मुंबई/पुणे : विशेष प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्यावतीने राज्यभर जनसुरक्षा विधेयकाविरोधात राज्यभर एल्गार करण्यात आला. कोल्हापूरसह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे, निदर्शने आणि धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी महायुती सरकारचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. (MVA’s Protest)
महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट यांच्यासह डाव्या पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
कोल्हापुरात महावीर गार्डन येथे एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जनसुरक्षा विधेयक घटनाविरोधी आणि लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांवर गदा आणणारे हे विधेयक तत्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. (MVA’s Protest)
यावेळी आमदार सतेज पाटील व्ही.बी.पाटील, आर. के. पोवार, संजय पवार, विजय देवणे, सचिन चव्हाण, राजू लाटकर, दिलीप पवार, कॉ. उदय नारकर, बाबुराव कदम, कॉ. संपत देसाई, कॉ. सतिशचंद्र कांबळे, कॉ. बाळासाहेब सरनाईक, भरत रसाळे, कॉ. अतुल दिघे, बाबासाहेब देवकर, कॉ. रघुनाथ कांबळे,कॉ. सुभाष जाधव, संजय मोहिते, अनिल घाटगे, भारती पोवार, सरलाताई पाटील, चंद्रकांत यादव, सुभाष देसाई, आदी उपस्थित होते.
पुण्यात आंदोलन; विधेयक मागे घेण्याची मागणी

जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात पुणे येथे महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित आंदोलन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आंदोलन सुरू झाले. राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यावेळी प्रमुख उपस्थित होत्या.
सरकारने आणलेला जनसुरक्षा कायदा हा संविधान विरोधी आहे. नक्षलवाद संपवल्याचा दावा सरकार करत आहे, तसेच नक्षलवादासाठी कायदे आधीपासूनच अस्तित्वात असताना नवीन कायदा कशासाठी? असा सवाल उपस्थित करत सरकारने हा कायदा मागे घ्यावा, अशी मागणी केली. याप्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते. (MVA’s Protest)
नागपुरात तीव्र निषेध

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीतर्फे गांधी पुतळा, व्हेरायंटी चौक, नागपूर येथे निषेध आंदोलन करण्यात आले. (MVA’s Protest)
या प्रसंगी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष अभिजीत वंजारी, विशाल मुत्तेमवार, प्रदेश सचिव अतुलजी कोटेचा, माजी नगरसेवक प्रशांत धवड, संजय महाकाळकर, दुनेश्र्वर पेठे, शहर उपाध्यक्ष दिनेश बानाबाकोडे, सचिव मिलिंद दुपारे, ब्लॉक अध्यक्ष, काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.
नांदेडमध्ये ‘मविआ’चे धरणे

नांदेड शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी व नांदेड महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी ॲड. सुरेंद्र घोडजकर (सह महासचिव), नांदेड काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.