ईडीच्या कार्यालयावर सीबीआयचा छापा

सिमला/चंदीगड : भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात चंदीगडच्या सीबीआय पथकाने हिमाचल प्रदेशाची राजधानी सिमला येथील ईडीच्या कार्यालयावर छापा टाकला. भ्रष्टाचाराचे एक प्रकरण दाबून टाकण्यासाठी आरोपीकडून लाखो रुपयांची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आरोप असलेल्या ईडीच्या डेप्युटी डायरेक्टरच्या कार्यालय आणि घरावर छापा टाकून कागदपत्रे जप्त केली आहेत. (ED CBI)

सीबीआयच्या पथकाने मंगळवारी सकाळी सिमला येथील स्ट्रॉबेरी हिल्स येथील ईडीच्या कार्यालयावर छापा टाकला. पण, छापा टाकण्यापूर्वीच संशयित ईडी डायरेक्टर पळून गेला आहे. पळून जाताना त्याने अवैधरित्या वसुली केलेली रक्कम घेऊन पोबारा केला आहे.

संशयित ईडीच्या अधिकाऱ्यांच्या शोधासाठी सीबीआय पथकाने डेप्युटी डायरेक्टरच्या सिमल्यातील घरावरही छापा टाकला. फरार झालेल्या आरोपीकडे धन शोधन निवारण अधिनियम (पीएमएलए) संबंधित एका प्रकरणाची चौकशी सुरू होती. हे प्रकरण दाबून टाकण्यासाठी डेप्युटरी डायरेक्टर मध्यस्थाच्या माध्यमातून आरोपीकडून लाखो रुपयांची मागणी करत होता. त्या संबंधी आरोपींनी चंदीगड सीबीआयकडे लेखी अर्ज दिला होता. हे प्रकरण ईडी अधिकाऱ्यांशी संबंधित असल्याने सीबीआयने खास पथकाची नियुक्ती केली होती. लाचेच्या मागणीसाठी केलेल्या व्यवहाराचे मोबाईलवर रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. ईडीच्या अधिकाऱ्याला कारवाईची कुणकुण लागताच तो फरार झाला आहे. (ED CBI)

सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीच्या अधिकाऱ्याविरोधात सबळ पुरावे मिळाले आहेत. इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर करुन पुरावे गोळा केले आहेत. हा अधिकारी सिमल्यातून बाहेर पळून गेला असल्याने त्याच्या अटकेसाठी एक पथक सिमल्याच्या बाहेर गेले आहे.

ईडी कार्यालयात ३६ तास डेरा

सीबीआयची टीम मंगळवारी सकाळी ईडी कार्यालयात पोचली होती. कार्यालयातील एकाही कर्मचाऱ्याला बाहेर सोडले नाही आणि कुणालाही कार्यालयात घेतले नाही. मंगळवारी सुरू असलेली कारवाई बुधवारी सायंकाळी परत सुरू होती. ईडी कार्यालयातील अनेक कागदपत्रांची सीबीआयच्या पथकाने तपासणी केली. बुधवारी ख्रिसमसची सुट्टी असतानाही कारवाई सुरू होती. (ED CBI)

हेही वाचा :

Related posts

Manmohan Singh कर्मयोगी

Manmohan Singh मेणाहून मऊ, वज्राहून कठोर

Manmohan Singh भारतीय राजकारणातील सभ्यता निमाली