महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली की वाढवली?

महाराष्ट्र दिनमान; प्रतिनिधी : महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान झाले. त्या दिवशी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची अंदाजे टक्केवारी ५८.२२ इतकी होती. रात्री ११.३० पर्यंत ती ६५.०२ टक्क्यांपर्यंत गेली आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणी सुरू होण्याची आधी काही तास ही आकडेवारी ६६.०५ टक्के इतकी असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. याचा अर्थ संध्याकाळी पाचनंतर साडेअकरा म्हणजे साडेसहा तासांत राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर ७६ लाख इतक्या लोकांनी मतदान केले, असा त्याचा अर्थ होतो. हे शक्य आहे का, निवडणूक आयोगाचे यावर स्पष्टीकरण काय, आयोगाचा कारभार पारदर्शी आणि लोकशाही पद्धतीने होतोय  का, याविषयी प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. परकला प्रभाकर ‘द वायर’ या इंग्रजी यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत काय सांगताहेत?

डॉ. परकला यांनी आयोगाने दिलेल्या आकडेवारीच्या आधारे, २० नोव्हेंबरला झालेल्या मतदानाची पाचपर्यंतची अंदाजे टक्केवारी, त्यानंतर मतदान केंद्रात दाखल झालेल्या मतदारांना करू दिलेल्या मतदानाचा विचार करता ही प्रक्रिया साडे अकरापर्यंत चालली असे गृहित धरले तर साडेसहा तासांत ६.८ टक्क्यांनी मतदान वाढले. मतदानाच्या आधी काही तासांपूर्वी आयोगाने ६६.०५ टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले. म्हणजे संध्याकाही पाचनंतर साडेअकरापर्यंत ७.८३ टक्क्यांनी मतटक्केवारी वाढली. म्हणजेच या साडेसहा तासांत ७६ लाख मतदारांनी मतदान केले, असे स्पष्ट होते, याकडे लक्ष वेधले आहे.

संध्याकाळी ५ वाजता मतदान संपले. त्यानंतर मतदान केंद्रांवर एवढ्या मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते का, आणि असतील तर एका मतदाराला किमान एक मिनिट गृहित धरल्यास सहा तासांत एवढ्या लोकांनी मतदान कसे काय केले असेल?, असा मूलभूत प्रश्न निर्माण होतो, याकडे लक्ष वेधत परकला म्हणाले, रांगेत थांबलेल्या शेवटच्या व्यक्तीने मतदान किती वाजता केले असेल, या प्रक्रियेचे आयोगाने नियमानुसार व्हिडीओ चित्रण केले आहे का, असेल तर आयोग ते स्पष्ट करायला का तयार नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी परकला यांनी पुढील उदाहरण दिले. संध्याकाळी ५ वाजता मतदान थांबले तेव्हा एका बूथवर किमान हजार लोक थांबले असतील, असे वादासाठी गृहित धरू. मतदान केंद्रात ते संध्याकाळी पाचच्या आधी पोहोचले असल्याने त्यांना मतदानाचा अधिकार आहे. आता मत देण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला केवळ एक मिनिट गृहीत धरल्यास (प्रत्यक्षात हा वेळ किमान ४ ते पाच मिनिटे असावा) या लोकांना मतदान करण्यासाठी एक हजार मिनिटे लागतील. एक हजार मिनिटे म्हणजे १६.६ तास. पण संध्याकाळी ५ नंतर रात्री साडेअकरा म्हणजे फक्त साडेसहा तास होतात. त्यामुळे त्या वेळी हजार लोक कसे काय मतदान करू शकतील? मग ७६ लाखांचा फरक कुठून आला? यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी होत आहे. मात्र निवडणूक आयोग गप्प आहे. प्रश्न उपस्थित करणाऱ्या नागरिकांनी दिलेल्या निवेदनाची साधी दखलही घेतलेली नाही, असे डॉ. परकला सांगतात.

