाचा ठरतो. भारतीय राजनैतिक कार्यालये असणाऱ्या मॉस्को (४३४० किलोमीटर), सेंट पीटर्सबर्ग (४९२८ किलोमीटर), व्लादिवोस्तोक (५०८८ किलोमीटर) या शहरांच्या तुलनेमध्ये कझानचे भारतापासूनचे अंतर ३७५० किलोमीटर आहे. अन्य शहरांपेक्षा कमी असणारे हे अंतर या भागाबरोबरील संबंधांसाठी फायदेशीर ठरू शकते. कझान ही तातारस्तान या प्रांताची राजधानी आहे. प्राचीन काळापासून या प्रदेशातून जाणाऱ्या व्यापारी मार्गावरील एक प्रमुख शहर अशी कझानची ओळख आहे. रशियाच्या दक्षिण भागातील शहरांमध्ये कझान हे महत्त्वाचे शहर आहे. औद्योगिक, सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र म्हणून कझान शहर ओळखले जाते. भारताप्रमाणेच कझानमध्येही सांस्कृतिक, धार्मिक आणि वांशिक विविधता दिसून येते. कझानमध्ये काही वर्षांमध्ये योगासन लोकप्रिय होत असून, भारतीय उत्सवही साजरे केले जातात. भारतासाठी इंधन हा खूप महत्त्वाचा घटक आहे. तर, कझानमध्ये खनिज तेलाचे मुबलक साठे आहेत आणि या परिसरात पेट्रोकेमिकल उद्योगही रुजला आहे. प्रवासी विमाने व हेलिकॉप्टरच्या उत्पादनांचे केंद्र ही कझानची आणखी एक ओळख. याशिवाय, रसायने, इंजिनीअरिंग, वस्त्रोद्योग, अन्न प्रक्रिया व अशा अनेक उद्योगांमध्ये कझानमध्ये संधी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे, या क्षेत्रांमध्ये सहकार्य, संयुक्त प्रकल्प आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाणे यांतून दोन्ही देशांच्या सहकार्यामध्ये कझान फॅक्टर महत्त्वाचा ठरू शकतो. युक्रेन युद्धामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेवर ताण आहे. या काळामध्ये भारतीय गुंतवणुकीसाठी संधी निर्माण होऊ शकते. तसेच, यातून निर्माण होणारे वित्तीय संबंध आणि व्यापार दोन्ही देशांच्या फायद्याचा ठरू शकतो. (Importance of Kazan to India)
भारताच्या इतिसाहामध्ये रशियाच्या व्होल्गा नदीचेही महत्त्व आहे. भारतात ज्या प्रमाणे गंगा नदीचे महत्त्व आहे, त्याच प्रमाणे रशियामध्ये व्होल्गा नदी मानली जाते. रशियन प्रवासी अफानासी निकीतीन यांनी व्होल्गाच्या काठावरील तवेरमधून भारताच्या दिशेने प्रवास सुरू केला आणि तो १४६९मध्ये भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील चौल बंदरावर पोहोचला होता. पोर्तुगीज वास्को द गामा भारतामध्ये पोहोचण्यापूर्वी तीन दशके रशियन निकीतीन भारतामध्ये पोहोचला होता, ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. त्यानंतर अनेक भारतीय प्रवासी आणि व्यापाऱ्यांनी निकीतीनच्या मार्गावरून अस्त्रखान, तातारस्तान आणि त्याच्यापुढे मॉस्को व रशियाच्या अन्य भागापर्यंत प्रवास केला. त्यातून भारत-रशिया संबंध विकसित होत गेले व व्यापारही वाढला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २००१मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना, रशियाचा दौरा केला होता. त्या वेळी त्यांनी अस्त्रखान येथे काही भारतीय व्यापाऱ्यांशी संवाद साधला होता. त्या वेळी त्यांना भारत आणि रशियाच्या विविध प्रांतांमधील व्यापारी व सांस्कृतिक संबंधांचे महत्त्व जाणवले होते. त्यातूनच, त्यांनी कझान येथे भारतीय वकिलात सुरू केली. आता ‘ब्रिक्स’ परिषदेच्या निमित्ताने त्यांनी कझान शहराला भेट दिली. त्यातून आता हे संबंध आणखी विकसित होण्यास मदत होणार आहे.