CSIBER Conference: हरित तंत्रज्ञान उद्योगजगताची भविष्यकालीन दिशा : प्रकाश राठोड

CSIBER Conference

कोल्हापूर : “कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटायझेशन आणि हरित तंत्रज्ञान ही भविष्यातील उद्योगजगताची मूळ दिशा ठरेल. व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी केवळ सैद्धांतिक ज्ञान न घेता उद्योगातील समस्यांचे प्रत्यक्ष निराकरण करण्याची क्षमता विकसित करावी. संशोधन हे फक्त पेपरपुरते न राहता ते समाजासाठी उपयोगी ठरावे, ही खरी शैक्षणिक जबाबदारी आहे,” असे मत आंतरराष्ट्रीय परिषदेचे मुख्य अतिथी कैस्प्रो ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन प्रकाश राठोड यांनी व्यक्त केले. (CSIBER Conference)

छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च (सायबर), कोल्हापूर यांच्या ‘भविष्याचे परिवर्तन व्यवस्थापन, तंत्रज्ञान, सामाजिक परिणाम व पर्यावरणीय जबाबदारीतील यामधील नवकल्पना’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचा प्रारंभ सायबर कॅम्पस येथे शुक्रवारी (१९ सप्टेंबर) उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. (CSIBER Conference)

युनिव्हर्सिटी ऑफ वावुनिया, श्रीलंका, युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, मॉरिशस आणि नेपाळची कादंबरी मेमोरियल कॉलेज ऑफ सायन्स अँड मॅनेजमेंट, काठमांडू यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित केली आहे.

उद्योग जगताच्या अनुभवातून व्यवस्थापनातील नवकल्पनांची गरज अधोरेखित करून राठोड म्हणाले की जापनीज लोक हे नम्र आणि शिस्तप्रिय असतात. त्याचे त्यांना लहानपणापासून बळकडू दिले जाते. ते नैसर्गिक स्त्रोतांचा योग्य आणि काळजीपूर्वक वापर करतात. भारतात पाणी, वीज व इतर नैसर्गिक स्त्रोतांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करून या क्षेत्रामध्ये मोठी क्रांती करणे गरजेचे बनले आहे.

डॉ. अनंथिनी नंथाकुमारन यांनी, पारंपरिक जलव्यवस्थापन प्रणालीचे पुनरुज्जीवन आजच्या काळात अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. पर्यावरणीय जबाबदारी आणि संसाधनांचा शाश्वत वापर हाच खरा विकासाचा पाया असल्याचे त्या म्हणाल्या. (CSIBER Conference)

हवामान बदल ही मोठी जागतिक आव्हाने असून त्याचा थेट परिणाम अन्नसुरक्षा व ग्रामीण जनतेवर होत आहे. श्रीलंकेतील व्हिलेज टँक कॅस्केड सिस्टीम ही जलव्यवस्थापनाची शतकानु शतकांची परंपरा आजही प्रेरणादायी आहे. “जगातील प्रत्येक समाज नव्या तांत्रिक व व्यवस्थापकीय बदलांच्या टप्प्यावर आहे. संशोधकांनी स्थानिक समस्यांना जागतिक संदर्भ द्यावा. महिला सक्षमीकरण, डिजिटल समावेशकता, आणि पर्यावरणपूरक विकास या विषयांवर भविष्यातील संशोधन केंद्रीत झाले पाहिजे. कारण सामाजिक विकासाशिवाय तंत्रज्ञानाला खरी दिशा मिळणार नाही,” असे त्या म्हणाल्या. (CSIBER Conference)

डॉ. अमिताबीन  रमा यांनी अँटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.

या परिषदेत शंभरावर संशोधन पेपर सादर होणार आहेत.

सायबर महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. बिंदू मेनन यांच्या हस्ते प्रकाश राठोड व प्रा. डॉ. अनंतनी नंथाकुमारण यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविकात प्रभारी संचालिका डॉ. बिंदू मेनन यांनी परिषदेचे उद्दिष्ट स्पष्ट केले.

यावेळी  “SAJMAR जर्नल” चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. डॉ. पूजा पाटील यांनी सदर जर्नलच्या मुख्य संपादक म्हणून काम केले आहे.

सूत्रसंचालन प्रा. ए . यु. गायकवाड व प्रा. सोनाली सदरे यांनी केले प्रा. डी. एस. माळी यांनी आभार मानले.

Related posts

‘मित्र’ आणि बायसॅग-एन करारामुळे महाराष्ट्राच्या विकासाला चालना : मुख्यमंत्री फडणवीस

एनसीडीसी ने सात साखर कारखान्यांना कर्ज नाकारले

‘निसर्गदूत – प्राचार्य  डॉ.मधुकर बाचूळकर  –चोळेकर’ या पुस्तकाचे प्रकाशन