Germany : भारताचा विश्वविजेत्या जर्मनीला धक्का

Germany

Germany

भुवनेश्वर : भारतीय पुरुष हॉकी संघाने बुधवारी प्रो-हॉकी लीग स्पर्धेमध्ये धक्कादायक निकाल नोंदवत विश्वविजेत्या जर्मनीचा १-० अशा गोलफरकाने पराभव केला. या स्पर्धेतील भारताचा हा दुसरा विजय असून मंगळवारी जर्मनीविरुद्ध सहन करावा लागलेल्या पराभवाचा वचपाही भारताने काढला. (Germany)

जागतिक क्रमवारीत जर्मनीचा संघ चौथ्या, तर भारतीय संघ पाचव्या स्थानी आहे. जर्मनीचा संघ २०२३च्या वर्ल्ड कपचा विजेता असून २०२४च्या पॅरिस ऑलिंपिकचा रौप्यपदक विजेता आहे. प्रो-हॉकी लीगमध्ये मंगळवारी जर्मनीने भारतावर ४-१ अशा गोलफरकाने मात केली होती. तथापि, बुधवारच्या सामन्यात भारतीय संघाने आदल्या दिवशीच्या चुका टाळण्याचा काटेकोर प्रयत्न केला. याचाच एक भाग म्हणून भारताने भक्कम बचावाला प्राधान्य दिले. कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील बचावफळीने या सामन्यात प्रभावी कामगिरी केली. सामन्याच्या चौथ्याच मिनिटास भारताच्या गुरजंत सिंगने मैदानी गोल करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतरच्या ५६ मिनिटांमध्ये दोन्ही संघांना एकही गोल नोंदवता आला नाही. (Germany)

भारताला दुसऱ्या सत्रात तीन, तिसऱ्या सत्रात एक, तर अखेरच्या सत्रात दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. परंतु, यांपैकी एकाही पेनल्टी कॉर्नरवर जर्मनीच्या गोलजाळ्याचा वेध घेण्यात भारतीय हॉकीपटूंना यश आले नाही. दुसरीकडे जर्मनीला कमीत कमी पेनल्टी कॉर्नर मिळू देण्याची दक्षताही भारताने घेतली. तिसरे सत्र संपेपर्यंत जर्मनीला केवळ दोन पेनल्टी कॉर्नर मिळवता आले. चौथ्या सत्रात जर्मनीने चार पेनल्टी कॉर्नर वसूल केले. यांपैकी दोनवेळा भारताने आक्षेप नोंदवल्यामुळे व्हिडिओ रिव्ह्यू घेण्यात आले आणि दोन्हीवेळेस भारताच्या बाजूने निकाल लागला. अखेर १-० अशा गोलफरकाने भारताने विजयावर शिक्कामोर्तब केले. भारतातर्फे क्रिशन बहादूर पाठक आणि सुरज कार्केरा या भारतीय गोलरक्षकांनी अनुक्रमे मध्यतंरापूर्व व मध्यंतरानंतर जर्मनीची आक्रमणे फोल ठरवली. (Germany)

भारताने आता या स्पर्धेत चार सामन्यांमध्ये दोन विजय मिळवले आहेत. गुणतक्त्यामध्ये भारतीय संघ ६ गुणांसह सातव्या स्थानावर आहे. भारताचा पुढील सामना २१ फेब्रुवारी रोजी क्रमवारीत व गुणतक्त्यात खालच्या स्थानावर असणाऱ्या आयर्लंडशी होणार आहे.

हेही वाचा :

विदर्भाची आघाडी अडीचशेपार

फर्ग्युसन चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर

Related posts

Smaran

Smaran : झाम्पाच्या जागी स्मारनची निवड

Ferguson

Ferguson : ‘पंजाब किंग्ज’ला धक्का

Mumbai Indians

Mumbai Indians : मुंबई, करुणचा विक्रम