झारखंडच्या टक्केवारीकडे लक्ष वेधताना परकला म्हणतात, की झारखंड राज्यात दोन टप्प्यात मतदान झाले. पहिल्या टप्प्यात संध्याकाळी ५ पर्यंत ६४.८६ टक्के मतदान झाले. रात्री साडे अकरापर्यंतची अंतिम टक्केवारी ६६.४८ टक्के झाली. म्हणजे फक्त १.७९ टक्के इतकाच फरक आहे. दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी ५ वा. ६७.५९ टक्के मतदान झाले आणि रात्री ११.३० पर्यंत ६८.४५ टक्के झाले. म्हणजे त्यात केवळ ०.८६ टक्क्यांची वाढ दिसते. मग प्रश्न असा आहे की, महाराष्ट्रात मतदान बंद झाल्यानंतरच्या मतदान टक्केवारीच्या तुलनेत झारखंडमध्ये मतदान कसे वाढले नाही? यावरही निवडणूक आयोगाकडे काहीही उत्तर नाही.

वाढलेली टक्केवारी आणि महायुतीचा विजय

महाराष्ट्रात जिथे मतदान सुमारे टक्क्यांनी वाढले, तेथे महायुतीच्या उमेदवाराचा विजय झाला. झारखंडमध्ये जेथे दोन किंवा एक टक्क्यापेक्षा कमी वाढले तेथे इंडिया आघाडीच्या उमेदवाराचा विजय झाला. त्यामुळे मतदानात झालेली वाढ आणि विजय याचा परस्परसंबंध आहे का, असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. प्रथमदर्शनी असे दिसते की, जेथे मतदानानंतरच्या मतदानात मोठी वाढ झाली तेथे महायुतीचा विजय होतो आणि जेथे किरकोळ किंवा कमीत कमी वाढ होते तिथे इंडिया आघाडी जिंकते, याकडे लक्ष वेधून महाराष्ट्रात अविश्वसनीयरित्या वाढलेल्या मतांची टक्केवारी काय सांगते ते स्पष्ट होते, असे परकला सांगतात.

डॉ. परकाला यांनी हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीची उदाहरणेही दिली आहेत. हरियाणामध्ये, अधिकृत वेळेनंतरच्या झालेल्या मतांची टक्केवारी ६.७ टक्क्यांनी वाढली आणि भाजपने विजय मिळवला. उत्तर प्रदेशमध्ये हाच टक्का ०.५ च्या खाली होता तेथे विरोधी पक्षाने बहुतांश जागा जिंकल्या.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वाढलेल्या टक्केवारीचे विश्लेषण करताना डॉ. परकला एकूणच निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवतात. महाराष्ट्रात संध्याकाळी पाचनंतर वाढलेली ७.८३ टक्के वाढ आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय आहे. झारखंडमध्ये असे का घडले नाही? वाढलेली टक्केवारी आणि विजय यात काही संबंध आहे का? हरियाणा (विधानसभा) आणि उत्तर प्रदेश (लोकसभा) चे निकाल असेच काही सुचवत नाहीत का? या सर्वांचे स्पष्टीकरण आयोगाकडे आहे काय? आयोगाने ते स्पष्ट केले नाही तर लोकांच्या मनात संशय निर्माण होणार नाही का? या संशयामुळे आपल्या मतदान पद्धतीला आणि आपल्या लोकशाहीला हानी पोहोचत नाही का? असे मूलभूत निष्कर्ष डॉ. परकला प्रभाकर यांनी काढले आहेत.

  • महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी पाच नंतर वाढलेली टक्केवारी अनाकलनीय आणि अविश्वसनीय आहे.
  • संध्याकाळी पाचनंतर ७.८३ टक्क्यांची वाढ म्हणजे ७६ लाख मतदारांनी मतदान केले.
  • सायंकाळी पाचनंतर प्रत्येक बूथवर एक हजार मतदार गृहित धरले तर प्रक्रिया संपायला साडेसोळा तास लागतील. हे अशक्य आहे

Related posts

‘लाडकी बहीण’चा हप्ता अधिवेशनानंतर जमा, सर्व आश्वासने पूर्ण करणार

Nana Patole : बीडमधील गुंडगिरीत सहभागी मंत्र्याची हकालपट्टी करा

उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट