Home » Blog » भ्रष्ट महायुती सरकार घालवा

भ्रष्ट महायुती सरकार घालवा

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आवाहन

by प्रतिनिधी
0 comments
Jayant Patil

जयसिंगपूर;  प्रतिनिधी : राजकारणात विचारांना आणि तत्त्वांना खूप महत्त्व असते. ज्यांनी विचारांचाही भ्रष्टाचार केला, अशा परस्पर विरोधी लोकांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले. महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचे पाप त्रिकूट महायुती सरकारने केले. देशाची आणि राज्याची प्रगती करण्यासाठी या महायुती सरकारला घालवण्याशिवाय पर्याय नाही, असे आवाहन माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. शिरोळ विधानसभेचे मविआचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ शिरोळ येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बी. जी. माने होते.

महाराष्ट्राची परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. भ्रष्ट सरकार, पक्ष फोडणाऱ्या सरकारला घालवून महाविकास आघाडीचे सरकार आणण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे, असे जयंत पाटील ते म्हणाले. दिवंगत सा. रे. पाटील यांनी समाजवादाचा पुरस्कार केला, कोणाला त्रास दिला नाही. त्यांचा वारसा स्वच्छ, निर्मळ मनाच्या आणि कमी बोलून जास्त काम करणाऱ्या गणपतराव पाटील यांनी चालविला आहे. ज्यांनी मतदारांना विचारात न घेता राजकारण केले त्यांना त्यांच्या विचारापासून मतदार कसे लांब जातात हे दाखवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे गणपतराव पाटील यांना निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव उगळे म्हणाले, विरोधकांनी तालुक्यात १९०३ कोटीची कामे केल्याचे दाखवावे, आम्ही जाहीरपणे माफी मागण्यास तयार आहोत. ते म्हणतात आमच्याकडे सीडी आहेत. गणपतराव पाटील म्हणाले, सावध काम करा. शिरोळ तालुक्यामध्ये तंटे वाढू न देता सर्व समाजात सलोखा राखून माणूस हा एकच धर्म मानून पुढे जाण्याची आणि सर्वांचे जीवन सुखकर करण्याची माझी भूमिका आहे.  शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहणार असून मला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या.

यावेळी दलितमित्र शिवाजीराव परुळेकर, राजेंद्र प्रधान, डॉ. दगडू माने, दस्तगीर जमादार, अनिल खाडे, विक्रमसिंह जगदाळे आदींनी मनोगत व्यक्त करून गणपतराव पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले. स्वागत प्रास्ताविक पृथ्वीराजसिंह यादव यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केले. गजानन संकपाळ यांनी आभार मानले.

यावेळी ठाकरे शिवसेनेचे चंगेजखान पठाण, मधुकर पाटील, ‘दत्त’चे चेअरमन रघुनाथ पाटील, अनिलराव यादव, दरगु गावडे, शेखर पाटील, मंजूर मिस्त्री, अरुणकुमार देसाई, धनाजी पाटील नरदेकर, पंडितराव काळे, यांच्यासह शिरोळ शहर व उपनगरातील मतदार, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00