शेतकऱ्यांना कर्जमाफी, अडीच लाख नोकऱ्या

मुंबई;  विशेष प्रतिनिधी : शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, भात उत्पादकांसाठी २५ हजार प्रति हेक्टरी बोनस देण्याबरोबरच अडीच लाख नोकऱ्या आणि ग्रामीण भागात ४५ हजार पाणंद रस्त्यांचे बांधकाम करण्याचे आश्वासन राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जाहीरनाम्यात दिले आहे. शिवाय लाडकी बहीण योजनेची रक्कम २१०० रुपयांपर्यंत वाढवणार असल्याचेही त्यात म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी महाराष्ट्रातील लढवत असलेल्या विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक जाहीरनामा (महाराष्ट्र घोषणापत्र) बुधवारी प्रसिद्ध केला. त्यात अकरा नवीन आश्वासनांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस लढवत असलेल्या सर्व मतदारसंघांत एकाचवेळी हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. बारामतीतून अजित पवार, गोंदियामधून राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, नाशिकमधून ज्येष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी होते, तर खा. तटकरे यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत जाहीरनामा प्रसिद्ध केला.

सरकार स्थापनेनंतर १०० दिवसांत नवीन महाराष्ट्राचे व्हिजन जाहीर करू, असे अजित पवार यांनी बारामतीतून माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रृजमोहन श्रीवास्तव, स्टार प्रचारक सयाजी शिंदे, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना दहा हजार स्टायपेंड

प्रशिक्षणाद्वारे एक लाख विद्यार्थ्यांना दहा हजार मासिक स्टायपेंड देणार आहे. अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांना १५ हजार मासिक वेतन, सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देताना वीज बिल ३० टक्के कमी करण्यात येणार आहे. अत्यावश्यक वस्तूंच्या किमतींवर आळा, वृद्ध पेन्शनधारकांना महिन्याला २१०० रुपये अशा आश्वासनांचाही जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला आहे.

तीन मोफत सिलिंडर

लाडकी बहीण योजना, ४४ लाख शेतकऱ्यांना मोफत वीज, ५२ लाख कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलिंडर, आर्थिक दुर्बल घटकांतील मुलींना मोफत शिक्षणाचा समावेश, गरीब, मध्यमवर्गीय, युवक, महिलांच्या कल्याणासाठीच्या अनेक योजनांचा समावेश आहे. या योजनांना फार मोठा प्रतिसाद राज्यातील कानाकोपऱ्यांतून मिळाला आहे, असेही खासदार तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. एकूण ३६ पानांचा जाहीरनामा असून, त्याच्या मुखपृष्ठावर ‘महाराष्ट्रवादी घोषणापत्र’ असा उल्लेख आहे.

Related posts

प्रसिद्ध दिग्दर्शक शाम बेनेगल यांचे निधन

महसूल मंत्री बावनकुळेंना रामटेक; धनंजय मुंडेंना सातपुडा तर राम शिंदेंचे ज्ञानेश्वरीत असणार वास्तव्य!

मुख्यमंत्र्यांचा बंडाच्या पवित्र्यातील भुजबळांना सबुरीचा सल्ला