मुंबई : भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा इंग्लंडविरुद्धच्या आगामी वन-डे क्रिकेट मालिकेस मुकण्याची शक्यता आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेच्या शेवटच्या कसोटीदरम्यान बुमराहला झालेल्या पाठदुखीच्या त्रासातून सावरण्यासाठी त्याला महिन्याभराची विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे. (Bumrah Injury)
भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा नुकताच आटोपला. या दौऱ्यामधील पाच कसोटींमध्ये भारताच्या वेगवान गोलंदाजीचा भार प्रामुख्याने बुमराहवर होता. यांपैकी दोन कसोटीत तर त्याने कर्णधारपदाची धुराही सांभाळली. पाच कसोटींतील ९ डावांमध्ये मिळून त्याने १५० हून अधिक षटके गोलंदाजी टाकत ३२ विकेट घेतल्या. परिणामी, अतिताणामुळे त्याला पाठदुखीचा त्रास जाणवू लागला. या पाठदुखीमुळे सिडनी येथील अखेरच्या कसोटीतील दुसऱ्या डावात बुमराह गोलंदाजी करू शकला नव्हता. भारतीय संघाचे वैद्यकीय पथक बुमराहच्या पाठदुखीवर लक्ष ठेवून आहे. ऑस्ट्रेलियामध्ये त्याचे आवश्यक स्कॅनही करण्यात आले. भारतात परतल्यानंतर पुन्हा त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. (Bumrah Injury)
फेब्रुवारीमध्ये १९ तारखेपासून चॅम्पियन्स ट्रॉफी ही महत्त्वाची वन-डे क्रिकेट स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेत भारताने यशस्वी कामगिरी करण्यासाठी बुमराहचे तंदुरुस्त असणे संघासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळेच, फेब्रुवारीच्या सुरुवातीस होणाऱ्या भारत-इंग्लंड वन-डे मालिकेसाठी बुमराहला विश्रांती देण्यात येऊ शकते. तत्पूर्वी, भारतीय संघ मायदेशात इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिकाही खेळणार असून या मालिकेत बुमराह खेळणार नसल्याचे स्पष्ट आहे. (Bumrah Injury)
बुमराहच्या अनुपस्थितीत महंमद शमीची इंग्लंडविरुद्धच्या वन-डे मालिकेसाठी भारतीय संघात निवड होऊ शकते. २०२३ च्या वन-डे वर्ल्ड कपनंतर महंमद शमी दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. तंदुरुस्त झाल्यानंतर त्याने मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. तथापि, तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे सांगत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर न पाठवण्याचा निर्णय घेतला. आता चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारत एकमेव वन-डे मालिका इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे, शमीचा विचार चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी करावयाचा असल्यास इंग्लंडविरुद्धची मालिका ही त्याचा फिटनेस व कामगिरी आजमावून पाहण्यासाठीची अखेरची संधी आहे. (Bumrah Injury)
हेही वाचा :