५०० रुपयांच्या नोटांवर अनुपम खेर; सराफाला १ कोटी ९० लाखाला गंडा

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क
अहमदाबाद : सोने खरेदीच्या बहाण्याने येथील एका सराफाला जवळपास १ कोटी ९० लाखाला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे सोने खरेदीसाठी दिलेले पैसे पाहून ज्वेलर्स मालकाच्या पायाखालची जमीन सरकली. कारण, त्या भामट्यांनी दिलेल्या बंडलमध्ये ५०० च्या नोटांवर चक्क अभिनेते अनुपम खेर यांचा फोटो होता.
अहमदाबाद येथील सराफ बाजारात करोडो रुपयांचा गंडा घातल्याची ही घटना उघडकीस आली आहे. सीजी रोडवरील लक्ष्मी ज्वेलर्सचे मॅनेजर प्रशांत पटेल यांनी सराफ व्यापारी मेहुल
ठक्कर यांना कांतिलाल मदनलाल आंगडिया फर्मला २१०० ग्रॅम सोने द्यायला सांगितले होते. त्यानुसार ठक्कर यांनी आपले कर्मचारी भरत जोशी यांना २१०० ग्रॅम सोने आंगडिया फर्ममध्ये देण्यासाठी पाठविले. जोशी दुकानात पोहोचले तेव्हा त्यांनी तेथील एका व्यक्तीकडे काउंटिंग मशिन दिले. दुसऱ्याने जोशी यांच्याकडून सोने घेतले. बॅगेत १ कोटी ३० लाख आहेत. ते मोजून होईपर्यंत पुढच्या ऑफिसमधून ३० लाख घेऊन या, असे तिसऱ्या व्यक्तीने सांगितले. दरम्यान, जोशी यांची नजर चुकवून तिघे भामटे सोने घेऊन तेथून पसार झाले. बॅगेतील नोटांचे बंडल तपासले असता त्या सर्व नोटांवर महात्मा गांधींच्या फोटोऐवजी अनुपम खेर यांचा फोटो होता. तसेच नोटांवर रेसोल बँक ऑफ इंडिया असेही लिहिल्याचे आढळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. गुन्हे शाखेकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तिघांचा शोध घेतला जात आहे.

Related posts

police encounter : खलिस्तान जिंदाबाद फोर्सच्या तिघांचा एन्काउंटर

pune accident : पुण्यात भरधाव डंपरने नऊ जणांना चिरडले

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव